Climate Change : वातावरण बदल, पाणी यांचा परस्परसंबंध

स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पाणी संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. मॅलीन लूंडबर्ग म्हणतात, ‘आज तापमान १ अंशाने वाढलेले असताना आपणास अनेक बदल दिसून येतात.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

वातावरण बदलावर पाण्याचा परिणाम कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाचा ‘वातावरण बदलाशी जुळवून घेण्यामध्ये ताज्या पाण्याची भूमिका’ (UNDP Freshwater Role in Climate Change Mitigation) हा अभ्यासू अहवाल निश्‍चितच सर्वांचेच डोळे उघडणारा आहे.

मागील दोन वर्षांपासून शास्त्रज्ञ पाणी आणि वातावरण बदल (Climate Change) यांचा परस्परातील संबंधावर सातत्याने संशोधन करत आहेत. यामध्ये पाणी व्यवस्थापन (Water Management) म्हणजे सांडपाणी प्रक्रिया, ऊर्जानिर्मिती, अन्न निर्मिती (Food Production) आणि पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक घटकांचा समावेश आहे.

वातावरण बदलामुळे गोड्या पाण्याची निर्माण होत असलेली कमतरता जैवविविधतेच्या ऱ्हासाबरोबरच, भूक आणि ऊर्जा निर्मितीस जोडलेली आहे. वाहत्या पाण्याचा ओघ कमी झाल्याने किंवा थांबल्यामुळे जगामधील अनेक जलविद्युत केंद्रे बंद पडत आहेत.

परिणामी, ऊर्जा क्षेत्रात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे उदाहरण आपल्याला चीनमधील घटनांमधून दिसते. आफ्रिकेमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे तहान भागविण्याच्या उद्देशाने प्राण्यांचे स्थलांतर होत आहे.

कित्येक ठिकाणी कृषी उत्पादन थांबलेले आहे. अशा गरीब राष्ट्रांना अन्नपुरवठा करणाऱ्या जागतिक अन्न कार्यक्रमावरील दबाव सातत्याने वाढत आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचा ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (IPCC) हा गट सातत्याने सर्व जगाला पाण्याच्या कमतरतेबद्दल जागृत करत आहे. त्यांच्या ‘Essential Drop to Reach Net Zero’ या अहवालानुसार पाण्याअभावी अनेक परिसंस्थांची अवस्था बिकट होत चालली आहे.

अनेक पाणथळ भूमी दलदलीत रूपांतरित होत आहेत. त्यातून वातावरणात हानिकारक अशा हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि साठवण होत आहे. हरितगृह वायूच्या उत्सर्जनापेक्षा त्यांची साठवण अधिक धोकादायक ठरते.

ॲमेझॉनचे विस्तीर्ण जंगल हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. येथे वृक्षतोड वाढत चालल्याने नद्या उघड्या पडत आहेत. उघड्या पडलेल्या नद्या आटत असून, त्यांचे दलदलीमध्ये रूपांतर होत आहे.

या दलदलीमध्ये मिथेन वायूची निर्मिती होऊन, त्याचा परिणाम ॲमेझॉनच्या जंगलामध्ये वणवे पेटण्यामध्ये होत आहे. पाण्याअभावी जगामधील सर्वांत मोठी परिसंस्था कशी संकटास सामोरी जात आहे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Climate Change
Cold Weather : हवेतील गारव्यामुळे गव्हाचे पीक जोमात

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत जास्त गोड पाणी बर्फाच्या रूपात उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर साठवलेले आहे. हा हजारो वर्षांपासूनचा बर्फ शेकडो मीटर खोल आहे.

वाढत्या जागतिक तापमानामुळे ध्रुवावरील हा बर्फ वेगाने वितळत आहे. हे सर्व गोड पाणी दक्षिण महासागर आणि आर्टिक समुद्रात मिसळून खारे होत आहे. समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे.

आजवर बर्फाखाली दबलेली जमीन उघडी पडत आहे. त्यात हजारो वर्षापासून साठवलेला कर्ब आणि मिथेन वायू ध्रुवीय वातावरणात प्रवेश करत आहे. या भागातील लाखो मैल क्षेत्रावर पसरलेल्या बर्फामुळे सूर्य किरणे परावर्तित होतात.

तेथील वातावरण काही प्रमाणात उबदार राहते. मात्र बर्फ वितळल्याने खालील दलदलीतून बाहेर पडत असलेला कर्ब आणि मिथेन वायू परावर्तित सूर्यकिरणास अडवत आहे. या दुहेरी माऱ्यामुळे वातावरण अधिक उष्ण होत आहे.

