Water Resource : कल्लोळामधील पाणी का थांबले?

आजही अनेक जुन्या मंदिराच्या बाहेर ही भग्नावस्थेतील कल्लोळ, कुंड आपणास पहावयास मिळतात. यांचे नष्ट होणे हे पाणी व्यवस्थापन प्रक्रियेचा ऱ्हास आहे.
Water Resource
Water ResourceAgrowon

Water Resources Conservation मागील लेखामध्ये मी पाण्याच्या अदृश्य आणि दृश्य या दोन प्रकाराबद्दल चर्चा केली होती. अदृश्य म्हणजे भूगर्भामधील (Groundwater) पाणी जे भूपृष्ठावर येऊन दृश्य होते. पाणी व्यवस्थापनामध्ये (Water Mangement) भूगर्भात जास्तीत जास्त पाणी कसे साठवता (Water Storage) येईल यासाठी प्रयत्न केले जातात.

पूर्वी म्हणजे ५ ते ६ दशकापर्यंत ही हजारो वर्षांपासूनची नैसर्गिक प्रक्रिया (Natural Water Resources) होती. ज्यामध्ये या पाण्याचा उपसा वाडवडिलांनी बांधलेल्या विहिरींचा अपवाद वगळता फारसा होत नसे.

या पाण्यास साठवून ठेवण्यामध्ये बारमाही वाहणाऱ्या लहान मोठ्या नद्या, समृद्ध वृक्षराजी, सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि कुठेही न आढळणाऱ्या विंधन विहिरींचा फार मोठा सहभाग होता.

मॉन्सूनचा पाऊस पडू लागला, की जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत धरणीमाता हे निसर्गाचे पाणी पिऊन तृप्त होत असे, नद्या दुथडी भरून वाहात, विहिरी पाण्याने तुडुंब भरत. पावसाळा संपून हिवाळा आणि नंतर उन्हाळा सुरू झाला, की नद्यांचे पूर कमी होऊन पाण्याच्या वेग मर्यादित होत असे.

या दोन ऋतूमध्ये नद्यांमध्ये स्वच्छ झुळझुळ वाहणारे पाणी म्हणजे निसर्गाने त्याच्याच पाण्याचे केलेले व्यवस्थापन असे, कितीतरी ओढे पावसाळा संपला तरी पुढील ३ ते ४ महिने वाहत असत.

हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी हे भूगर्भातील साठलेल्या अतिरिक्त पाण्याच्या पृष्ठभागावर येणारा वाहता प्रवाह आहे आणि यामध्ये नदी पात्र आणि तिच्या दोन्हीत तीरावरील वाळूचा फार मोठा सहभाग असतो.

पाण्याचे मोल महत्त्वाचे...

नदी काठावर वाळूमध्ये हिवाळ्यात, उन्हाळ्यात पूर्वी गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी काही झरे असायचे. याच झऱ्यामधील स्वच्छ पाणी स्त्रिया लहान वाट्यांनी घागरीत भरून घराकडे जात. झऱ्यात मुबलक पाणी असताना, हवे तेवढेच स्वच्छ जल लहान वाटीने घेणे म्हणजेच प्रत्येक थेंबाचा सन्मान करणे, हेच खरे जल व्यवस्थापन होय.

स्त्रियांचे पाणी भरणे झाल्यावर, गावामधील पखालीवाला त्या झऱ्यावर येत असे. रेडा किंवा बैलाच्या पाठीवरची ती पाणी भरलेली कातडी पखाल आणि तिच्यामधून थेंब थेंब पडणारे पाणी, त्यातील पाणीवाटप, ज्या पायवाटेवरून ती पखाल जात असे तिच्या दोन्हीही बाजूंना पाण्याच्या थेंबामधून निर्माण झालेली हिरवाई हे पाहण्यात आणि अनुभवण्यामध्ये माझे बालपण गेले, सुट्टीत आजोळी आल्यावर माझी दोस्ती त्या पखालीवाल्याबरोबर होत असे.

