Health Awareness : शेती आणि आरोग्यभान जपूया...

Farming and Health : एक बागायतदार शेतकरी मला खास भेटायला आले होते. त्यांना सेंद्रिय शेतीबद्दल आपुलकी वाटत होती. त्यांच्याशी दोन तास बोलणे झाले. त्यांच्या गावात अजून कोणकोणते आजार असावेत, कॅन्सर, मधुमेह सारखे आजार घेऊन जगणारे किती लोक गावात आहेत, नवीन पिढीचे कोणते प्रश्न आहेत.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Health-Conscious Farming :

मला नुकतेच एक बागायतदार शेतकरी भेटले. त्यांच्याशी असा संवाद झाला.

मीः आज सकाळी कोणती भाजी खाल्ली?

शेतकरीः वड्यांची काळी भाजी

मीः काल रात्री?

शेतकरीः पिठलं

मीः काल सकाळी ?

शेतकरीः मटकी

मीः मागच्या आठ दिवसांत तुम्ही खाल्लेल्या भाज्या सांगा.

शेतकरीः डाळ, मटकी, वडे, पिठलं असेच. जास्तीत जास्त दोडका, वांगी, वाल. वाल घरचा होता. बाकी भाज्या बाजारातून आणल्या होत्या.

मीः जमीन किती आहे तुम्हाला?

शेतकरीः ५० एकर. पाणी वगैरे सगळं आहे. मिश्र पीक करायचे होते म्हणून नऊ धारी पेरणीयंत्र विकत घेऊन ठेवलं आहे.

घरापुरता तरी भाजीपाला करता का, हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना वरील प्रश्न विचारले असता त्यांनी अगदी खरी माहिती दिली. परसबागेसाठी वेगळी जागा नाही. बांधावर सुद्धा वेलवर्गीय भाज्या लावल्या जात नाहीत. प्रत्येक बी-बियाणे बाजारातून येते. जमिनीची किंमत ती किती उत्पादन देते यावरून होते. मुली चांगल्या दर्जाचे उच्चशिक्षण घेत आहेत. भाऊ आणि भावाची मुले देखील चांगल्या ठिकाणी नोकरी करतात.

Agriculture
Indian Agriculture : संघर्षातून उभारले शेतीचे नंदनवन

घरदार सगळे व्यवस्थित आहे. म्हणजे पक्के घर, गावातील श्रीमंत व प्रतिष्ठीत कुटुंब. पण काही समस्या आहेत. त्यांच्या ४२ वर्षांच्या बायकोला उच्च रक्तदाब व मधुमेह आहे. वजन ८० किलो. आई कॅन्सरने गेली. वडिलांना फुफुसाच्या कॅन्सरची औषधं सुरु आहेत. शेजारच्या एकाच्या वडिलांना आताच कॅन्सरचं निदान झालं. गावात असे कॅन्सर पेशंट खूप आहेत आणि तरीही सगळे आलबेल सुरु आहे. जास्तीत जास्त रसायने, जास्त उत्पादन.

हे बागायतदार शेतकरी मला खास भेटायला आले होते. त्यांना सेंद्रिय शेतीबद्दल आपुलकी वाटत होती. त्यांच्याशी दोन तास बोलणे झाले. त्यांच्या गावात अजून कोणकोणते आजार असावेत, कॅन्सर, मधुमेह सारखे आजार घेऊन जगणारे किती लोक गावात आहेत, नवीन पिढीचे कोणते प्रश्न आहेत, काही नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मुले होण्यात अडचण येत आहे का, प्रत्येक शेतकरी कर्ज घेतो का, असेल तर किती कर्ज असावे, पोषण, अन्नविविधता आणि संतुलित आहार याबद्दल जागरूकता आहे का, सतत खते व रसायनांचा वापर करून जमिनी कशा बनल्या असतील, आजकाल बाजारात सूक्ष्मपोषके खूप विकले जात आहेत, त्याची गरज आताच का पडत आहे, असे अनेक प्रश्न मी त्यांना विचारले.

निफाड तालुका हा मोठ्या प्रमाणात कांदा घेणारा. १९९० किंवा कदाचित त्याही खूप आधीपासून येथे द्राक्ष पीक आहे. आमच्या आजीचे काका येथे त्यावेळी द्राक्ष शेती करत. आज्जी तिच्या नव्वदीनंतर गेली. त्यालाही आता १५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला. नुकतेच धरणामुळे पाणी आलेले होते. गोदावरी, प्रवरा, मुळा असा समृध्द नद्यांचा परिसर. काळ्या कसदार मातीने व्यापलेला भूभाग.

इथला शेतकरी मुळातच कष्ट करणारा व अभ्यासू. शेती करता येणे हाही एक मोठा अभ्यास असतो. त्यातूनच आधुनिक शेतीची कास धरून इथले शेतकरी लवकर प्रगत झाले. पण हे सर्व करताना ‘आहारभान’ कधी विसरले हे त्यांनाही समजले नसावे. अजूनही किती उमजले हे सांगता येणार नाही. आपल्याकडे शेतकऱ्याला ‘अन्नदाता’ म्हणतात. पण आमचा अन्नदाताच आज आजार आणि कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.

Agriculture
Healthy Food : आली थंडी..बदला आहार !

