Loksabha Election 2024 : व्यवस्थेवर मूठभरांचा ताबा नको

PM Narendra Modi : विरोधकांनी आपला विरोध मोदीकेंद्रित ठेवू नये. मोदी चालणार नसेल तर मोदींना पायउतार करून दुसरा रोबोट तयार करायची क्षमता या व्यवस्थेत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Agrowon

नीरज हातेकर

Indian Media : विरोधकांनी आपला विरोध मोदीकेंद्रित ठेवू नये. मोदी चालणार नसेल तर मोदींना पायउतार करून दुसरा रोबोट तयार करायची क्षमता या व्यवस्थेत आहे. मोदी चालणार नसेल तर व्यवस्था नवीन रोबोट- लोकाना आवडेल, रुचेल असा- तयार करेल. उत्तर रोबोट बदलून मिळणार नाही. उत्तर व्यवस्थेवरील मूठभर लोकांचा ताबा उठवून मिळेल. त्यासाठी आपणच जागृत झाले पाहिजे. पाच वर्षांतून एकदा मत देणारा मतदार हे मॉडेल सोडून सातत्याने जागरूक असलेला नागरिक व्हावे लागेल.

लोकसभा निवडणुकीचा निकाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असले तरी भाजपला एकट्याला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवली त्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे अपयश डोळ्यांत भरणारे आहे. मोदींची जादू फिकी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदींची प्रतिमा प्रसार माध्यमांनी (मीडिया) अवास्तव फुगवली. सगळे प्रश्‍न एकहाती सोडविणारा हीरो फक्त फॅंटम कॉमिक्समध्ये असतो. वास्तवात तो नसतो. भारतासारख्या विशाल, गुंतागुंतीच्या, बहुपेडी देशात तर कधीच नसतो. इथे प्रत्येक प्रश्‍नाला दहा पैलू असतात, अनेक हितसंबंध असतात. म्हणून सगळ्यांचे ऐकून घेऊन, विश्‍वासात घेऊन, मध्यम मार्ग काढावा लागतो. म्हणून वेळ लागतो पण प्रश्‍न सुटतात.

फक्त दोन माणसे हा देश चालवूच शकत नाहीत. तशी कल्पना कोणी करत असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे. मोदींनी गेल्या दहा वर्षांत अनेक घोषणा केल्या, योजना आखल्या; पण त्यापैकी एकही पूर्णत्वास गेली नाही. काश्मीरमध्ये सुद्धा तेच झाले. एकतर्फी ३७० कलम रद्द करणे तुलनेने सोपे आहे. ते सैन्याच्या, प्रशासनाच्या मदतीने करता येऊ शकते. पण नंतर आवश्यक असलेली राजकीय प्रक्रिया नीट स्थापन करण्यासाठी संवाद लागतो, सर्वसंबंधित घटकांचा विश्‍वास संपादन करावा लागतो, लोकांचे ऐकून घ्यावे लागते. प्रत्यक्षात ते झाले नाही. त्यामुळे काश्मिरमध्ये अजूनही परिस्थिती सामान्य झालेली नाही. लडाखमध्ये अजून सद्धा आंदोलन सुरूच आहे. भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये काश्मीरमध्ये उमेदवारसुद्धा देऊ शकले नाही. राज्यशकट हाकताना कामे नीट मार्गी लागावीत म्हणून व्यवस्था उभ्या कराव्या लागतात. त्यासाठी व्यापक संमती लागते. नरेंद्र मोदी- अमित शाह यांना अशा व्यापक व्यवस्था उभ्या करण्यात अपयश आले. म्हणून मोदींकडून योजनांच्या घोषणा तर होतात; पण त्या शेवटास जात नाहीत.

PM Narendra Modi
Loksabha Election Result 2024 : शेतकरीविरोधी धोरण भाजपला महागात पडले

हे असे का घडते? यामागे मोदी आणि शाहांची सर्व राजकीय ताकद आपल्याच हातात एकवटून ठेवण्याची वृत्ती जबाबदार आहे. वेगळा विचार छाटून टाकायचा, विरोधकांना दंडेली करून गप्प करायचे, साम-दाम- दंड- भेद वापरून सत्ता राबवायची याला सक्षम नेतृत्व म्हणत नाहीत. याला हुकूमशाही म्हणतात. सक्षम नेतृत्व व्यापक सर्वसंमती घडवून आणते. दडपशाही हे कमजोर नेतृत्वाचे लक्षण असते.

