
Washim Farmers : रिसोड तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामासाठी ७४ हजार ९३२ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी तालुक्यात हळदीची लागवड वाढणार असून, हे क्षेत्र साडेचार हजार हेक्टरपेक्षा अधिक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
आगामी खरीप हंगामाचे कृषी विभागाने नियोजन करीत बी-बियाणे व खतांची उपलब्धता निश्चित केली आहे. सोयाबीनचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा थोडे कमी होऊ शकते. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या वर्षी मॉन्सून वेळेआधी दाखल होणार असून, सरासरी एवढा पाऊस पडणार असा हवामान खात्याचा अंदाज जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कृषी विभागानेही खरिपाचे नियोजन केले आहे.
कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत, गाव पातळीवर नेत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.या वर्षी तालुक्यात ७४ हजार ९३२ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी वर्षभर पडलेले सोयाबीनचे बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे करून पेरणीसाठी सज्ज होत आहे.
खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या वर्षी मॉन्सून वेळेआधी दाखल होणार या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची आता बी बियाणे व खताच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली.मागील वर्षी सरासरी ५६ हजार ६९३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. या वर्षी ५५ हजार १०० हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. कपाशीचे क्षेत्र मागील वर्षापेक्षा कमी होईल. केवळ दोनशे हेक्टर वर कपाशीची लागवड होऊ शकते. तुरीच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन १४ हजार ३५० हेक्टरवर तुरीची लागवड होणार आहे.
इतर पिकांच्या तुलनेत हळद फायदेशीर
हळदीला या वर्षी चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे तसेच इतर पिकाच्या तुलनेत हळद फायदेशीर ठरत असल्यामुळे हळदीच्या लागवडीमध्ये वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षी सरासरी २१०० हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली होती. या वर्षी मात्र हळदीच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ होऊन ४५५० हेक्टरवर हळदीची लागवड नियोजित आहे. यंदा खरीप हंगामात हळदीसह ७४ हजार ९३२ हेक्टरवर पेरणी होणार आहे.
खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, खरिपासाठी लागणारे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. फिरते पथक तयार करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासून व बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे. काही अडचण निर्माण झाल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.
- मगनदास तावरे, तालुका कृषी अधिकारी, रिसोड, जि. वाशीम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.