Loksabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव करूया यशस्वी

General Elections 2024 : लोकसभा निवडणूक - २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ (शुक्रवार) रोजी सुरू होत आहे. खरे तर हा लोकशाहीचा उत्सव आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

अरुण चव्हाळ
2024 India General Election : लोकसभा निवडणूक - २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ (शुक्रवार) रोजी सुरू होत आहे. खरे तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरिता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे.

आपल्याकडे म्हणजे भारतात ‘राजा’ या शब्दाला लोकप्रियता-लोकमान्यता-लोकप्रसिद्धी खूपच लाभलेली आहे. त्यामुळे लोकशाहीची निवडणूक पद्धत आणि मतदान आणि ‘मतदारराजा’ हे शब्द आता सर्वांच्या अंगवळणी पडलेले आहेत. तरीही लोकसभा निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने ७५ टक्के मतदान प्रत्यक्षात होण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

काही का असेना मतदारांची ‘राजा’ या शब्दाने मतदानासाठी केली जाणारी जागृती महत्त्वाची आहे. भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्याचे प्रयत्न विविध स्तरांवर करण्यात येतात.

जनतेचे राज्य आणि त्यातल्या त्यात लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्र चालविले जाते. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे असते.

याकरिता लोकांची मतदार म्हणून मतदान करण्याकरिता महत्त्वाची आणि गंभीर भूमिका असते. मतदारांनी निर्भयपणे आणि विचारपूर्वक स्वतंत्र आणि स्वमनाने मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : सव्वासात लाख तरुण ठरवणार लोकसभा उमेदवारांचे भविष्य

या दृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने ‘स्वीप’ (SVEEP) हा कार्यक्रम राबवण्यात येतो. ‘सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिशिपेशन’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत मतदार आणि नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती व जनजागृती व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात.

उद्देश हाच, की मतदानाची टक्केवारी वाढावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये स्वीप टीम जिल्हाभरात-राज्यात-देशात काम करत असते. या अनुषंगाने मतदान जनजागृती फलक, स्वाक्षरी मोहीम, अभिरूप मतदान केंद्र उभारणे आणि मतदान प्रक्रिया करणे, मतदानाची पत्रिका प्रसिद्ध करणे, विद्यार्थ्यांना मतदार दूत म्हणून आई-वडील आणि कुटुंबासह इतरही नातेवाइकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे, एक मत-एक मूल्य किती महत्त्वाचे आहे हे सांगणे, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, पथनाट्य, सुंदर पथसंचलन तसेच कलापथक, संवाद, शाहिरी, कविता, गीत, कीर्तन, मतदान गुढी उभारणी, मतदान घोषवाक्ये स्पर्धा, मानवी साखळी करणे, विविध प्रसारमाध्यमांतून मतदान करण्याचे आवाहन, सेल्फी विथ वोटर्स अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यासाठी १० हजार मतदान केंद्रे

‘बोलक्या बाहुल्यांचा खेळ’ हा एक उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने चांगलाच गाजत आहे. कलावंत जय ढोले यांचा बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून बाहुल्यांमध्ये होणारा संवाद व एकूणच लोकशाहीची प्रक्रिया आणि अत्यंत रंजक माहिती देणारा आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघातील अहमदपूर तालुक्यात माळेगाव खुर्द गावात गावातील वृद्ध मतदारबांधवांनी नवतरुण मतदारांसाठी मतदानाकरिता जनजागृती केलेली आहे. त्यांचे घोषवाक्ये लक्षवेधक आहेत. आपणही ते वाचूयात, ‘मतदानासाठी वेळ काढा - आपली जबाबदारी पार पाडा’, ‘मतदार राजा जागा हो - लोकशाहीचा धागा हो!’, ‘वाढवू तिरंग्याची शान - करूया देशासाठी मतदान’, ‘न नशे से, न नोट से - किस्मत बदलेगी वोट से’, ‘छोडकर सारे काम, चलो करे मतदान’, यांसारख्या घोषवाक्यांनी रंगत आणलेली आहे.

