
पुणे ः सध्याच्या काळात राज्यभर थंडी (Cold) आणि काही ठिकाणी धुक्यामध्ये (Foggy Weather) वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे. अचानक कमी होणारे तापमान आणि वाढणारे धुके त्यातच काही भागात ढगाळ हवामान (Cloudy Weather) तयार झाले आहे. विशेषतः अति थंडी आणि धुक्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
थंडी, धुके, ढगाळ हवामानाचा परिणाम ः
गहू ः वाढती थंडी वाढीसाठी अनुकूल आहे. मात्र ज्या ठिकाणी धुके आणि ढगाळ हवामानात दव पडलेले असेल तेथे मावा कीड, तांबेरा, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
हरभरा ः बहुतांश भागात पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. थंडीमुळे अन्नद्रव्यांच्या वहनावर परिणाम होतो. ढगाळ वातावरणात घाटे अळी आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
ज्वारी ः पिकाची जोमदार वाढ आहे. मात्र थंडी, धुके जास्त दिवस राहिल्यास तयार होणाऱ्या ज्वारीमध्ये चिकटा पडण्याची शक्यता आहे.
कांदा ः गेले काही दिवस पीक वाढीस अनुकूल तापमान होते. मात्र थंडी, वाढलेले धुके जास्त दिवस राहिल्यास पातीवर दव साचून करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे.
वेलवर्गीय भाजीपाला ः थंडीचा कालावधी जास्त दिवस राहिल्यास पिकांची वाढ खुंटते. अन्ननिर्मिती वेग मंदावल्यामुळे फूल, फळधारणेवर परिणाम होतो. कलिंगड, खरबूज पिकाच्या सेटिंगमध्ये अडचण येते. मात्र कोबीवर्गीय पिकांना थंडी फायदेशीर आहे. सध्याच्या काळात पहाटे लवकर पिकांना पाणी द्यावे. वाढीची अवस्था लक्षात घेऊन फवारणीमधून कॅल्शिअम, बोरॉनची शिफारशीत मात्रेत फवारणी करावी.
हापूस आंबा ः कोकणपट्टीत अजून अपेक्षित थंडी नसल्याने केवळ २० टक्के मोहोर फुटलेला आहे. येत्या चार दिवसांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज असल्यामुळे मोहोर फुटण्यास चांगली संधी आहे. काही भागांतील ढगाळ वातावरणामध्ये करपा रोग आणि तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
द्राक्ष ः नाशिक भागात थंडीची लाट असल्याने पिंक बेरी दिसू शकते. घडातील मण्यांची वाढ थांबू शकते. सध्याच्या काळात घड कागदाने झाकावेत. बागेत पाणी देण्याचे प्रमाण वाढवावे. बोध कुळवून मोकळे करावेत. बागेत आच्छादन करावे. त्याचा पुढील काळात फायदा होईल. थंडी, धुक्याचे प्रमाण जास्त असेल तर बागेत पहाटे शेकोटी पेटवून धूर करावा. यामुळे काही प्रमाणात बागेतील तापमान वाढेल.
केळी ः अति थंडी जास्त दिवस राहिल्यास पाने काळी पडतात. फळांवर बारीक ठिपके दिसतात. ढगाळ वातावरण, धुक्यामुळे काही भागात करपा, पानावरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. थंडीच्या काळात पहाटे बागेत धूर करावा. बागेत पाणी देणे आवश्यक आहे.
डाळिंब ः थंडीत वाढ झाल्याने वाढीवर परिणाम होतो. प्रतिकूल वातावरणात बहर धरलेल्या बागेत रसशोषण किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. सेटिंग झालेल्या बागेत फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होईल. फळवाढीच्या अवस्थेतील बागेमध्ये सल्फेटयुक्त खतांचा वापर वाढविण्याची गरज आहे.
संत्रा ः यंदा विदर्भात नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. त्यामुळे भारी जमिनीतून पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात झाला नाही. त्यामुळे आंबिया बहरासाठी पुरेसा ताण बसलेला नाही. सध्या थंडी, धुक्याचे प्रमाण वाढल्याने फुलोरा वाढीवर परिणाम दिसतो आहे, त्यामुळे पुढे फळधारणा उशिरा होईल. हलकी जमीन असलेल्या बागेत ताण बसलेला आहे. मात्र थंडीमुळे फुलोरा वाढ थांबली आहे, त्या ठिकाणी तापमानात वाढ होताच बागेला पाणी देणे आवश्यक आहे.
मोसंबी ः आंबिया बहरातील बागांच्यामध्ये फुलोरा क्रियेत बाधा तयार झाली आहे. ज्या बागेत कळ्या फुटलेल्या आहेत, तेथे मावा किडीचा प्रादुर्भाव दिसेल. मृग बहरातील बागेत आर्द्रता वाढल्याने कोळी, मावा किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. फळांवर चंदेरी काळपट डाग दिसतील. कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी.
केसर आंबा ः मोहोराच्या वाढीवर परिणाम होईल, काही ठिकाणी अति थंडी, धुक्यामुळे मोहोर गळू शकतो. ढगाळ वातावरण जास्त काळ राहिल्यास तुडतुडे, भुरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
शुक्रवारपर्यंत थंडीची लाट...
येत्या शुक्रवार (ता. १३)पर्यंत राज्यात थंडीची लाट कायम राहील. शुक्रवारनंतर दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कमी होऊन तापमान वाढीस लागेल. मात्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले तर पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. परंतु सध्याच्या काळात अतिथंडी पडण्याची फारशी शक्यता दिसत नाही.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.