Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : परतीच्या पावसामुळे राज्यातील ३० हजार हेक्टरवरील खरीप पिकांची हानी झाली आहे. देशातील मॉन्सूनच्या माघारीचा प्रवास यंदा २३ सप्टेंबरपासून सुरू झाला होता.
Kharif Crop Damage
Kharif Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : माघार घेता घेता मॉन्सूनने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिकांची हानी केली आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात पावसामुळे नष्ट झालेल्या पिकाचे क्षेत्र १८ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. देशातील परतीच्या पावसाच्या माघारीचा प्रवास यंदा २३ सप्टेंबरपासून सुरू झाला होता. सोमवारपासून (ता. १५) उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. मात्र राज्याच्या काही भागांत पुढील चार-पाच दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजदेखील वर्तविण्यात आला आहे.

कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांमधील उभ्या पिकांची मोठी हानी झालेली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत राज्यातील ३० हजार ५०० हेक्टरहून अधिक खरीप पिकांचे नुकसान झालेले होते. परतीच्या पावसामुळे सर्वाधिक हानी नाशिक जिल्ह्यात झालेली आहे. आतापर्यंत मालेगाव, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील खरिपांच्या पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या तालुक्यांमधील २६ हजार ३४८ हेक्टरवरील मका, सोयाबीन, भात, भाजीपाला आणि कांद्याचे नुकसान झालेले आहे. सांगलीच्या तासगाव, मिरज भागांतील अडीच हजार हेक्टरवरील ज्वारी, मका, मूग, उडीद, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे.

Kharif Crop Damage
Crop Damage : शिरसी येथे १०२ मिमी पाऊस मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे नुकसान

ठाणे जिल्ह्यातील ४५१ हेक्टरवरील खरीप पिके तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यातील १२८० हेक्टरवरील भात व भाजीपाला पिके परतीच्या पावसाने मातीमोल झाली आहेत. राज्यात यंदा १४४ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पेरा केला आहे. यात ५१ लाख हेक्टरवर सोयाबीन, तर ४० लाख हेक्टरवर कापूस आहे. याशिवाय साडेचौदा लाख हेक्टरवर भात आणि १० लाख हेक्टरवर ज्वारी उभी आहे. सध्या ११ लाख हेक्टरवर मका; तर १२ लाख हेक्टरवर तुरीचे पीक उभे आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस पिकाच्या काढणीला सुरुवात होत असून, नेमक्या याच कालावधीत मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्यास नुकसान वाढू शकते, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Kharif Crop Damage
Crop Damage : नाशिक जिल्ह्यात सणासुदीला अतिवृष्टीमुळे पिकांची दैना

राज्यात यंदा मॉन्सूनमुळे हानी झालेल्या पिकाचे क्षेत्र १४ ऑक्टोबरपर्यंत १८ लाख ३३ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाने खरिपात सर्वाधिक नुकसान नांदेड व परभणी जिल्ह्यांचे झालेले आहे. या जिल्ह्यांमधील अनुक्रमे ३.४४ लाख हेक्टर व ३.४० लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरातील २.१४ लाख हेक्टरवरील, तर जालना भागातील २.२० लाख हेक्टरवरील खरीप वाया गेला आहे. बुलडाण्याच्या मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद या तालुक्यांमधील दीड लाख हेक्टरहून जास्त खरीप पिके यंदा अतिपावसामुळे वाया गेली. यात मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, तूर व मका पिकांचा समावेश आहे.

विमा भरपाईकडे नजरा लागल्या

कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मॉन्सूनचा सर्वाधिक फटका बसला आहे. कापूस व सोयाबीन उत्पादकांना मदत वाटपाचे काम राज्यात सुरू असल्यामुळे पावसामुळे वाया गेलेल्या सोयाबीनविषयी जास्त तक्रारी झालेल्या नाहीत. परंतु शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पीकविमा योजनेतील भरपाईकडे लागून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com