Cow Rearing : खिलार गाय झाली योगेशची दुसरी माय

Khillar Cow Conservation : जन्मजात योगेश गायकवाड या तरुणाची (रा. शेटफळे, जि. सांगली) दृष्टी थोडी अधू होती. आई-वडिलांनी न डगमगता उपचारांमध्ये तडजोड न करता तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला वाढवले. त्याला देशी गायींचा लळा लागला.
Cow Rearing
Cow RearingKhillar Cow Conservation
Published on
Updated on

अभिजित डाके

Animal Care : जन्मजात योगेश गायकवाड या तरुणाची (रा. शेटफळे, जि. सांगली) दृष्टी थोडी अधू होती. आई-वडिलांनी न डगमगता उपचारांमध्ये तडजोड न करता तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला वाढवले. त्याला देशी गायींचा लळा लागला. गायीचे दूध, तिची माया लाभलेला योगेश आज आपल्या दुसऱ्या मातेचे म्हणजे ३५ खिलार गायींचे संगोपन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करतो आहे. त्यावरच शेती व घराचे संपूर्ण अर्थकारण त्याने जिद्द, कष्टाने उभे केले आहे.

फोंड्या माळावर लालचुटूक डाळिंब पिकविण्याची किमया सांगली जिल्ह्यातील आटपाडी या
दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घडविली. तालुक्यातील शेटफळे गावही निर्यातक्षम
डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. येथील मच्छिंद्र मारुती गायकवाड यांची २० एकर जिरायती शेती आहे. त्यांचे वडील मारुती लष्करात होते. गावी परतल्यावर शेळीपालनासोबत त्यांनी दोन-चार खिलार गायी सांभाळण्यास सुरुवात केली.

घरचीच बैल शेतीसाठी उपलब्ध होऊ लागली. मच्छिंद्र सांगतात की वडिलांना शेतीत मदत करायला सुरुवात केली. सामुदायिक विहीर होती. पण जेमतेम पाणी होतं. एक एकर बागायती शेतीतून उत्पन्न सुरू झाले. विहिरीतले पाणी कमी झाले तेव्हा रेबाई तलावातून पाइपलाइन केली. गावापासून चार किलोमीटरवर कोरडवाहू शेती होती. बाजरी, मटकी अशी पिके घेत उदरनिर्वाह सुरू झाला. दरम्यान, योगेशचा जन्म झाला. जन्मताच त्याची दृष्टी कमी किंवा थोडी अधू होती. तो जगेल की नाही याची शाश्‍वती नव्हती. तीन वर्षे दवाखाना सुरू होता. सांगलीत नेत्रतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. दृष्टी चांगली होण्यासाठी त्यांनी देशी गायीचे दूध सुरू करण्याचा सल्ला दिला.

नोकरीची संधी

मच्छिंद्र सांगतात, की सन १९८३ मध्ये पाटबंधारे विभागात हजेरी सहायक म्हणून नोकरी मिळाली. सन १९९६ मध्ये नोकरीतून कमी केलं. ‘कोर्टाचे’ दरवाजे ठोठावले. निकाल आमच्या बाजूने लागला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारक म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात काम करून सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झालो. नोकरीत व्यस्त झालो होतो तरी शेतीची आवड जराही कमी झालेली नव्हती. देशी गायींचा सांभाळ सुरू होता. नोकरी निमित्तानं दोन चार गावे फिरलो.

त्या वेळी पत्नी अनिता यांनी गायी सांभाळल्या. वडिलांचे २००२ मध्ये निधन झाले. त्यांच्या काळापासून सांभाळलेल्या दोन गायी वय झाल्याने दगावल्या. देशी गायींचा इतका लळा लागला होता की सुना पडलेला गोठा पाहावत नव्हता. मग देशी जातिवंत गायी घेण्यासाठी भटकंती सुरू झाली. २००३ मध्ये दुष्काळ पडला. गावात छावण्या सुरू झाल्या. त्या वेळी गावातील नामदेव मदने हे देशी गायी घेऊन सांगोला येथे जात होते. त्यांच्याकडून गाय व पाडी विकत घेतली.

Cow Rearing
Khilar Cow : खिलार जनावरे संगोपनातून आर्थिक स्थैर्यता

देशी गायींचं झालं गोकूळ

छावणीत घेतलेल्या गायीपासून पैदास होत आजमितीला गायकवाड कुटुंबाकडे लहान-मोठ्या धरून ३५ देशी अर्थात खिलार गायींचे गोकूळ तयार झाले आहे. आई-वडिलांच्या मदतीने योगेश (वय २६) आज संपूर्ण गायींचे व्यवस्थापन व दुग्ध व्यवसाय सांभाळतो आहे. धाकटा भाऊ अनिकेत ‘बीकॉम’पर्यंत शिकला असून, तो पंचगव्य तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

प्रशिक्षणानंतर गोमय, गोमूत्र यांपासून विविध पदार्थ तयार करण्याचा त्याचा मानस आहे. शंभर बाय २५ फूट आकाराचा गोठा आहे. मोठ्या गायी, पाडी आणि खोंडाना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक गायीचे टॅगिंग केले आहे. त्यावरून लसीकरण, गाभण काळ, वेत, पैदास आदी सर्व नोंदी ठेवल्या जातात. पाच एकरांत मका, ज्वारी, हत्ती घास अशी चारा पिके घेण्यात येतात. नोव्हेंबर-डिसेंबर हे दोन महिने गायी शेतात चरण्यासाठी बांधल्या जातात.

Cow Rearing
Cow Rearing : गोपालनात स्वच्छतेवर भर..

अर्थकारण

दररोज सुमारे १० ते १५ लिटर दूध संकलन होते. मागणीनुसार दीडशे रुपये प्रति लिटर या दराने
त्याची तर पाच हजार रुपये प्रति किलो दराने तुपाची विक्री होते. सुमारे १० वर्षे वयाच्या
खोंडांना अधिक मागणी असते. वर्षाकाठी ७ ते ८ खोंडांची विक्री प्रति ५० ते ७० हजार रुपये दराने होते.

पश्‍चिम महाराष्ट्रातून व्यापारी, शर्यतीचे शौकीन जागेवरून खरेदी करतात. गोमूत्र २० रुपये प्रति लिटर, तर शेण १० रुपये प्रति किलो असाही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवठा सुरू असतो.

देशी गायींचा लागला लळा

योगेश सांगतात, की लहान वयातच गायींबाबत आवड निर्माण झाली. बैलांचा, शर्यतीचा नाद लागला. त्यामुळे शाळेत कमी आणि गोठ्यात जास्त वेळ असायचो. त्यामुळे दहावीला अनुत्तीर्ण झालो. पण कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी मात करून पुढे जाण्याची ऊर्जा मिळाली होती. जिद्दीला कष्टांची जोड दिली. मध्यंतरी बैलगाडी शर्यतीवर बंदी आली.

मग मिळालेल्या वेळेत शिक्षण पूर्ण करायचे असा निर्धार केला. बीए मराठी या विषयातून पदवी मिळवली. जन्मदाती आई आणि लहानवयापासूनच दूध व मायारूपी ऊर्जा ठरलेली गोमाता हेच माझे आयुष्य असल्याचे सांगताना योगेशच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

संपर्क ः योगेश (ओंकार) गायकवाड, ९५६१६३२१८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com