Kharif Crop Damage : पावसाचा खरीप पिकांना दणका

Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील न्हावरा, पारगाव येथे १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील न्हावरा, पारगाव येथे १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका पाऊस पडला असून, शेतकऱ्यांची काढणी केलेला शेतीमाल झाकण्यासाठी धावपळ सुरू आहे. तर अनेक ठिकाणी काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीनसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे.

कोकणात भात पिकांना दिलासा

कोकणात दीर्घ पावसाच्या खंडानंतर पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. रायगडमधील कडाव, कळंब, कशेले ९७ मिलिमीटर, चौल येथे ५९ मिलिमीटर पाऊस झाला. रत्नागिरीतील भरणे येथे ८८ मिलिमीटर, तर शिर्शी, दाभीळ ८४, कडवी, देवरूख, फणसवणे, तेर्हे ७६ मिलिमीटर पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे ७० मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील कडावल, कसाल, वैभववाडी येथे ८५ मिलिमीटर, तर सावंतवाडी, बांदा ७९, मडुरा ७७, आजगाव ७५, माणगाव ७० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात झालेल्या पावसामुळे दोनही घाटरस्त्यांमध्ये दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे भुईबावडा घाटात शेकडो वाहने अडकली होती. दरडी हटविण्याचे काम सुरू आहे. मुसळधारेने हळव्या भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पालघरमध्ये तलवडमध्ये ७४ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना दिलासा मिळत आहे. तर भात खाचरातील पाणी अजूनही वाहत असल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत.

Rain
Crop Damage : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. तर भाजीपाला पिकांनाही फटका बसू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून या भागात दमदार पाऊस कोसळत आहे. नगर जिल्ह्यातही नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोलापूरमधील बोरामणी येथे ७७ मिलिमीटर पाऊस पडला. तर सांगलीतील माडग्याळ येथे ५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मराठवाडा, विदर्भात तुरळक सरी

मराठवाड्यात मागील दोन दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. या पावसामुळे कापूस, तूर पिकांना दिलासा मिळाला. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. अमरावतीतील टेंभूरसोंडा, माहुली येथे ३२ मिलिमीटर, तर हिवरखेड ४० मिलिमीटर, वर्ध्यातील आर्वी येथे ४५ मिलिमीटर, नागपुरातील बोरी, टकलघाट ४५ मिलिमीटर, चंद्रपुरातील मेंढा, मिढाळा येथे ४७ मिलिमीटर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी २९ मंडले वगळता इतर मंडलांत हलका, मध्यम, पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २२ मंडले वगळता इतर मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. काही मंडलांत पावसाचे हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली. बीड जिल्ह्यातील ७६ पैकी १८ मंडले वगळता इतर मंडलांमध्ये तुरळक, हलका, मध्यम तर काही मंडलांत दमदार पाऊस झाला. कपाशी आणि तुरीच्या पिकासाठी हा पाऊस पोषक ठरत असला तरी काढणीला आलेल्या सोयाबीनची पावसाने दाणादाण करणे सुरू केले आहे.

Rain
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस
एक एकर शेतजमिनीत सोयाबीन पेरणी केली असून हे पीक काढणीला येताच या आठवड्यात रोजच पाऊस पडत आहे. त्यातच उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने सोयाबीन पाण्यात सापडले आहे.
मुकूल सोळंके, शेतकरी, सेलू
आमच्या गावात अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले भरून पहिल्यांदाच भरून वाहिले. तर अनेक ठिकाणी काढणी केलेल्या बाजरी पिकांचे नुकसान झाले.
गिताराम कदम, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे

मंगळवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : ठाणे ३८, भाईंदर ३३, अलिबाग ५४, किहीम ३३, सरल, बवरली ३०, कर्जत ३७, नेरळ ४३, चौक, वाकण ३४, उरण ५२, कापरोली, जसइ, हमरापूर, वाशी ३६, माणगाव ४०, गोरेगाव ३४, लोणेरे ४५, वहाळ ४५, सावर्डे ५०, असुर्डे ३७, दाभोळ ३४, वाकवली ५२, पालगड ५५, खेड ५२, आंबवली ४८, कुळवंडी ४५, आबलोली ३८, जयगड ४८, मालगुंड ३६, तरवल ५४, मुरडव, माखजन ५६, देवळे ५२, तुळसानी ४२, सौंदळ ३०, भांबेड ३९, पाटगाव ३५, श्रावण ३१, आबेरी ४१, आबोली ५२, वेंगुर्ला ३२, शिरोडा ५१, कणकवली ४३, फोंडा ३०, सांगवे ४३, तळेरे ४०, वागदे ४४, कुडाळ ६६, वालावल ३१, पिंगुळी ६४, येडगाव ३६, तळवट ५२, अगशी ३७, विरार ४६, वाडा, कडूस, कोणे ५३, कांचगड ३९, डहाणू, मालयण ३१, पालघर ५२, मनवर ३९, बोयसर ४५, अगरवाडी ३५, तारापूर ४५, झरी ४६, विक्रमगड ६१.

मध्य महाराष्ट्र : मनमाड ३६, हिसवळ, सायखेडा, पांढुर्ली ३०, बाऱ्हे, मनखेड, वडांगळी ३९, निफाड ५२, सिन्नर ३४, पाटोदा, जळगाव, उमराणे ४४, चांदवड ३८. जळगाव : अडावद ४१, लासूर, हातेड ४३, पाळधी ३४, सावेडी ५७, कापूरवाडी ४१, नागापूर ७३, चिंचोडी पाटील ३७, वाळकी ४५, चास १०२, पारनेर ९८, भाळवणी ५६, सुपा ३७, वाडेगव्हाण ४७, वडझिरे ६३, निघोज ५८, टाकळी ८४, पळशी ४६, बेलवंडी ४२, चिंभळा ३६, देवदैठण ५७, कोळगाव ४१, राहुरी ४८, सात्रळ ३०, देवळाली ५२, टाकळीमिया ८६, ब्राह्मणी ४३, वांबोरी ७३, घारगाव, डोळासणे, साकूर ४४, उरुळीकांचन ५८, खेड ३२, अष्टापूर ३०, वेळू ३४, पानशेत, विंझर ३१, वडगाव रासाई ३५, मलठण ७८, तळेगाव ढमढेरे ३८, रांजणगाव ७३, पाटस ४३, केडगाव ४०, शेळगी ६०, उपळाई, नारी ४०, सुर्डी ६२, मैंदर्गी ४४, वागदरी ५०, दारफळ ४२.

मराठवाडा : वागरूळ ३९, बीड ३३, पेंडगाव ४१, कनेरी ४६, खंडाळी ४१, हडोळती ३३, उदगीर ३०, धाराशिव ग्रामीण ५५, बेंबळी ७६, अदमपूर ३३, आंबुलगा ४४.

राज्यात पावसाची स्थिती...

- खानदेशात तुरळक सरी.

- मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस.

- मराठवाड्यात लातूर, धाराशिवमध्ये हलका पाऊस.

- विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीत हलक्या सरी.

- कोकणात पुन्हा जोर वाढला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com