
Kolhapur News: सलग दोन महिन्यांच्या पावसामुळे शेतकरी सावरतो न सावरतो तोच आता जिल्ह्यातील उसासह खरीप पिके ‘हुमणी’च्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. यंदा हुमणीचे भुंगे फेब्रुवारी महिन्यातच दिसून आले होते. पण मे महिन्यातील सलग पावसामुळे शेतकऱ्यांना भुंगे व किडीचे नियंत्रण करणे शक्य झाले नाही. याचा विपरित परिणाम विशेष करून खोडवा ऊस व भुईमुगासारख्या खरीप पिकावरही दिसून येत आहे.
वरून हिरवा दिसत असला तरी आतून वाळत पोखरत चाललेला ऊस उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये, विशेषतः पश्चिम भागातील ऊस पट्ट्यात, हुमणीचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत आहे. सध्या ऊस व भुईमूग या पिकांवर हुमणी अळीने हल्ला केल्याने उभ्या पिकांचे भवितव्य अनिश्चित ठरत आहे.
कृषी विभागाकडून, अद्याप शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या नाहीत, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, अद्याप आमच्याकडे याबाबतची अधिकृत नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होत असताना कृषी विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या संतापात भर घालत आहे.
केवळ पिकांचे नुकसान हाच एक मुद्दा नसून, या किडीचा वाढता प्रादुर्भाव भविष्यात जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. हुमणी नियंत्रणासाठी प्रभावी फवारणी औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. हुमणी किडीच्या प्रादुर्भावाबाबत प्रत्यक्षात शेतीचा आढावा घेतला असता हुमणीने गंभीर स्थिती आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत हुमणीने गंभीर स्वरूप धारण केले आहे.
केखले (ता. पन्हाळा) येथील शेतकरी महादेव पाटील यांच्या शेतात हुमणी दिसू लागल्याने त्यांनी हुमणी वेचून काढली. हीच स्थिती बहुतांश शेतकऱ्यांची आहे. हुमणी कीड खाण्यासाठी रानडुकरे पिकांची नासधूस करतात. एकीकडे हुमणी नुकसान करते आणि दुसरीकडे रानडुकरे हुमणीच्या आकर्षणाने पिके नष्ट करतात. पन्नास टक्के पेरण्या झालेल्या नाहीत. उर्वरित पेरण्या करण्यासाठी शेतकरी प्रयत्नात असताना हुमणीचे डोके वर काढल्याने शेतकरी अस्वस्थ झाल्याचे ज्योतीर्लिंग सेंद्रिय उत्पादक गटाचे अध्यक्ष जयवंत मगदूम यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. हुमणीमुळे शेकडो हेक्टर ऊस धोक्यात आला आहे. परिणामी, उत्पादन घटून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे. कारखान्यांनाही गाळपाचे उद्दिष्ट साध्य करताना दमछाक होणार असल्याचे शिरोळ येथील शेतकरी विनोद पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षी अतिपावसाने उत्पादन घटले आता हुमणीने ऊस शेती धोक्यात आणली. पिके घ्यायची कशी, असा हतबल सवाल पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील विठ्ठल पाटील यांनी केला. अशीच परिस्थिती अनेक ऊस उत्पादकांची आहे.
शेतकऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून सामोऱ्या आलेल्या मागण्या
- हुमणीच्या या गंभीर धोक्याचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक
- मोठ्या प्रमाणावर सामूहिक फवारणी मोहीम हाती घ्यावी आणि हुमणीचे जीवनचक्र तोडण्यासाठी एकाच वेळी उपाययोजना कराव्यात
- हुमणीच्या प्रतिकारशक्तिवर आणि स्थानिक वातावरणात प्रभावी ठरतील अशा जैविक नियंत्रणाच्या पद्धतींवर संशोधन करावे
- शासनाने हुमणीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, जेणेकरून त्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल
- शेतकऱ्यांमध्ये हुमणी नियंत्रणाबाबत योग्य माहिती आणि प्रशिक्षण दिले जावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.