Water Importance: जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला

आज जमिनीच्या उत्पादकतेएवढेच, किंबहुना त्याहून जास्त पाण्याकडे उत्पादकतेच्या संदर्भातून पाहावे लागेल. दर हजारी लिटरला मिळालेले शेतमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन व्हायला हवे.
water importance in agriculture
water importance in agricultureAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

भाग १

Rural Story : एका गावात यात्रेनिमित्त (Yatra) सभा भरली होती. त्या वेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यापैकीच एक स्पर्धा होती एक किलो शुद्ध पोलादापासून (ज्याची किंमत शंभर रुपये आहे) तुम्ही जास्तीत जास्त किती रुपये कमवू शकाल? पहिल्याने सांगितले, ‘‘एक हजार रुपये सहज करीन मी याचे.’’

दुसऱ्याने सांगितले, ‘‘मी त्याचे पाच हजार रुपये करेन.’’ तिसऱ्याने पन्नास हजार सांगताच चौथ्याने तर कमालच केली. तो म्हणाला, ‘‘मी याचे पाच लाख रुपये करू शकतो.’’ सभा प्रत्येकाच्या उत्तराने अधिकाधिक चकित होत गेली.

सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते. पहिला म्हणाला, ‘‘मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवेन.’’ पुढचा म्हणाला, ‘‘मी याचे नटबोल्ट बनवेन.’’

तिसरा त्यापासून दुचाकीचा ‘कार्बोरेटर’ बनवणार होता. त्याचे ५० हजार रुपये त्याला अपेक्षित होते. तर एक किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या पाच लाखांच्या नाजूक स्प्रिंग्स बनण्यासाठी चौथा उत्सुक होता. या गोष्टीचे तात्पर्य असे, की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे.

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे. एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो.

पण आज जमिनीइतकेच, किंबहुना त्याहून जास्त पाण्याकडे उत्पादकतेच्या संदर्भातून पाहावे लागेल. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन व्हायला हवे.

water importance in agriculture
Digital Farming : पिकांना पाणी आणि खत देणं झालं सोप्पं ? | ॲग्रोवन

का भेडसावतेय पाणी समस्या?

पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा, हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहू. प्रत्येकाच्या वाट्याची जमीन कमी होत गेली. त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले. जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे.

शेतीमालाचे अनिश्‍चित बाजार भाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या पुढ्यात आहेत. पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळे व बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी होत चालली आहे.

लोकसंख्या यापुढेही वाढत राहणार आहे. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमीच होत जाणार आहे. सन १९४७ मध्ये धरण वा साठवलेल्या पाण्यातून १६ टक्के शहरी जनतेला पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा पुरवठा व्हायचा.

आजमितीला ९६ टक्के शहरी लोकसंख्येबरोबरच ८५ टक्के ग्रामीण जनतेला हा पुरवठा होतो आहे. तज्ज्ञांच्या मते सन २०३० पर्यंत वाढलेल्या लोकसंख्येमुळे आजच्या तुलनेत पाण्याची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहे. त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या ५० ते ७० टक्के पाणी खेचणार आहेत.

त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्यपणे कमीच होत जाणार आहे. यासाठीच उपलब्ध जमिनीत व कमीतकमी पाण्यात जास्तीत जास्त ‘बायोमास’ निर्मिती करणे आवश्यक ठरते.

कारण शेतीमालाचे बाजार भाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळेल. आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणारच आहे. यासाठी पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे.

‘बायोमास’ निर्मितीत पाण्याची भूमिका

बायोमास (जैविक वस्तुमान) म्हणजे वनस्पतीचे मूळ, खोड, फांद्या, पान, फुले, फळे हे सर्वच घटक असतात. ते बनण्यासाठी अन्नद्रव्ये आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्‍लेषणातून अन्न किती बनते हे कसे ठरते तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते.

पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला दिवसाला ५० ते ३०० ग्रॅम ‘बायोमास’ तयार होते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त एक ग्रॅम अन्नद्रव्य. एक ग्रॅम पासून २०० ते ३०० ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव ‘फॅक्टरी’ आहे.

वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, एक ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल ३०० ग्रॅम, द्राक्षाचा वेल शंभर ग्रॅम, तर आंब्याचे झाड ५० ग्रॅम ‘बायोमास’ तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्ये जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचवू शकतात.

मुळांभोवती लाभदायक जिवाणू असतात. त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांतील प्रमाणही ठरावीकच असायला हवे. तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठरावीकच असावे. हीच आहे पाण्याची बायोमास निर्मिती भूमिका.

पाण्याची उत्पादकता करण्याचे मोजमाप

गेली तीन वर्षे पाऊस भरपूर पडत असला, तरी हेही लक्षात घेतले पाहीजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्षे येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असतानाच ते आवश्यक इतकेच वापरायची सवय लागणे गरजेचे आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने दोन प्रकारे मोजता येते.

१. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती ‘बायोमास’ तयार झाले?

२. प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले?

या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

water importance in agriculture
Agriculture Irrigation : ...अखेर अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले

अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण

अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त चारशे पीपीएम हवे. (पार्टिकल्स पर मिलियन म्हणजे एक लिटर पाण्यात चार ग्रॅम इतके प्रमाण). यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडते. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना गुदमरायला होते.

त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयचे शोषण यावर होतो. याचा परिणाम अर्थातच ‘बायोमास’ची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होतो. झाडाच्या आरोग्यावरही ‘बायोमास’ निर्मिती अवलंबून असते.

झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रण ठेवण्याच्या यशस्वितेत! ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते. म्हणजेच पानांच्या श्‍वसनातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर. पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो हवेचे तापमान, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा एकूण वेळ यावर.

पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते झाडाची पाण्याची गरज. या सर्व शास्त्रीय बाबी समजून घेतल्या की ‘ड्रॉप’ व ‘क्रॉप’चे गणित समजते. त्यावरून ‘बायोमास’ निर्मितीचे आणि त्यावरून उत्पादकतेचे! पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज किती हे लक्षात येते.

लेखक परिचय

पुणे स्थित सतीश खाडे हे स्थापत्य अभियंता असून, बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याचबरोबर ते जल व पर्यावरण अभ्यासक आहेत. ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. ते ‘रोटेरीअन’ असून, रोटरी क्लब्ज च्या माध्यमातून एकशेतीसपेक्षा अधिक गावांत पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पुढाकारातून प्रकल्प साकारले आहेत. ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर या विषयावरील त्यांचा शोधनिबंध चर्चेत आहे.

संपर्क ः सतीश खाडे, ९८२३०३०२१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com