Kolhapur Fruit Market : कोल्हापूर बाजारपेठेत करवंद, जांभळाचा दरवळ

Kolhapur Fruit Marketplace : कोल्हापूरच्या बाजारपेठेत सध्या करवंद आणि जांभळाची आवक सुरू झाली आहे; करवंदाची आवक प्रतिवर्षाप्रमाणे असली तरी जांभळाच्या आवकेत काहीशी घट झाली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत कोल्हापुरात जांभूळ, करवंदांचा हंगाम टिकून राहणार आहे.
Kolhapur Market
Kolhapur MarketAgrowon

राजकुमार चौगुले

Kolhapur Fruit Market News : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड आदी डोंगरीपब्ट्यातील अल्पभूधारक शेतकरी, मजूर दिवसभर रानावनातून फिरून करवंद, जांभळाची तोडणी करतात. दुसऱ्या दिवशी हाच रानमेवा कोल्हापूर शहरात विक्रीस आणतात.

या भागात उन्हाळी हंगामात उपजीविकेसाठी दुसरे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना महिनाभर का होईना, करवंद, जांभळातून आर्थिक मिळकत होत असते. तुटपुंज्या कमाईतूनही डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मिळणारे समाधान मात्र कायम असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर शहरातील बाबू जमाल दर्गा परिसर करवंद आणि जांभळे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी फुलला आहे.

सहा वाजताच लगबग सुरू...

सकाळी सहा वाजता कोल्हापुरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या बाबू जमाल दर्गा परिसरात डोंगरी पट्यातील शेतकऱ्यांची लगबग वाढते. या बाजारात डोक्‍यावरून करवंद, जांभळाच्या बुट्ट्या घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे.

आपापल्या गावातून एसटी, ट्रक किंवा मिळेल त्या वाहनातून रानमेव्यांनी भरलेल्या बुट्ट्या कोल्हापुरात आणायच्या, बुट्ट्याचे वजन न करता काही मिनिटांतच बुट्टीतील मालाचा सौदा करायचा आणि ऊन व्हायच्या आत घराकडे परतायचे, असा या शेतकऱ्यांचा नित्यक्रम.

‘‘आमचा प्रवासाचा खर्च तरी निघू द्या हो... दादा तुम्ही इतका भाव कमी करताय... आमच्या कष्टाकडे पाहा हो,’’ असे म्हणत करवंदे काढताना रक्ताळलेले हात दाखविणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या विनवण्या गलबलून टाकतात.

केवळ शेकड्यात मिळणाऱ्या रुपयांसाठी बारा तास विना अन्न-पाण्याचे, दहा- दहा किलोमीटर डोंगरात हिंडून काट्याने भरलेल्या झाडांतून करवंदे काढताना होणाऱ्या वेदनेला मात्र अपेक्षित किंमत मिळत नाही, ही खंत आजही महिला शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे.

Kolhapur Market
Intercropping System Agriculture : खारपाणपट्ट्यात पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीने तारले

अल्पभूधारकांकडून संकलन

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड हे तालुके पूर्णतः डोंगराळ आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांतील शेतकरी प्रामुख्याने एप्रिल, मे महिन्यात जांभूळ, करवंदाचा हंगाम साधतात.

कारण या काळात शेतीमध्ये दुसरे कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने या शेतकऱ्यांना हा खडतर पर्याय निवडावा लागतो. चिंचवडे येथील मधुकर मोहिते म्हणाले, की आम्हाला जमते तसे आम्ही रानावनातून करवंद, जांभूळ गोळा करून विक्री करतो.

या दोन महिन्यांव्यतिरिक्त इतर वेळी आम्ही शेतीची कामे करून आमची उपजीविका करतो. एका बुट्टीत सुमारे पंधरा किलो करवंद, जांभूळ फळे मावतात. तिघे जण दिवसभर फिरल्यास एक, दोन बुट्ट्या करवंदे निघतात.

दुसऱ्या दिवशी आम्ही ती बाजारात आणतो. आम्हाला योग्य वाटेल तो भाव आम्ही दलालांना सांगतो. त्यातून भावाची घासाघीस होऊन शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही मान्य केलेल्या भावात हा सौदा पूर्ण होतो.

कोल्हापूर, सांगली भागांतील व्यापारी करवंदात प्रकार नसले तरी जांभळाचे दोन प्रकार असतात. ‘काटे जांभूळ’ ही आकाराने लहान असतात. त्यांची गोडी जास्त असली, तरी ती मऊ नसतात. ‘रेड जांभूळ’ आकाराने मोठी असतात.