व्यवस्थेचा सापळा
‘मोदी म्हणजे सगळ्या प्रश्‍नांवर रामबाण उत्तर’ हे मीडियाने उभे केलेले चित्र आहे. याला सामान्य माणूस भुलला; पण स्वतः मोदीसुद्धा भुलले. मीडियाने नेत्यांचेही ‘ब्रेनवॉश’ केले. आपण दैवी अंश वगैरे असल्याचा मोदींचा भ्रम त्यातूनच निर्माण झाला.

PM Narendra Modi
Loksabha Election 2024 : लंके यांनी घेतली निर्णायक आघाडी

मीडियाने असे का केले? कारण भारतीय भांडवलशाहीची ती आवश्यकता होती. आदर्श भांडवलशाही स्पर्धेवर आधारलेली असते. स्पर्धेतून सामान्यांच्या श्रमाची उत्पादकता वाढते. सामान्यांची क्रयशक्ती वाढते. त्यातून बाजारपेठ विकसित होते. विकसित बाजारपेठेतून पुन्हा श्रमाची उत्पादकता वाढते. अशा व्यवस्थेतून सगळ्यांचा विकास होतो. पण एकाधिकारशाहीवर आधारित भांडवलशाहीत मात्र हे होत नाही. या व्यवस्थेला स्पर्धा नको असते. उलट सगळी सत्ता एकवटून स्पर्धा रोखून खूप नफा कमावण्यावर ही व्यवस्था भर देते.

आपल्या देशात गेल्या दहा वर्षांत आर्थिक विषमता खूप वाढली. वरच्या १ टक्का लोकांकडे ४५ टक्के संपत्ती, २५ टक्के उत्पन्न आहे. सगळीच व्यवस्था या लोकांसाठीच चालते. (पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण घडले त्यातून हेच दिसले.) या व्यवस्थेत सर्वसामान्य लोकांना हाताला काहीच लागत नाही. निती आयोगाने गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा जो अहवाल दिलाय, तो चुकीचा आहे. ही संख्या जास्तीत जास्त ७.५ कोटी आहे. मी सगळी आकडेवारी तपासून पहिली आणि सगळे हिशेब पुन्हा केले. त्यातून काढलेला हा निष्कर्ष आहे.

सामान्य लोकांना फुकट धान्य, घरकुल योजनेखाली खुराडी वगैरे दिली की लोक खुश होतील आणि थंड राहतील ही या व्यवस्थेची धारणा आहे. उंची हॉटेलमध्ये पोटभर जेऊन येणारे लोक बाहेर पडता पडता पदराआड पोर घेऊन भीक मागणाऱ्या बाईला पाच रुपयांचे नाणे टाकून धन्यता मांडतात तसे. पण भारतातील ‘लाभार्थी’ हे भिकारी नाहीत; नागरिक आहेत. त्यांना तुकडे टाकले की ते खुश होऊन आपल्याला मते देतील असे समजणे म्हणजे या माणसांचा, देशाच्या नागरिकांचा अपमान आहे, हे या व्यवस्थेतील सुजलेल्या बुद्धीला समजत नाही. राजदीप सरदेसाईसारख्या अनेक उच्चभ्रू राजकीय विश्‍लेषकांनासुद्धा ही समज नाही, तर सामान्य मीडियाला कुठून येणार? हा केवळ अडाणीपणा नाही. गरिबाला ‘माणूस’ समजण्याच्या ऐवजी निव्वळ ‘लाभार्थी’ समजणे ही या व्यवस्थेची गरज आहे. सामान्य लोकांना लाभधारक नव्हे तर नागरिक म्हणून देशाच्या व्यवस्थेतील भागधारक समजायचे असेल तर व्यवस्थेत त्यांना पुरेसा वाटासुद्धा द्यावा लागेल. मग सत्तेवर आपला एकाधिकार कसा राहणार? हे ‘लाभार्थी मॉडेल’ सत्तेवर ताबा ठेवण्याच्या गरजेतून आले आहे.

