
Solapur News: माघी एकादशी, अर्थात जया एकादशीनिमित्त पंढरपुरात शनिवारी (ता. ८) श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे ४ लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले होते. प्रमुख मार्गासह प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीसह संपूर्ण शहरात सुरू असलेला टाळ- मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसात चिंब झाली.
पंढरपुरातील प्रमुख चार वाऱ्यांपैकी माघी ही एक वारी गणली जाते. शनिवारी एकादशीच्या पर्वावर चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांची झुंबड उडाली होती. स्नान झाल्यानंतर वारकरी पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन आणि ज्यांना हे शक्य नाही, ते प्रदक्षिणा मार्गावरील प्रदक्षिणेसाठी लगबगीने निघत होते.
प्रदक्षिणा मार्गावर एकापाठोपाठ एक दिंड्यांची टाळ-मृदंगाच्या गजरातील भजनासह सुरू असलेली नगरप्रदक्षिणा लक्षवेधी ठरत होती. त्याशिवाय पंढरपुरातील मठ, धर्मशाळा, मंदिरामध्ये अखंडपणे भजन, कीर्तने आणि प्रवचने रंगली आहेत.
एकादशीचे दर्शन आणि स्नानाची पर्वणी साधण्यासाठी दिवसभर वारकऱ्यांची रेलचेल सुरूच होती. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांनी वारकरी दाखल होत होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शदर्शनाची रांग शनिवारी गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती.
दर्शनाला १५ ते १८ तासांचा अवधी लागत होता. त्याशिवाय मुखदर्शनासाठीही तेवढीच गर्दी झाली होती. ६५ एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदिर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत होती. पोलिस प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनरांगेत खिचडी, चहाचे वाटप
वारकऱ्यांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी, तात्पुरत्या स्वरूपात १२८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर
समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. तिथे भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व चहावाटप करण्यात येत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा
माघी एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा पहाटे झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक झाली.
या वेळी आमदार तुकाराम काते, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, शंकर पटवारी, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते. एकादशीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.