प्रचारसभा, कॉर्नरसभा, गावसभा, मतदारांच्या भेटीगाठी, संदेश या माध्यमातून देश निवडणुकीच्या अनुषंगाने ढवळून निघत आहे. मतदान कर्तव्य - राष्ट्रीय कर्तव्य आहे, म्हणून ज्या लोकसभा मतदार संघात मतदान आहे; त्या ठिकाणी जाहीर सुट्टी दिलेली आहे.

लग्नकार्य-आठवडी बाजार-इतर काही उपक्रम त्या दिवशी बंद ठेवून किंवा उरकून मतदान करणे महत्त्वाचे आहे. मतदारांनी मतदान केल्याची खात्री आणि त्याचा तपशील मतदान चिठ्ठीच्या माध्यमातून मतदानयंत्राच्या बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रात दिसणार आहे. त्यामुळे आपले मतदान ‘अमूल्य’ असल्याची खरीखरी जाणीव होणार असल्याचे, या माध्यमातून सांगितले जात आहे.

निवडणुकीत त्या त्या मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आहे. सर्वत्र भयमुक्त आणि पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन प्रशासन, उमेदवार आणि मतदारांना करावयाचे आहे.

हे सर्व सहकार्य सहजतेने अपेक्षित आहे. अन्यथा, यावर काही कमी-अधिक झाल्यास पोलिस प्रशासन सज्ज आहेच. मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यामध्ये मतदान केंद्र, उमेदवारांची यादी, मतदारांसाठी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड, वैद्यकीय उपचार कीट, मदत कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पुरेसा विद्युतपुरवठा, रॅम्प, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आदी सुविधांचा समावेश असणार आहे.

गरज पडल्यास अतिवयोवृद्ध मतदारांच्या घरी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी जाऊन त्यांचे मतदान करून घेणार आहेत. सर्वांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःचे ओळखपत्र मतदान करताना सोबत नेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन उमेदवारांना सुद्धा करावे लागत आहे.

यामध्ये जाहिरात, फ्लेक्स, पॉम्पलेट, ऑडिओ जाहिरात, व्हिडिओ जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेणे, वाहन परवानगी, सभेची परवानगी, दैनंदिन खर्च आणि निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातूनच सर्व खर्च होणे आवश्यक आहे. रोखीचे व्यवहार न होता सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने बँकेतून झाले पाहिजेत, असे अनेक निर्देश दिलेले आहेत.

ईव्हीएम मशिनच्या बॅलेट पेपर सेटिंग वेळी सर्व उमेदवारांना बोलावून त्यांच्या समक्ष हे काम करता येणार आहे. या कालावधीत तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधून किंवा सी-व्हिजील ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे.

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग सुविधेच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रचार करताना जातिधर्मात तेढ निर्माण होणार नाही, वैयक्तिक आरोप होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे सांगितले आहे.

निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रसारित होणाऱ्या राजकीय पेड न्यूज आणि राजकीय जाहिरातींवर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने लक्ष ठेवलेले आहे. अनेक भरारी पथकांनी वेळोवेळी आपली स्थाने बदलून तपासणी करावी; आपल्या मागण्यांसाठी ज्या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे; त्या गावात सहायक निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन मतदारांना-गावकऱ्यांना मतदानासाठी प्रेरित करायचे आहे.

बीएलओ म्हणजेच, स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहून सहकार्य करणार आहेत. मद्य विक्री आणि मद्यपान निवडणुकीच्या काळात बंद ठेवणे; दहशत किंवा मारहाणीचे प्रकार टाळणे; याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.

सर्व गोष्टींचे चित्रीकरण होत आहे. मतदानाच्या वेळी सर्व यंत्रणा सतर्क असून, मतदानाची टक्केवारी आणि स्थिती वेळोवेळी सांगितल्या जाणार आहे. चला मतदान करूया, मतदानाची टक्केवारी वाढवूया.

- अरुण चव्हाळ ७७७५८४१४२४
(लेखक परभणी जिल्हा स्वीप प्रसिद्धी प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com