Intercropping System Agriculture : खारपाणपट्ट्यात पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीने तारले

Indian Agriculture : वेगवेगळी पीकपद्धती जोपासून अनेक शेतकरी आपली उत्पादकता टिकवून आहेत. या क्षेत्रात योग्य फेरपालटासह प्रामुख्याने आंतरपीक प्रणाली फायदेशीर ठरत असल्याचे अकोला जिल्ह्यातील बहादुरा (ता. बाळापूर) येथील चंद्रशेखर साहेबराव माळी व कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.
Chandrashekhar Mali
Chandrashekhar MaliAgrowon

Success Story of Agriculture : बहादुरा शिवारात माळी कुटुंबाची एकत्रित ३९ एकर शेती आहे. ही संपूर्ण शेती खारपाणपट्ट्यात मोडत असून, बारमाही सिंचनही उपलब्ध नाही. अत्यंत गरजेच्या काळात पिकांना एखाद्या संरक्षित ओलिताची सोय करता यावी, म्हणून त्यांनी एक इलेक्ट्रिक कृषिपंप व एक सौरपंप बसवलेला आहे. चंद्रशेखर यांचे मोठे भाऊ रवींद्र माळी हे कृषी पदवीधर असून ते नोकरीला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा या शेतीत मोठा फायदा होत आहे.

...अशी राहते पीक लागवड

संपूर्ण ३९ एकराचे नियोजन वर्षारंभीच ठरवले जाते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने त्यांचा भर प्रामुख्याने खरीप हंगामावरच असतो. यात दरवर्षी खरिपात प्रामुख्याने १२ एकर क्षेत्रावर कपाशीचे विविध वाण, १२ एकरांवर सोयाबीन ही पिके सलग घेतात. दुसऱ्या १२ एकरात तूर, उडीद, मूग या कडधान्यांची आंतरपीक पद्धतीने पेरणी करतात. शिल्लक तीन एकरात नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील वर्षी त्यांनी तीन एकरात बाजरी, भगर, भादली, ज्वारी, मका व चारापिके घेतली होती.

जमिनीसोबत पीक फेरपालट :

माळी यांच्या शेतीपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे पिकाचा फेरपालट. पीक पद्धतीमध्ये दरवर्षी कडधान्यवर्गीय पिकांची लागवड असते. यात प्रामुख्याने उडीद अधिक तूर, मूग अधिक तूर, सोयाबीननंतर रब्बीमध्ये हरभरा अशी पिके असतात. या पीकपद्धतीमुळे जमिनीची सुपीकता कायम टिकून राहण्यास मदत होते.

कडधान्यानंतर पुढील वर्षी त्याच शेतात कपाशी, व नंतरच्या वर्षी सोयाबीननंतर रब्बीत हरभरा लावतात. तीन वर्षांतून एकदा शेणखत, लेंडीखताचा वापर करत असल्यामुळे सेंद्रिय कर्बासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध होतात. मागील काही हंगामांपासून त्यांनी रासायनिक खताची मात्रा अर्धी केली आहे. आवश्यकतेनुसार नॅनो युरिया व नॅनो डीएपी यांचा फवारणीद्वारे वापर केला जातो.

Chandrashekhar Mali
Agriculture Intercropping Practice : शाश्‍वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धती

खर्चात बचतीसाठी प्रयत्न...

कडधान्य व सोयाबीन या पिकांचे बियाणे तयार करून ते पुढील हंगामात वापरतात. त्यामुळे बियाणे खरेदीचा खर्च वाचतो.

पेरणीपूर्वी बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीजप्रक्रीया केली जात असल्यामुळे किमान एक ते दीड महिना पिकाचे संरक्षण होते.

तणनाशकाचा वापर करण्याऐवजी आंतरमशागतीवर भर. परिणामी जमीन भुसभुशीत राहून जलधारण क्षमता वाढते. खारपाणपट्ट्यात असूनही जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण अत्यल्प राहते.

नियमित पीक निरीक्षणानंतर किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर झाला असला तरच फवारणीचे नियोजन केला जाते. मुळात पिकाची फेरपालट, सेंद्रिय खतांचा वापर यामुळे पीक सशक्त राहते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो.

आवश्‍यकतेनुसार एखादे संरक्षित पाणी देत असल्याने उत्पादन साधण्यास मदत होते.

Chandrashekhar Mali
Intercropping Method : आंतरपिकांना बहर

लागवड पद्धती व नियोजन :

सर्वत्र कडधान्यवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी होत असताना माळी कुटुंबाने जाणीवपूर्वक या पिकांवर भर दिला आहे. खरिपात मूग, उडीद व तूर ही आंतरपीक पद्धती दरवर्षी जोपासत आहेत. उताराला आडव्या अशा मूग किंवा उडदाच्या चार ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरली जाते. मूग किंवा उडदाचे एकरी सहा किलो, तर तुरीचे एकरी तीन किलो बियाणे तुरीचे वापरतात. वाणाची निवड करताना मुगाचा उत्कर्ष वाण, उडदाचे टीएयू-१, पीकेव्ही१०-१ हे वाण, तर तुरीचा बीएसएमआर ७३६ या वाणाला प्राधान्य दिले जाते. कडधान्य पिकाच्या सुधारित वाणांचा बियाणे राखून पुढील हंगामात बीजप्रक्रिया करून वापरले जाते.

सर्व पिकांमध्ये आंतरमशागत नियमितपणे केली जाते. पेरणीनंतर २५ दिवसांच्या आत दोन वेळा डवरणी केली जाते. तण असल्यास एकवेळ निंदणी करतात.

पिकावरील रोग व किडींसाठी नियमित निरीक्षण करून फवारणीचे नियोजन केला जाते. शेंग अळी, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो, तर रसशोषक किडीमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. वेळीच केलेल्या नियंत्रणामुळे संभाव्य नुकसान टळते.

मूग किंवा उडीद या पिकांची काढणी केल्यानंतर आंतरमशागत करून तुरीला एकरी ४० किलो डीएपी, १० किलो युरियाची खतमात्रा देतात. पीक तणविरहित केले जाते. तुरीला फुलोरा अवस्थेपासून शेंगा अवस्थेमध्ये किडींचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. म्हणून फुलोरा अवस्थेपासूनच सुरवातीला निंबोळी अर्क व नंतर गरजेनुसार कीटकनाशकांच्या एक ते दोन फवारण्या घेतल्या जातात.

आंतरपीक पद्धतीचा खर्च व उत्पन्न

कडधान्यांच्या आंतरपीक पद्धतीमध्ये एकरी २३ ते २४ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. मुगाचे त्यांना एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पादन येते. त्यानंतर त्याच शेतातील तुरीचे उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटलपर्यंत असते. दोन्ही पिकांपासून साधारणतः ६३ ते ६४ हजार रुपये मिळतात.

उत्पादन खर्च वजा करता एकरी ४० हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो, असे त्यांनी सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुढील पिकासाठी बिवड होऊन जमिनीची सुपीकता कायम राहते. सोयाबीनचे एकरी साधारण ८ क्विंटल उत्पादन मिळते.

संपर्क : रवींद्र माळी, ८२७५२९६४७०,
चंद्रशेखर साहेबराव माळी, ७७२१९२६६०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com