

Mumbai News: राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे असलेल्या कारणांत सावकाराची पिळवणूक हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने सहकार विभागाने आता खासगी सावकारांना व्याजाचे दर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच व्याजाचे दर ग्रामसभेत निश्चित करून ते फलकावर लावण्यात यावेत असे परिपत्रक काढले आहे.
व्याजदर दर्शनी भागात लावून त्याची छायाचित्रे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर न केल्यास परवाना नूतनीकरण करण्यात येणार नसल्याचे परिपत्रक सहकार विभागाने काढले आहे. राज्यात दरवर्षी २७०० ते २८०० शेतकरी आत्महत्या होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सावकारांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी २०१४ पासून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अस्तित्वात आहे. त्याआधी अतिरिक्त व्याजाची वसुली, कर्जापोटी जमीन बळकावणे अशा तक्रारी येत होत्या. सध्या राज्यातील १२ हजार हून अधिक खासगी व्यक्तींना सावकारी करण्यासाठी परवाना दिला आहे.
त्यांच्याकडून वर्षाला सरासरी एक हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित केले जाते. यामध्ये कृषी कर्जे, बिगर कृषी कर्जे दिली जातात. मुलांचे विवाह समारंभ, घरबांधणी, शिक्षण, आजारपण आदी कारणांसाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात. यासाठी वेगवेगळे पण विशिष्ट मर्यादेपर्यंत व्याजदर आकारण्याची मुभा आहे.
शेतीकर्जापोटी जमीन गहाण ठेवून नऊ टक्के, गहाण न ठेवता १२ टक्के व्याजदराने कर्ज वितरित करता येते. शेतीव्यतिरिक्त लघुउद्योजक आणि मजुरांना १२ टक्के दराने कर्ज आकारण्यात येते.
यामध्ये मालमत्ता गहाण ठेवल्यास १५ आणि गहाण न ठेवल्यास १८ टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते. मात्र, ग्रामीण भागात निरक्षरता आणि सरकारी वित्तीय संस्थांकडून कर्जपुरवठा न झाल्याने सावकारांनी त्याचा फायदा घेत अधिक दराने व्याजदर वसूल केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे आल्या आहेत.
फलक १५ जूनपर्यंत लावणे बंधनकारक
त्यामुळे १५ जूनपर्यंत खासगी सावकारांना त्यांच्या व्यवसाय ठिकाणांबाहेर व्याजदर आणि कार्यप्रणालीचे फलक लावणे बंधनकारक केले आहे. १५ जूनपर्यंत लावलेल्या फलकांची छायाचित्रे उपजिल्हा निबंधकांकडे देण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहेत. जर त्यांनी सूचनांचे पालन केले नाही तर परवाना नूतनीकरण होणार नाही, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.