Integrated Pest Control : एकात्मिक कीड नियंत्रणात पक्ष्यांचे महत्त्व, योगदान

Crop Management : कीड नियंत्रणात पक्ष्यांचे महत्त्व जगभरातील संशोधकांनी पुढे आणले आहे. घरटी, बसण्याची जागा व पिण्याचे पाणी आदी सुविधा निर्माण करून पक्ष्यांचे शेतात संवर्धन केल्यास किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
Integrated Pest Management
Integrated Pest Management Agrowon
Published on
Updated on

डॉ. मुकुंद देशपांडे

Crop Protection : शेतीतील ३० ते ५० टक्के नुकसान वेगवेगळ्या किडी-रोगांमुळे होते. एकात्मिक कीड नियंत्रण ही किडी-रोग नियंत्रणातील सर्वांत प्रभावी पद्धत आहे. सन १८७७ मध्ये अमेरिकी कीटकशास्त्र आयोगाने पक्ष्यांच्या संरक्षणासाठी कायदाही पास केला आहे. तर सन १८८५ मध्ये पक्षिशास्त्राचे अर्थकारण यावर अभ्यासही सुरू झाला.

पक्षितज्ज्ञ अधिक करून निरीक्षणावर भर देतात. पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पक्ष्यांकडे अधिक बारकाईने पाहण्याची गरज आहे. खूपदा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर शेतीत पक्षी उपयोगी पडतात अशी उदाहरणे घडली आहेत.

सन १९८० मध्ये बोंड अळीने कापूस पिकात हाहाकार माजविला होता. त्या वेळी शेतकऱ्यांनी झाडे हलवून अळ्या जमिनीवर पाडल्या आणि कोंबड्या शेतात सोडल्या. पुढील पीक वाचविण्याचे काम या पक्ष्यांनीच केले.

संशोधनाने अधोरेखित पक्ष्यांचे महत्त्व

कर्नाटक राज्यातील कृषी महाविद्यालयात एकात्मिक कीड नियंत्रणात पक्षी कसे उपयोगी पडतात, यावर सविस्तर अभ्यास झाला आहे. तुरीच्या पिकात ४० ते ६० टक्के घाटे अळीचे नियंत्रण पक्ष्यांमुळे होते. त्यात अग्रभागी असतात ते कोतवाल. मैना, वेडा राघू, बुलबुल, चिमण्या. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार ३० हून अधिक वेगवेगळे पक्षी किडींच्या नियंत्रणात हातभार लावतात.

उदाहरणार्थ, बगळा, भुरा बगळा, वेडा राघू, हुदहुद्या, नीलपंख, खंड्या, खाटीक, बाया, टिटवी, भारद्वाज, शिक्रा, सुतार पक्षी. अनेक संशोधन पत्रिकांमध्ये या पक्ष्यांचा उपयोग अधोरेखित केला आहे.

काही पक्ष्यांच्या प्रजाती पिकाला उपयोगी असतात तर काही पिकाचे नुकसान करतात. पण यातील काही पक्षी ऋतू, जीवनचक्र आणि अन्नाचा स्रोत याप्रमाणे त्यांची भूमिका बदलतात. उदाहरणार्थ, त्यांच्या विणीच्या हंगामात ते पिलांना कीटक खाऊ घालतात. कारण ते जास्त प्रथिनयुक्त असतात.

शेतकऱ्यांनी अशा बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यास ते पक्ष्यांचे निवासस्थान पूरक करूशकतात. काही वेळा शिकार करणारे पक्षी शेतात नुसते उपस्थित असले तरी उंदीर आणि धान्याची नासाडी करणारे अन्य पक्षीसुद्धा पिकापासून दूर जातात. शेतकरी अशा गोष्टींचा फायदा घेऊन होणारे नुकसान टाळू शकतात.

Integrated Pest Management
Millipede Pest Management : मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव कसा कमी कराल?

द्राक्ष बागेत नियंत्रण

कीड नियंत्रणात पक्ष्यांचा शास्त्रीय अभ्यास जगभरातील संशोधकांनी केला आहे. काही संशोधकांच्या मते पक्षी हे पर्यावरणाचे सूचक आहेत. ते धोक्यात आले तर मानवी जीवनही धोक्यात येऊ शकते. अमेरिकेत द्राक्ष बागांमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बांधली जातात. त्यामुळे पश्‍चिमी नीलपंख पक्ष्यांची संख्या वाढते.

त्यापासून कीडनियंत्रण चांगल्या प्रकारे होते. काही ठिकाणी ९० टक्क्यांपर्यंत किडींचा प्रादुर्भाव या उपायांनी कमी झाल्याचे आढळले आहे. असाच अभ्यास चिली देशातील संशोधकांनी पाच वेगवेगळ्या द्राक्ष बागांमध्ये केला. त्यांच्या निरीक्षणानुसार जिथे पक्ष्यांसाठी घरटी बांधली होती तिथे ४० टक्क्यांच्या वर लाल कोळी, ‘फ्लॉवर थ्रीप्स’, भुंगा आदींचे नियंत्रण आढळले.