नदी ते घर पुन्हा नदी अशा त्याच्या चार-पाच चकरांमध्ये मी त्याच्याबरोबर असे. मला आठवते, एकदा न्हाणी घरात पाय धुण्यासाठी मी एक तांब्याऐवजी ४ ते ५ तांबे पाणी घेतले तेव्हा आजोबांनी मला तो पखालीवाला, त्याची पखाल आणि ती पाठीवरून एक कोस घरापर्यंत वाहून आणणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या वेदना समाजावून सांगितल्या.

पाणी व्यवस्थापनाचा पहिला धडा मला प्रत्यक्ष अनुभवातून मिळाला. त्याचबरोबर पाठीवरील पखालीच्या मुखामधून पाण्याची लहान धार त्या पखालवाल्याने माझ्या ओंजळीत सोडून माझी पाणी पिण्याची इच्छा पूर्ण केली तेव्हा ओंजळभर पाण्याचे महत्त्व मला समजले.

आज पाणी व्यवस्थापनावर काम करताना अजूनही ती ओंजळ माझी खरी मार्गदर्शक ठरली आहे. पाण्याला ना जात पात असते, ना धर्म हे सुद्धा त्या गरीब माणसाने मला शिकवले.

Water Resource
Water Importance: जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला

पारंपरिक पाणी व्यवस्थापनाच्या रचना

भूगर्भामधून नैसर्गिक पद्धतीने गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पृष्ठभागावर येणारे पाणी आणि त्यांचे सहा विविध प्रकार हे पाणी व्यवस्थापनाचे खरे सूत्र आहे. महासागर, खाडी आणि पाणथळ जागा, वाहत्या नद्या, आड, विहिरी, बारव, तलाव, सरोवरे आणि तीर्थ क्षेत्रावर असणारे पाण्याचे कल्लोळ अथवा कुंड हे सहा विविध पाण्याचे स्रोत निसर्गाने मानवास दिले.

डॉ. माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मला तलाव, सरोवरे आणि तीर्थ क्षेत्रावरील कल्लोळ आणि कुंडावर संशोधन करायची अमूल्य संधी मिळाली.

व्यवस्थापनाअभावी आपल्या देशामधील ७० टक्के तलाव नष्ट झाले, अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, तो आपण लेखमालेच्या पुढील टप्यामध्ये पाहणार आहोत. पण या लेखात मला धार्मिक महत्त्व लाभलेल्या पाणी साठ्यावर भाष्य करण्यास जास्त आवडेल.

Water Resource
Climate Change : बदलत्या हवामानाचा पिकांवर विपरीत परिणाम

पूर्वी जेथे मोठमोठी मंदिरे होती तेथे वार्षिक जत्रा भरत असत. अशा ठिकाणी वाहत्या पाण्याचे कल्लोळ किंवा झरे असलेले कुंड असत, कल्लोळमधील स्वच्छ पाणी कधी कधी मुक्त वहात असे किंवा गायमुखातून बाहेर पडत असे.

हे पाणी अतिशय पवित्र समजले जाई. प्रात:काली देवांना याचे स्नान घातल्या शिवाय कुणीही या पाण्यास स्पर्श करत नसे, या पवित्र पाण्याचा उपयोग पायावर घेऊन मंदिरात दर्शनाभावी जाण्यापुरताच होत असे.

हे सर्व कल्लोळ, कुंड हे भूगर्भातील पाण्याचा तीर्थ क्षेत्रावर असणारा सन्मान होता. काळ बदलला हेमाडपंती, मजबूत दगडाचे बांधकाम असणारी देवळे काही अपवाद वगळता लाखो रुपयांच्या देणग्यांतून रंगरंगोटींनी भक्तांसाठी सज्ज झाली, भक्तीपेक्षाही व्यापारीकरण, पैशाची पूजा होऊ लागली आणि या विकासपर्वात सर्व कल्लोळ, कुंड यांचे कचराकुंडीत रूपांतर होऊन ती कालप्रवाहात नष्ट झाली.