आज आम्हा सर्वांना खाण्यासाठी भरपूर अन्न उपलब्ध आहे, दूध-दुभते मुबलक आहे, इच्छा व पैसे असतील तर बाजारात भाज्या-फळे हवी तेवढी मिळतात. एकूणच सुबत्ता आली आहे असे वाटावे. मग आमचा शेतकरी आज समाधानी का नाही? आमच्या कामगारांना बीपी, स्ट्रोक, लकवा असे अनेक आजार का होत आहे? माझ्या घराच्या जवळ कामगार नगर आहे. इथल्या कुटुंबाचे आरोग्याविषयीचे प्रश्न मी फार जवळून बघत आहे.

अस्वच्छतेमुळे येणारे आजार समजू शकतो, पण मानसिक आजारांचे काय? अतिकष्ट व तणाव जसा कामगार अनुभवत आहेत तसे शेतकरी देखील अनुभवत आहेतच की. नाहीतर मधुमेह इतका साधारण आजार का व्हावा? कुटुंबातील अर्धे सदस्य जर अशा आजारांनी ग्रस्त असतील तर नेमके काय बदलले आहे, याचा अभ्यास करायलाच हवा.

दुसरीकडे आम्ही ज्या आदिवासी शेतकऱ्यांसोबत काम करत आहोत त्यांची पारंपारिक शेती, जंगलातून मिळणारे अन्न, देशी बियाणांचा वापर, रसायनांचा कमीत कमी वापर, पौष्टिक अन्नधान्यांचा आहारात वापर, कमीत कमी दुग्धजन्य व चरबीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी आजार व निरोगी जीवनशैली ही वैशिष्ठ्ये स्पष्टपणे जाणवतात. आम्ही तीन वर्षांपूर्वी आयआयटी, मुंबई सोबत आमच्या अकोले तालुक्यातील दोन आदिवासी गावे आणि दोन खालच्या भागातील बागायती शेतकरी गावे यांचा तीन वर्षांचा अभ्यास प्रकल्प पूर्ण केला.

या दीर्घ अभ्यासानंतर असेल लक्षात आले की, वरच्या भागापेक्षा खालच्या भागात आजार व लठ्ठपणा यांचे प्रमाण वाढलेले आहे. खालच्या भागातील लोकांच्या जेवणातील विविधता तुलनेत कमी आहे, तर वरच्या भागातील लोकांचे जेवण वैविध्यपूर्ण आहेत, त्यात रानभाज्यांचा मोठा वाटा आहे. तसे पहिले तर आमच्या अकोले तालुक्यातील बागायती शेतकरी देखील सुज्ञ आहेत. घरी खाण्यासाठी धान्य तो स्वतःच पिकवतो.

भाजीपाला देखील काही प्रमाणात करतो. पण निदान घरी खाण्यासाठी तरी बिना रसायनांचे उत्पादन घेण्याकडे कल नाही. ‘आजकाल बिना खताचे काही होतच नाही,'' हे त्यांचे नेहमीचे पालुपद असते. वास्तविक प्रश्न आहे, तर उत्तर पण असते आणि ते आमच्या शेतकऱ्यांकडेच आहे. फार तर काही तज्ज्ञ त्यांना मदत करू शकतात. पण तोडगा अंमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती हवी.

अन्नदाता-अन्ननिर्माता सक्षम असेल तर पुढची पिढी आणि देश आरोग्यदायी असेल. शेतकरी अन्न देतो तर कामगार आमचे जीवन अनेक अर्थांनी सुखकर बनवतो. आमच्या या दोन भक्कम स्तंभांना आधार देण्याची गरज आहे. त्यामध्ये अर्थातच अन्नाचा मोठा वाटा आहे. सर्वांना आपल्या आवडीचे, पोषक व प्रदूषणमुक्त अन्न मिळावे, हा माणूस म्हणून आमचा नैसर्गिक अधिकार व आवश्यकता आहे. याकडे व्यक्ती, समूह व शासन यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीने याचा विचार प्रथम करावा. त्यासाठी आहारभान या सदराच्या या शेवटच्या लेखात व २०२५ हे नवीन वर्ष उजाडायला अवघे काही दिवस शिल्लक असताना आपण एक निर्धार किंवा प्रतिज्ञा करुयात :

‘मला आरोग्यासाठी योग्य असलेले व माझ्या ‘चॉइस’ चे अन्न मिळण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. असे पोषक अन्न उपलब्ध व्हावे म्हणून ही पूर्ण प्रयत्न करेल व यासाठी सजग व तत्पर राहीन.

मी जर शेतकरी असेन तर माझ्या शेतीतून अशी पिके घेण्याचा प्रयत्न करेन किंवा माझ्या कुटुंब व मित्रांसाठी असे अन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या मुलांना पौष्टिक अन्न देण्याची जबाबदारी माझी आहे व मी ती निभावीन.

मी जर जागरूक उपभोक्ता ग्राहक असेल तर योग्य आहार काय आहे, याचा अभ्यास करेन. असे अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी मी उभा राहीन, त्यांनी पिकवलेले रसायन अवशेषमुक्त अन्न, त्याचा दर्जा लक्षात घेऊन, कोणतेही आर्थिक शोषण होऊ न देता योग्य मोबदला देईन व माझ्या आहारात त्याचा समावेश करेन. पूर्वजांनी जपलेल्या पारंपारिक बियाण्यांची वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर असलेली उपयुक्तता व आहारातील आवश्यकता याची मला पूर्ण जाण आहे. अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे ही माझी जबाबदारी आहे. ती निभावण्यासाठी मी तत्पर राहीन व इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करेन.'

हा निर्धार नवीन वर्षात सुफळ,

संपूर्ण होवो, या सदिच्छा!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com