Shrikant Gore : 'शेती-माती'ची जीवनशैली स्विकारलेले डॉ. श्रीकांत गोरे!

वयाच्या साठीपर्यंत डॉक्टरी व्यवसाय केलेला माणूस स्वत:ला असं शेतीत झोकून देतो, हे कौतुकास्पद आहे. शेती हा असा व्यवसाय आहे जिथं दररोज काही ना काही गुंतवणूक करावीच लागते.
Shrikant Gore : 'शेती-माती'ची जीवनशैली स्विकारलेले डॉ. श्रीकांत गोरे!

- महारुद्र मंगनाळे

गोरेवाडीतील डॉ.श्रीकांत गोरे यांच्या शेतावर जाऊन बरेच दिवस झाले होते. परवा उस्मानाबादला मुक्काम झाला त्याच दिवशी ठरवलं की, त्यांची शेती बघूनच यायचं. ढोकीच्या पेट्रोल पंपावर उतरलो. डॉक्टरांच्या गाडीत थेट शेतावर पोचलो. अवघ्या तीन वर्षांत त्यांनी शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकलाय.सध्याच्या काळात शेती करण्यासाठी भरपूर भांडवल लागते,जोखीम घेण्याची व नुकसान सहन करण्याची तयारी पाहिजे. शिवाय आवड व अभ्यासही पाहिजे.

या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. वयाच्या साठीपर्यंत डॉक्टरी व्यवसाय केलेला माणूस स्वत:ला असं शेतीत झोकून देतो, हे कौतुकास्पद आहे. शेती हा असा व्यवसाय आहे जिथं दररोज काही ना काही गुंतवणूक करावीच लागते. तिचा परतावा मिळेलच याची कसलीही खात्री देता येत नाही. इतर व्यवसायातील गुंतवणूक व शेतीतील गुंतवणूक यात हा मुलभूत फरक आहे. त्यामुळं अशी शेती करण्यासाठीतुमची विशिष्ट मनोवृत्ती लागते. माझ्याप्रमाणेच डॉक्टरांनीही शेती ही जीवनशैली म्हणून स्विकारली आहे. याबाबतीत ते दोन पावलं माझ्याही पुढं आहेत.

मी शेतीत राहूनही इतर उपद्व्याप करतो. डॉक्टर अभ्यासपूर्ण शेती करतात. माझं शेती करणं निसर्गात राहण्यापुरतं आहे. बाकी शारीरिक कष्ट करणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे. वयाला, प्रकृतीला झेपतील असे कष्ट डॉक्टरही करतात. डॉक्टरांची मोठी शेती आहे. शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं तर, त्यांचा पसारा लईच मोठा आहे. तीन वर्षांपासून शेती करायला सुरू केल्यापासून त्यांनी दोन बाबींवर लक्ष केंद्रीत केलंय. एक जमिनीची सुपिकता वाढवणे आणि पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे. जमिनीतील कर्ब वाढविण्यासाठी बरू, धैंचा पेरून तो गाडण्याचे यशस्वी प्रयोग त्यांनी केलेत. बांध छोटे करून, तिथं निघालेली माती वावरात टाकली.

Shrikant Gore : 'शेती-माती'ची जीवनशैली स्विकारलेले डॉ. श्रीकांत गोरे!
Onion And Coriander Market : सोलापुरात कांदा आणि कोथिंबीरीने शेतकऱ्याच्या डोळ्यात आणले पाणी

कारखान्याकडं विकत मिळणारा गांडूळ व इतर खत आणून जमिनीत टाकला. शेणखतासाठी सहा गाई ते सांभाळताहेत. सात-आठ शेळ्या, पंधरा-सोळा कोंबड्या,असं सगळं काही आटोपशीरपणे केलयं. शेतीत राहणाऱ्या माणसांसाठी संंडास - बाथरूमसह खोली बांधलीय. तशीच एक स्वत:साठी. सामानासाठी पत्र्याचं गोडावून. चाऱ्यासाठी शेड. पाण्याची उंच छोटी टाकी. शेतात सगळी फळझाडं आहेत. ऊस आहे. जनावरांसाठी गजराज,मेथी घास आहे. ज्वारी आहे आणि दृष्ट लागेल असा राजमा.

