Pandharpur Maghi Wari : अवघी पंढरी भक्तीरसाने भारली ; माघी वारीचा रंगला अनुपम सोहळा

Pandhurpur : माघ एकादशीच्या अनुपम सोहळ्यात मंगळवारी (ता.२०) राज्यासह परराज्यातून सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले
Maghi Vari
Maghi Vari Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Maghi Wari : पंढरपूर, जि. सोलापूर ः माघ एकादशीच्या अनुपम सोहळ्यात मंगळवारी (ता.२०) राज्यासह परराज्यातून सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले. येथे दाखल झालेल्या लाखो वैष्णवजनांनी ‘विठ्ठल, विठ्ठल’ असा नामघोष करीत आपली माघी वारी पोहोच केली. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तीरसाने भारून गेली.
वारकऱ्यांच्या भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषाने माघी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरी दुमदुमून गेली होती. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग आजही गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड भरून पुढे गेली होती.

दर्शन रांगेतील भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुमारे १५ ते १७ तासांचा कालावधी लागत होता. सोमवारी (ता. १९) दिवसभर दशमीदिवशी आणि मंगळवारी पहाटेपासून शहरातील मठ, धर्मशाळा तसेच विठ्ठल मंदिर परिसरातील मोठ्या वाड्यांमधून वास्तव्यास असलेले वारकरी भजन, कीर्तनात तल्लीन झाले होते. चंद्रभागा नदीच्या वाळवंटासह दिंड्या आणि पालख्यांचा मुक्काम असणाऱ्या ६५ एकर परिसरात रात्रभर भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांची रेलचेल राहिली.

Maghi Vari
Ashadhi Wari 2023 : अवघी पंढरी भक्तिरसाने भारली

एकादशीच्या पर्वावर चंद्रभागेच्या तीरावर पहाटेपासूनच वारकऱ्यांची स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. या वर्षी नदीमध्ये स्नान करण्याइतपतही पाणी नसल्याने वारकऱ्यांना पात्रातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याने स्नान करावे लागले. एका पाठोपाठ एक दिंड्यांची नगरप्रदक्षिणेसाठीची लगबग दिसत होती. नगरप्रदक्षिणा मार्गावर सगळीकडे टाळ-मृदंगाचा गजर कानी पडत होता. मंदिर समितीच्या वतीने पदस्पर्श दर्शनाबरोबर विठ्ठलाच्या मुखदर्शनाची स्वतंत्र रांग तयार केलेली आहे. या रांगेमधून वारकरी र्श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत होते. मुखदर्शनाच्या रांगेमध्ये महिला आणि वृद्धांची संख्या जास्त दिसून येत होती.

पहाटे महापूजा
माघी वारी म्हणजेच जया एकादशीनिमित्त मुख्य सोहळ्यात मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची नित्य पूजा अनुक्रमे मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते झाली.

२०० टन फुलांची आरास
पुणे येथील दानशूर भाविक सचिन अण्णा चव्हाण, संदीप विठ्ठल पोकळे व युवराज विठ्ठल सोनार यांनी सेवाभावाने एकादशीसाठी मंदिरात मोफत फुलांची आरास केली आहे. त्यासाठी २०० टन फुलांचा वापर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने झेंडू, शेवंती व इतर फुलांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com