Water Resource
Climate Change : वातावरण बदल, पाणी यांचा परस्परसंबंध

आजही अनेक जुन्या मंदिराच्या बाहेर ही भग्नावस्थेतील कल्लोळ, कुंड आपणास पाहावयास मिळतात. यांचे नष्ट होणे हे पाणी व्यवस्थापन प्रक्रियेचा ऱ्हासच होता. काही कुंड आजही जिवंत आहेत पण पूर्णपणे दुर्लक्षित आहेत,

माझ्या शालेय जीवनात रामकुंड या माझ्या गावापासून जवळ असणाऱ्या श्री रेणुका मातेच्या दर्शनास आम्ही नियमित जात असू. माझ्यासाठी तेथील वाहत्या पाण्याचे कल्लोळ म्हणजे ‘सीतेची नाहणी’ हे आकर्षण केंद्र होते. आज हे कल्लोळ पूर्णपणे नष्ट झाले आहे , पाणी तर केव्हाच थांबले आहे.

कल्लोळमधील पाणी का थांबले? यासाठी मी अलीकडेच त्या गावाचे सर्वेक्षण केले. तेव्हा मला आढळले, की या परिसरात फक्त रासायनिक शेतीच होते, पाणंदीच्या जागा सिमेंटच्या रस्त्याने घेतल्या होत्या, गावात अनेक विंधन विहिरी होत्या.

पारंपरिक पिके तसेच सेंद्रिय शेती कुठेही नव्हती, गायराने नष्ट झाली होती. ज्या वड, नांद्रुक वृक्षाखाली चैत्र महिन्यात जत्रा भरत असे. त्यांची संख्या कमी झाली होती. पूर्वी हे गाव गर्द वृक्षराजीत लुप्त होते, आता मात्र उजाड दिसत आहे.

या एवढ्या मानवनिर्मित संकटापुढे भूगर्भातील पाणी तुम्हाला हाक कशी देणार? मी त्या कल्लोळाचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी दर्शविली, मात्र कुठेही सहकार्यच नव्हते, कारण या शाश्वत पाण्याचे महत्त्व आम्हाला कधी समजलेच नव्हते.

५ ते ६ दशकांपूर्वी याच गावात जेमतेम ६० ते ७० असलेली घरे याच कल्लोळातील पाणी पिण्यासाठी वापरत होती. गावात नळ आले आणि हा पवित्र जलस्रोत कायमचा बंद झाला.

१९७२ च्या दुष्काळात आमच्या गावामधील आडांना पोहराभर सुद्धा पाणी मिळत नसे. लोकांनी आडावर येऊ नये म्हणून घरे आतून बंद करत. त्याच वेळेस गावामधील एकमेव मशिदीतील पाण्याने लोकांची तहान भागवली, कारण त्या धार्मिक वास्तूत संरक्षित पवित्र पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाले होते.

अनेक वेळा सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्या वास्तूत जाऊन तेथील निर्मळ पाण्यामध्ये माझी प्रतिमा न्याहाळत असे आणि परत निघताना हात आपोआप जोडले जात ते पाण्याबरोबरच त्याच्या व्यवस्थापनाससुद्धा.

अशा धार्मिक महत्त्व असणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन, त्याची घेतलेली काळजी पाहण्यासाठी आपण जरूर अमृतसर, पुष्कर यांसारख्या तीर्थक्षेत्रांना विज्ञानाच्या नजरेमधून भेट द्यावी.

नांदेडच्या पवित्र गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी चार, पाच तांबे पाणी पायांवर कोणीही घेत नाही, तुम्ही पाण्यात पाय ठेवूनच पुढे जातात. तेच पाणी या गुरुद्वाराच्या अतिशय शोभिवंत बागेची काळजी घेते. पाण्याचा एक थेंबही वाया न जाणारे हे व्यवस्थापन पाहिल्यावर जलदेवतेसमोर नतमस्तक का होऊ नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com