अनेक पक्षी त्यांच्या पिलांना किडे भरवत असतात. हे पण कारण आहे की ज्यायोगे शेतातील कीड कमी होते. पालेभाज्यांच्या शेतात २४ ते ३० टक्के अळ्यांचा प्रादुर्भाव पक्ष्यांमुळे कमी होतो असे आढळले. अशा परिणामांसाठी पक्ष्यांसाठी घरटी, बसण्याची जागा आणि पाणी यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

Integrated Pest Management
Grape Disease Management : द्राक्षावरील बुरशीजन्य, जिवाणूजन्य करपा रोगाचे व्यवस्थापन

फळबागांत किडींचे नियंत्रण

अक्रोडच्या बागेत ४० टक्क्याच्यांवर पतंग वर्गातील किडी सुतार पक्ष्यांमुळे कमी झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर अमेरिकेत आढळणारा टफटेड टिटमाउस हा पक्षी सुमारे दोन हजार अळ्या खातो.

अशीच परिस्थिती सफरचंद, पिअर आणि ऑलिव्ह फळांच्या बागांची आहे. बलगुली या पक्ष्यांच्या घरट्यांमुळे किडींचा प्रादुर्भाव व त्यावरील खर्च कमी होऊन सफरचंदाचे उत्पन्न १६० टक्क्यांवर पोहोचल्याचे आढळले आहे.

तीच गोष्ट ऑलिव्ह बागेत फळमाशीच्या नियंत्रणात आढळली आहे. शास्त्रीय संशोधन असे दाखविते, की वेगवेगळ्या पिकांमध्ये उदा. बाजरी, मका, लसूण गवत, मॅपल फळ, कॉफी आदी पिकांत वेगवेगळे पक्षी ३० ते ८० टक्के प्रमाणात कीड कमी करतात.

खर्च कमी करण्यात पक्ष्यांचा वाटा

शेतीमध्ये अर्थशास्त्रीय पक्षिशास्त्र आता जोर धरू लागले आहे. अमेरिकेतील अभ्यासानुसार पक्षी, मित्रकीटक आणि वटवाघळे आदी घटक दरवर्षी १४ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे नुकसान वाचवितात. यात प्रामुख्याने पिकांचे नुकसान आणि रासायनिक कीटकनाशकांवर होणार खर्च विचारात घेतला आहे.

चीनमध्ये पक्ष्यांच्या ११४० प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत. त्यातील ६०० च्या जवळपास किडे खाणाऱ्या आणि ३० या कीटक नियंत्रणामध्ये अग्रेसर आहेत. यात प्रमुख आहे कोतवाल हा पक्षी. त्याचबरोबर बदक देखील तासाला १०० किडे फस्त करते. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

स्थलांतरित पक्ष्यांचेही महत्त्व

एकात्मिक टोळ नियंत्रणात बहिरी ससाणा, समुद्र पक्षी आणि लावी हे दिवसभरात शंभरच्या वर टोळ खातात. त्याचे महत्त्वाचे कारण त्यांचा मोठा आकार. टोळ नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक मित्रबुरशीचाही वापर होतो. स्थानिकच नव्हे, तर स्थलांतरित पक्षीही कीड नियंत्रणात भाग घेतात.

भोरड्या किंवा गुलाबी मैना पूर्व युरोपातून भारतात विणीच्या हंगामात येतात. त्यांचा मोठा सहभाग टोळधाड नियंत्रणात असतो. डीएनए आधारित तंत्रज्ञान वापरून पक्ष्यांची विष्ठा तपासून त्यात कोणकोणत्या कीटकांच्या डीएनएचा समावेश आहे हे पाहणे शक्य आहे. त्यावरून त्या त्या पक्ष्यांचे संवर्धन त्या शेतात केल्यास कीड नियंत्रण चांगले होईल. कीटक नियंत्रक मित्रबुरशीच्या बीजाणूंचा प्रसारही एका शेतातून दुसऱ्या शेतात होऊ शकतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

शेतकरी, संशोधक आणि शेतीचे अन्य भागधारक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास कमीत कमी श्रम आणि खर्चात कीड नियंत्रणाचा प्रभावी परिणाम साधता येतो. त्यासाठी दोन ते तीन गोष्टीच कराव्या लागतील. एक म्हणजे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा, राहण्यासाठी घरटी आणि प्यायला पाणी. पर्यावरणाचे संरक्षण हा महत्त्वाचा फायदा त्यातून होणार हे सांगायला नकोच.

डॉ. मुकुंद देशपांडे, ९०११३५८९७७

(लेखक राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), पुणे येथील निवृत्त मानद शास्त्रज्ञ आणि कृषी उद्योजक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com