Cow Rearing : गोपालनात स्वच्छतेवर भर..

Dairy Farming : जिल्ह्यातील पाथर्डी हा दुष्काळी तालुका. तालुक्यातील मोहोज देवढे येथील देविदास लक्ष्मण पिसे यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे.
Cow Rearing
Cow RearingAgrowon
Published on
Updated on

शेतकरी नियोजन ः गोपालन

शेतकरी ः देविदास लक्ष्मण पिसे
गाव ः मोहोज देवढे, ता. पाथर्डी, जि. नगर
एकूण शेती ः ६ एकर
एकूण गाई ः गाई १० व ४ कालवडी


Animal Care : नगर जिल्ह्यात बहुतांश शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देताना दिसत आहेत. मागील काही वर्षांपासून बागायती भागांसोबत जिरायती भागातील शेतकरीही दुग्ध व्यवसायाकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
जिल्ह्यातील पाथर्डी हा दुष्काळी तालुका. तालुक्यातील मोहोज देवढे येथील देविदास लक्ष्मण पिसे यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. पिसे यांचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची एकूण ६ एकर शेती आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी ७ वर्षांपूर्वी एका गाईचे संगोपन करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्या गाईला झालेल्या कालवडीची जोपासना करत गाईंच्या संख्येत वाढ करत नेली. सध्या त्यांच्याकडे १० गाई आणि ४ कालवडी आहेत. त्यापासून दररोज ४५ ते ५० लिटर दूध संकलन होते. याशिवाय त्यांनी गावामध्ये दूध संकलन केंद्रही सुरु केलेले आहे. तेथे दररोज २०० ते २५० लिटर दूध संकलन होते.
गाईंसाठी दोन वर्षांपूर्वी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या मदतीने त्यांनी टप्प्याटप्प्याने चार एकर शेती खरेदी केली. सहा एकर शेतीमधील एका एकरावर चारा पिके, साडेतीन एकरात तूर तर उर्वरित क्षेत्रात फळबाग लागवड आहे. जनावरांसाठी तूर, हरभरा, गहू इत्यादी पिकांचा भुस्सा साठवत ठेवत चारा टंचाईवर मात केली. शेतातील चारा पिकांच्या सिंचनासाठी शेततलाव तयार केला असून त्याद्वारे चारा उत्पादनाला फायदा झाल्याचे देविदास पिसे सांगतात.

Cow Rearing
Milch Cow Rearing : दुधाळ गाईंच्या संगोपनावर भर

दैनंदिन कामकाज ः
- दररोज सकाळी पाच वाजता गोठ्यातील कामांना सुरवात होते. सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व गाईंचे दूध काढणी केली जाते. त्याआधी चाऱ्याची कुट्टी करून गाईंना दिली जाते.
- सकाळी व संध्याकाळी मिळून प्रति गाई १८ ते २० किलोपर्यंत चारा दिला जातो. त्यात गिन्नी गवत, कडवळ, गव्हाचा भुस्सा, ओल्या बाजरी यांचा समावेश असतो. चाऱ्यासोबतच गोळीपेंड, सरकीपेंड व वालीस यांचे मिश्रण करून एका वेळी दीड ते दोन किलो प्रति गाय याप्रमाणे दोन वेळा दिले जाते.
- दूध काढल्यानंतर गाईंना मुक्तसंचार गोठ्यात सोडले जाते. सकाळी साधारण आठ ते साडेआठ वाजेपर्यंत हे काम चालते.

- मुक्त संचार गोठ्यात गाईंना चारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध केले आहे. त्यासाठी गोठ्यामध्ये जागोजागी बॅरल उभे केले आहेत.
- दिवसभर गाई मुक्त संचार गोठ्यात ठेवल्या जातात. त्यानंतर सायंकाळी पुन्हा चार वाजता कामांना सुरवात होते.
- सायंकाळी पुन्हा चाऱ्याची कुट्टी करून दिली जाते. त्यानंतर पुन्हा दूध काढणी केली जाते.
- सकाळ प्रमाणेच चारा व पशुखाद्य दिले जाते. त्यात सरकी पेंड, खनिज मिश्रण प्रति दिन १०० ग्रॅम प्रमाणे दिले जाते.
- दूध उत्पादन वाढ, गाईंच्या प्रकृती उत्तम राहावी. त्यांना पोषण घटकांचा पुरवठा व्हावा यासाठी प्रति गाय दररोज एका वेळी वीस ग्रॅम पोषण घटकांचा पुरवठा केला जातो.

Cow Rearing
Desi Cow Rearing : जनावरांच्या माध्यमातून केला आर्थिक उत्पन्नाचा पाया भक्‍कम

स्वच्छतेवर अधिक भर ः
- गोपालनात श्री. पिसे स्वच्छतेवर प्राधान्य देतात. गाई आणि गोठ्यातील स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. नियमित स्वच्छ पाण्याने गाई धुतल्या जातात.
- मुक्तसंचार गोठ्यातील शेण दररोज गोळा केले जाते.
- गोपालनापासून वर्षाला साधारण ४० ते ४५ टन शेणखत उपलब्ध होते. या शेणखताचा वापर घरच्या शेतीमध्येच करण्यावर देविदास यांचा भर असतो. त्यामुळे रासायनिक खतांवर होणाऱ्या खर्चात बचत झाल्याचे ते सांगतात. शिवाय चारा व अन्य पिकांची उत्पादनही दर्जेदार मिळते. सेंद्रीय खतांच्या वापरावर भर दिल्यामुळे उत्पादित चारा गायींना दिल्यानंतर दुधाच्या फॅट व एसएनएफ वाढीला मदत मिळते.
- गोठ्यात डास, गोचिडाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी
घेतली जाते. मुक्तसंचार गोठा असल्याने शक्यतो गोचिडांचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु प्रादुर्भाव दिसून आल्यास आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातात.

नवजात वासरांची काळजी ः
नवजात लहान वासरांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. वासरे चार महिने वयाची होईपर्यंत त्यांना गरजेनुसार दूध दिले जाते. त्यानंतर हळूहळू त्यांची दूध पिण्याची सवय कमी करून चारा खाण्याची सवय लावली जाते. दर्जेदार वासरांची उत्पत्ती होण्यासाठी गुणवत्तापूर्ण दर्जाच्या वळूचे सिमेन्सचा वापर केला जातो.

लसीकरणाला प्राधान्य ः
- कालवडींना व वासरांना नियमितपणे जंताच्या गोळ्या दिल्या जातात. दर तीन महिन्यांतून एकदा म्हणजे वर्षात चार वेळा जंतनाशकाच्या मात्रा दिल्या जातात. मागील एक महिन्यापूर्वी जंताच्या गोळ्या दिल्या आहेत.
- मागील काही दिवसांपासून लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी मागील महिन्यात पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांच्या मदतीने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले आहे.
- लाळ्या- खुरकूत हा जनावरातील महत्त्वपूर्ण आजार आहे. त्यासाठी वर्षातून दोन वेळा लसीकरण केले जाते. मागील तीन महिन्यापूर्वी ही लस दिली आहे.

देविदास पिसे ः ९०१११५८७७०
(शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com