या वाढलेल्या उष्णतेमुळे पुन्हा बर्फ वेगाने वितळत आहे. पाणी, वातावरण बदल आणि जागतिक तापमान हे एकमेकांस कसे जोडले आहेत याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

जागतिक तापमानाचा परिणाम ः

‘COP२५’ च्या पॅरिस मंचाचा आधार घेऊन ‘The Emission

Gap Report २०२२ : The closing window’’ हा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये २०३० पर्यंत जर जागतिक तापमान १.५ अंशाने कमी न झाल्यास वातावरण बदलाच्या भयंकर परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

या अहवालातील पाच मुख्य मुद्दे असे,

१) पाकिस्तानमध्ये आलेला महाभयंकर पूर आणि त्यामुळे विस्थापित झालेले, ३० दशलक्ष लोक.

२) आफ्रिकेचे शिंग (Horn of Africa) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथोपिया, सोमालिया, केनिया, दक्षिण सुदान या देशांमध्ये पडलेला महाभयंकर दुष्काळ.

३) उत्तर गोलार्धावरील उष्णतेच्या लाटा, त्यामुळे लागलेले हजारो वणवे.

Climate Change
Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

या तीनही घटना औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत १.१ अंशाने वाढ झाल्याचा परिणाम आहेत. आता भविष्यात त्यात थोडी जरी भर पडली तरी त्याचे परिणाम अतिशय हानिकारक असणार आहे.

शास्त्रज्ञाच्या मते, ‘‘सध्याचे वैश्‍विक तापमान सरासरीपेक्षा १.५ अंशाने जास्त म्हणजे २ अंशाला स्पर्श केल्यास ग्रीनलँड हा देश वितळून जाईल. आज या देशात ८० टक्के बर्फ असून, गेल्या दोन दशकांपासून हळूहळू कमी होत आहे. २०१७ मध्ये या देशाची लोकसंख्या ५८ हजार होती, आज ती जेमतेम अर्धीच आहे. लोकांचे स्थलांतर वेगाने वाढत आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘विकृत जीवनशैलीचा वेगाने चालणारा रथ आणि विकासाचा घंटानाद असतो, तिथे वातावरण बदलाचा परिणाम कसा समजणार? जेव्हा समजेल तेव्हा या पाण्यानेच या संपूर्ण देशाला गिळंकृत केलेले असेल. बरे त्याचा दोष कुणाचा? या देशामध्ये मासेमारी करून सुखाने जगू पाहणाऱ्या स्थानिक आदिवासींचा की ज्यांनी वातावरण बदलाची समस्या निर्माण केली आहे त्यांचा?’’

पाणी जपून वापरूया...

‘पाणी आणि पाणी व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यास करताना आपण ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ असा विचार करून चालणार नाही. पाणी हे प्रत्येक जिवाचे जीवन आहे. ते केवळ तहानच भागवते असे नाही, तर अन्नही पुरवते.

प्रत्येक जिवाच्या हृदयाची धडधड ही पाण्यामुळेच असते, कारण रक्त हेच मुळी ९० टक्के पाणी आहे. अशा या जलदेवतेचा आपण सन्मान का करू नये? आफ्रिका खंडामधील देशामध्ये पाण्याची कमतरता इतकी आहे, की एक बादली पाण्यात कुटुंबातील सर्व लहान मुले एकापाठोपाठ एक बसवून अंघोळ उरकली जाते.

अशा वेळी आपण दोन, तीन बादल्या डोक्यावर घेऊन पाण्याचा नाश करणे हा नक्कीच पाण्याचा सन्मान असू शकत नाही.

Climate Change
Weather Update: कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच | ॲग्रोवन

उलट ज्याच्याकडे मुबलक पाणी आहे, त्यांनी ते जपून वापरण्याचा विचार केला पाहिजे. मग ते शेतीसाठी असो की वापरण्यासाठी! पाण्याचा सन्मान म्हणजे पाणी व्यवस्थापन. ते शिकण्यासाठी कुठल्याही विद्यापीठात जाण्याची गरज नाही.

आपल्या पूर्वजांनी सांभाळलेला वारसा, वाहत्या नद्या, विहिरी, बारव, घरोघरचे आड, लागेल तेवढेच पाणी उपसणारा पोहरा, रहाट आणि गाडगे हे जपले तरी होईल खरे पाणी व्यवस्थापन.

मला आठवते, माझे आजोबा पहाटेच वाहत्या नदीवर जाऊन ओंजळीत तिचे स्वच्छ पाणी घेऊन आधी नदीला अर्घ्य देत. नमस्कार करून म्हणत, ‘‘माय! अशीच बारमाही वाहत राहा.’’ अशाच भोळ्या भाबड्या श्रद्धेतून पाणी जपले जाई.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com