
Ahilyanagar News : महिला बचतगटाने उत्पादित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने तब्बल पाच दिवसाचे साईज्योती सरल विभागीय प्रदर्शन घेतले. मात्र प्रदर्शनाची वेळ चुकली, प्रचार आणि प्रसिद्धी नाही, नियोजनाचा अभाव यामुळे अहिल्यानगरसह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून आलेल्या बहुतांश महिला गटाचा हिरमोड झाला.
यंदा शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी या प्रदर्शनाकडे पाचही दिवस अक्षरशः पाठ फिरवल्याचे दिसून आले. ग्रामीण विकास यंत्रणेने मात्र चांगली उलाढाल झाल्याचा दावा केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महिला बचतगट चळवळ अधिक जोमात सुरू झाली आणि अनेक महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरु केले.
गटातील बहुतांश महिला शेतकरी असल्याने, शेतमालावर आधारित बरेच साहित्य तयार होऊ लागल्याने शेती विकासालाही या बचतगट चळवळीचा मोठा फायदा झाला. त्यामुळे महिलांनी तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय प्रदर्शन घेतले जाऊ लागले.
बऱ्याच दिवसानंतर अहिल्यानगरला यंदा साईज्योती सरल हे नुकतेच विभाग प्रदर्शन झाले. अहिल्यानगरसह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून सहभागी झाले होते. येथे एकूण ३२५ स्टॉल लावण्यात आले होते.
२४५ स्टॉल हे साहित्याचे तर ८० स्टॉल खाद्याचे होते. सर्व गटांना स्टॉल मोफत दिल्याचे सांगितले जात आहे. कोटयावधी रुपये विभागीय प्रदर्शनावर खर्च केला, परंतु गेल्यावर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पाडलेल्या पायंडयामुळे यंदाही प्रदर्शनाचा प्रचार आणि प्रसाराकडे दुर्लक्ष केले.
प्रदर्शनस्थळीही नियोजन नसल्याने आणि हेकेखोरपणामुळे प्रदर्शनाची वेळ चुकल्याने यंदा प्रदर्शन फेल गेले. ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रदर्शन पाच दिवस असूनही आवश्यक विक्री झाली नसल्याचे महिलांना सांगितले. यंत्रणेचे अधिकारी मात्र जोरदार प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत आहेत. सध्या जिल्हा परिषदेत फेल गेलेल्या प्रदर्शनाचीच चर्चा सुरु आहे.
चाळीस टक्के स्टॉल खाद्याचेच
अहिल्यानगरला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पाच दिवसाचे साईज्योती सरल प्रदर्शन घेतले. अहिल्यानगरला गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून दरवर्षी हे प्रदर्शन होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र गेल्यावर्षीपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे हे प्रदर्शन फेल जात असल्याचे दिसून येत आहे.
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचा, महिलांच्या कलेची लोकांना माहिती व्हावी असा या प्रदर्शनाचा हेतू असायचा. प्रदर्शन सुरु झाले त्यावेळी महिला बचतगटाच्या एकूण स्टॉलपैकी केवळ दहा ते पंधरा टक्के स्टॉल हे खाद्य पदार्थांच्या विक्रीचे असायचे. मात्र यंदा तब्बल ४५ टक्के स्टॉल हे केवळ खाद्याचे होते. त्यामुळे महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचे प्रदर्शन होते की खाद्य प्रदर्शन असा प्रश्न येथे उपस्थित होते आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.