त्यामध्ये गर जास्त असतो; पण गोडी कमी असते. भावात मात्र फारसा फरक पडत नाही. करवंद, जांभूळ खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांबरोबर सांगली जिल्ह्यातूनही व्यापारी येतात. ज्याची करवंद, जांभूळ फळे टपोरी असतील त्याला दर्जानुसार चांगला दर मिळतो.

यंदा मार्च-एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जांभूळ व करवंदांचा मोहोर गळाल्याने खूपच कमी फळांचे उत्पादन हाती आल्याचे कोनोलीपैकी हुंब्याचा धनगरवाडा (ता. राधानगरी) येथील बागूबाई हुंबे आणि उपवडेपैकी मारुतीचा धनगरवाडा येथील सखूबाई बोडके यांनी सांगितले.

किरकोळ विक्री फायदेशीर

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील अनेक धनगरवाड्यातील रहिवासी करवंदे, जांभूळ संकलन करतात. घाऊक बाजारात कमी दर मिळत असल्याने अनेक जण कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बसून जांभूळ, करवंदाची विक्री करतात. दिवसभर बसून जांभळाची विक्री केल्यानंतर घाऊक बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जादा रक्कम मिळते.

यामुळे अलीकडच्या काळात महिला शेतकऱ्यांकडून दिवसभर बसून करवंदे, जांभळे विक्री करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. मध्यवर्ती बस स्थानक, रंकाळा स्टॅंड, महाद्वार रोड, जुना राजवाडा परिसरात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातून आलेल्या महिला शेतकरी करवंद, जांभळाची विक्री करताना दिसतात.

Kolhapur Market
Agricultural inputs : कृषी निविष्ठांच्या स्वस्त विक्रीला विरोध

...असा आहे घाऊक बाजारभाव

कपिलतीर्थ मार्केट येथील व्यापारी अब्दुल मजीद बागवान म्हणाले, की यंदा या कालावधीत दररोज शंभर बुट्ट्या करवंद, जांभळे येत आहेत. मध्यंतरी काही काळ आवक कमी झाली होती. आता ती वाढत आहे.

जांभळाचे दर प्रतीनुसार पन्नास रुपये किलोपासून शंभर रुपये किलोपर्यंत आहेत. करवंदाच्या दहा किलोच्या पाटीला चारशे ते पाचशे आणि वीस किलोच्या पाटीला हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. सध्या करवंदाच्या सुमारे शंभर पाट्या आणि जांभळाच्या शंभर पाट्यांची आवक होत आहे.

जांभळाच्या उत्पादनात घट...

गेल्या दहा वर्षांपासून शेती वाडीतून फिरून आम्ही जांभूळ फळे गोळा करतो. आदमापूर भागातील शेतीवाडीत जांभळासाठी फिरावे लागते. दररोज तीस किलो जांभळे गोळा करून ती कोल्हापूरच्या बाजारात विक्रीसाठी आणतो. त्याची किरकोळ विक्री केली जाते.सकाळी दहा वाजेपर्यंत जांभळे आणायची आणि दिवसभर बसून ती विकायची असा दिनक्रम असतो.

मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ते वटपोर्णिमेपर्यंत जांभळाचा हंगाम सुरू असतो. या काळात आम्ही एकही दिवस न चुकता जांभळे गोळा करतो. या सर्व जांभळाची विक्री एका दिवसात करण्याकडे आमचा कल असतो. यंदा मात्र अति उन्हामुळे मोहोर करपून गेल्याने जांभळाचे उत्पादन घटले आहे.

दिवसभर फिरूनही केवळ दहा किलोपर्यंत जांभळे गोळा होत आहेत. गेल्या वर्षी बाजारात दीडशे रुपये किलोपर्यंत दर होता. या वर्षी तो अडीचशे रुपये किलोपर्यंत वधारला आहे. कमी संकलन असले तरी वाढलेल्या दरातून समाधानकारक रक्कम मिळविण्याकडे आमचा कल आहे. वर्षाला साठ ते सत्तर हजार रुपयांची जांभळाची विक्री आम्ही करतो. यंदा मात्र घट येत आहे. जांभूळ महाग झाल्याने यंदा ग्राहकांच्याकडून खरेदी धीम्या गतीने होत आहे.
संगीता मगदूम, (चुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com