पाण्यासाठी एकास लागून एक अशी दोन शेततळी आहेत. तीन विहिरी, बोअरवेल आहेत. भरणाचे प्रयोग केलेत. मी तीन वर्षांपूर्वी पाहिलेलं शेत ते हेच का? असा मला प्रश्न पडला. इतका सकारात्मक बदल त्यांनी घडवून आणलाय. शेतात फिरता फिरता पेरू खाल्ले, बोरं खाल्ली, ऊस खाल्ला आणि दुपारी घरी जाऊन चविष्ट जेवण केलं. मी बघितलं, डॉक्टर शेतीत रमलेत. ही जीवनशैली त्यांनी विचारपूर्वक स्विकारलीय. यात क्रिएटिव्हिटी आहे. बीयाचं रोपटं मोठं होऊन बियांनी लगडून जातं, तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

आपणच लावलेल्या रोपट्याची फळ खाताना जे समाधान मिळतं ते कशानेही मिळत नाही. शेतीत माणूस एवढा गुंतून जातो की, तो सगळं जग विसरून जातो. वयाच्या एका टप्प्यावर हे जग विसरणं आनंददायी असतं. बाहेरून बघणारे म्हणतात, काय एवढा मोठा डॉक्टर उगं शेतात बेजार होऊ लागलाय. माझ्या संदर्भातही अशा प्रतिक्रिया मी अनेकदा ऐकल्यात. आम्ही हसून त्याकडं दूर्लक्ष करतो. ज्यांना स्वत:चं जगणं म्हणजे काय? ते कळत नाही, त्यांना इतरांचं जगणं कसं कळणार? पण कशा लोकांना इतरांच्या जगण्यावर प्रतिक्रिया देण्याची मोठी हौस असते.

मी बघितलं, डॉक्टर या जगण्यावर मनापासून खूष आहेत. जगण्याचा मस्त आनंद घेत आहेत. त्यांच्यासाठी शेतीतील नफा-तोटा हा महत्त्वाचा विषय नाही. आपल्या आवडीच्या जगण्याची किमत पैशात करता येत नाही, असंच आम्ही मानतो. ते शेतीत नवे-नवे प्रयोग करताहेत. निरीक्षणं नोंदवून बदल करताहेत. त्यांचे हे अनुभव भविष्यात इतर शेतकऱ्यांनाही उपयुक्त ठरतील. सरकार पाठोपाठ, वन्य प्राणीही शेतीच्या मुळावर उठलेत. रानडुकरांनी उच्छाद मांडलाय. त्यावर रडून, ओरडून उपयोग नाही.उपाय प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तीगत पातळीवरच करावे लागणार.

गोरे सरांनी सगळ्या शेतीभोवती तारेचं कुंपण करण्याचा निर्णय केलाय. त्याचं कामही सुरू झालयं. मी गेलो त्यादिवशीच कँमेरे बसवलेत. ते कुठंही असले तरी, जनावरं,शेळ्या, कोंबड्यांची स्थिती कशी आहे, ते बघू शकतात. शेतातील सहकाऱ्यांना बोलून लगेच अंमलबजावणी करू शकतात. मला हे दोन्ही निर्णय आवडले. मी गरजूपुरतं कुंपण केलयंच. ते हळूहळू वाढवावे लागेल. हटवरही कँमेरे बसवायला हवेत,असं वाटतं. मी कुठंही असलो तरी हटमध्ये असल्याचा आनंद मला घेता येईल. परवाची माझी गोरेवाडीची भेट आनंददायी ठरली.आपला मित्र आपल्यासारखाच शेती-मातीशी एकरूप होऊन जगतोय,ही माझ्यासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. माझ्या पर्यटनासाठी एक नवं हक्काचं ठिकाण तयार झालयं! ते तर मला हवच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com