सत्तेचे केंद्रीकरण
आजघडीला सत्ता खऱ्या अर्थाने मोठे भांडवलदार, धनदांडग्यांच्या हातात एकवटली आहे. यांना स्पर्धा वाढवून, नवीन निर्मिती करून धंदा वाढवायचा नाहीये, तर त्यांना सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवून पैसे कमवायचे आहेत. त्यांची धोरणे राबविण्यासाठी इतर कोणताही विचार न करू शकणारा रोबोट (यंत्रमानव) त्यांना हवा असतो. या रोबोटच्या मेंदूचा संपूर्ण ताबा या मंडळींच्या हातात असतो. एका अर्थाने मोदी हे असा रोबोट आहेत. पण लोकशाहीत या रोबोटबाबत व्यापक विश्‍वास निर्माण करायला लागतो. कारण लोकांनी या रोबोटला निवडून देणे आवश्यक असते. म्हणून मग सगळ्या मीडियावर ताबा स्थापन करून या रोबोटला ‘सुपरमॅन’ म्हणून उभे करावे लागते. त्या सोबतच या प्रकल्पाला उपयोगी पडेल अशी धार्मिक उन्माद, लोकांची श्रद्धा, ‘हिंदू खतरे मे है’सारखी भीती वगैरे मिळतील ती साधने वापरावी लागतात. हा कार्यक्रम भारतात दहा वर्षे तरी उत्तम चालला. एका सामान्य कुवतीच्या, सुमार वकुबाच्या व्यक्तीला ‘अजेय महामानव’ म्हणून पुढे आणले गेले. सामान्य लोक तर या सगळ्याला भुललेच; पण खुद्द रोबोटसुद्धा स्वतःला परमेश्‍वराचा अंश मानायला लागला. हे त्या कार्यक्रमाचे वादातीत यश. डोके गहाण टाकलेल्या भक्तांच्या टोळ्या ही या व्यवस्थेची गरज आहे.

पण लोकशाहीची गंमत पाहा. लोकांना या पडद्यामागच्या गोष्टी समजल्याच की. हा कठपुतलीचा खेळ समजला. मग त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून चाप लावला. ही निवडणूक लोकांनी चालवली. राहुल गांधी, शरद पवार वगैरे माध्यमे आहेत फक्त. जो निकाल आलाय तो मोदींचे समर्थन करणारा नाही. A known devil is better than an unknown one या न्यायाने लोकांनी मतदान केले. पण याचा अर्थ या रोबोटच्या मेंदूत बसवलेले सॉफ्टवेअर बदलेल असे नाही. तो त्याच आधीच्या प्रोग्रॅमनुसार चालणार. पण व्यवस्था हुशार असते. ती आता एकापेक्षा अधिक रोबोट निर्माण करायला लागेल.

त्यामुळे विरोधकांनी आपला विरोध मोदीकेंद्रित ठेवू नये. मोदी चालणार नसेल तर मोदींना पायउतार करून दुसरा रोबोट तयार करायची क्षमता या व्यवस्थेत आहे. मोदी चालणार नसेल तर व्यवस्था नवीन रोबोट- लोकाना आवडेल, रुचेल असा- तयार करेल. उत्तर रोबोट बदलून मिळणार नाही. उत्तर व्यवस्थेवरील मूठभर लोकांचा ताबा उठवून मिळेल. त्यासाठी आपणच जागृत झाले पाहिजे. पाच वर्षांतून एकदा मत देणारा मतदार हे मॉडेल सोडून सातत्याने जागरूक असलेला नागरिक व्हावे लागेल. राजकीय पक्ष लोकशाहीत आवश्यक असतात. पण त्यांच्यावर व्यवस्थेचा ताबा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. आज भाजप या व्यवस्थेकडून पूर्णपणे अंकित (कॅप्चर) झाला आहे. भाजपमधील ज्या लोकांना हे समजते त्यांना आवाज उरलेला नाही.

उसाला कोल्हे लागायला वेळ लागत नाही. आपणच राखण करायला पाहिजे. या निवडणुकीत नागरी संघटना (सिव्हिल सोसायटी) बऱ्यापैकी कार्यरत झाल्या. हे प्रमाण वाढवायला पाहिजे. लोकांनी नागरिक बनून रस्त्यावर येण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपले घर आपणच सांभाळले पाहिजे. राजकारण हा निव्वळ करमणुकीचा विषय नाही. राजकारण ‘आउटसोर्स’ करण्याचा विषय तर अजिबातच नाही. त्यामुळे काठावर बसून राहण्यात हशील नाही, आपल्याला खोल पाण्यात उतरलेच पाहिजे.
—-------------
(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ असून, अझीम प्रेमजी विद्यापीठात अध्यापन करतात. लेखातील मते लेखकाची वैयक्तिक असून त्यांच्याशी संबंधित कोणतीही संस्था या मतांशी सहमत असेलच असे नाही.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com