
Kolhapur Agriculture Department : कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत जाऊन वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करावी. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून त्यांना आवश्यक शासकीय मदत देणे अभिप्रेत आहे. यासाठी येत्या महिनाभरात प्रत्येक तालुक्यात त्या त्या आमदारांना कृषी विभागाकडील सर्व योजनांची व सुरू असलेल्या प्रकल्पांची तातडीने माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृह येथे झालेल्या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, आमदार शिवाजी पाटील.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, शासकीय पदावर असताना आपला लोकांसाठी उपयोग व्हावा म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याने काम केले पाहिजे. येत्या एक महिन्यात सर्व कृषी विभागाचा आढावा येणार असून त्यांनी याबाबत सर्व तयारी करावी. या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये कृषी विभागाने तयार केलेल्या वेगवेगळ्या माहिती पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व शेतीविषयक माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रणालीचे क्यूआर कोडचे अनावरण ही पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात कृषी योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या ड्रोनचे वाटप दोन लाभार्थींना करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीतील उपस्थित केलेल्या मुद्द्यांमधील कार्यवाही बाबत अहवाल सादर केला. तसेच त्यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा नियोजन बैठकीबाबत संगणकीय सादरीकरण केले.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्या त्या तालुक्यातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये चंदगड आजरा तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याबाबत पंचनामे अद्याप का केले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली. या वेळी पंधरा दिवसांत अतिरिक्त मनुष्यबळ लावून याबाबत पंचनामे करणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले.
वीज जोडणी, सौर पंपप्रकरणी सूचना
नाबार्ड संस्थेने तालुक्यात फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत येत असलेल्या समस्या सोडवून वीज जोडणीतील निकषात बदल करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न करावेत असेही या वेळी बैठकीत ठरले. सौर कृषिपंप कुसुम ब योजनेतील पैसे भरलेले पात्र ग्राहक व स्थापित सौर पंप यामधील फरक मोठ्या प्रमाणात असून ज्या पद्धतीने शेतकरी पैसे भरतील तशी प्रकरणे पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.
पीककर्जाच्या लक्ष्यांकात वाढ करा
कोल्हापूर जिल्ह्यातील पीककर्ज लक्ष्यांक व साध्य याबाबत चर्चा झाली. या वेळी पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी लक्ष्यांक वाढवण्यासाठी सूचना केल्या. राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट वाढवा, असेही ते यावेळी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.