Agricultural inputs : कृषी निविष्ठांच्या स्वस्त विक्रीला विरोध

Kharif Season : विक्रेत्याच्या ‘डिस्काऊंट’ योजनेपुढे अन्य विक्रेते घायाळ; संघटनेचा कंपन्यांवर दबाव
Agriculture Input
Agriculture InputAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Latur News : लातूर : एका विक्रेत्याने मुरूड (ता. लातूर) व तेर (ता. धाराशिव) येथील आपल्या कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू करत स्वस्तात खत, बियाणे व निविष्ठांची विक्री सुरू केली आहे. याचा फटका अन्य कृषी सेवा केंद्रांना बसत असल्याचा दावा करत धाराशिव तालुका फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स सिड्स डीलर्स असोसिएशनने अशा प्रकारच्या विक्रीस आक्षेप घेतला आहे. तसेच, असोसिएशनने संबंधित विक्रेत्याला कृषी निविष्ठांचा पुरवठा केल्यास कंपन्यांच्या मालाची विक्री न करण्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, असोसिएशनच्या दबावामुळे काही कंपन्यांनी विक्रेत्याला निविष्ठांचा पुरवठा बंद करण्याच्या हालचाली करण्याची शक्यता आहे. दोन दिवसापासून हा वाद शिगेला पोचला असून स्वस्त निविष्ठा विक्रीची योजना चालवणाऱ्या विक्रेत्यासह त्याच्या व्यवस्थापकाला धमक्याही दिल्या जात असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत. यात दोन्ही बाजूने ढोकी पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या आहेत.

मुळचे पळसप (ता. धाराशिव) व सध्या मुरूड येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश लाकाळ यांचे मुरूड व तेर येथे कृषी सेवा केंद्र आहे. मुरूड येथे त्यांच्या कुटुंबीयांचा चाळीस वर्षापासून व्यवसाय असून तेर येथे दहा महिन्यापासून त्यांनी केंद्र सुरू केले आहे. व्यावसायिक कौशल्यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी डिस्काऊंट कार्ड योजना सुरू केली. चार वर्षात सुमारे तेरा हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. याचा फटका अन्य विक्रेत्यांना बसत आहे. निविष्ठा विक्रीच्या भावात तफावत असल्याने अन्य विक्रेत्यांचा योजनेला विरोध आहे.

Agriculture Input
Agriculture Input Act : निविष्ठा कायद्यांना विरोध नाही

धाराशिव तालुका संघटनेने तेर येथील लाकाळ यांच्या केंद्रातून सुरू असलेल्या डिस्काऊंट योजनेला विरोध केला आहे. लाकाळ यांच्या केंद्राला निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन त्यांच्या कंपन्यांच्या मालाची विक्री न करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यामुळे कंपन्या लाकाळ यांना निविष्ठा पुरवठा बंद करण्याची शक्यता आहे. याबाबत लाकाळ यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (ता. तीन) निवेदन देत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या योजनेला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

फ्रान्समध्ये एम. एस्सी. कृषी व ब्राझीलमध्ये एमबीएचे शिक्षण घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत व्यवसाय करत आहे. शेतकऱ्यांना कमी भावाने दर्जेदार व प्रमाणित कृषी निविष्ठांची विक्री करण्यासाठी डिस्काऊंट योजना सुरू केली. योजनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. काही विक्रेते योजना बंद करण्यासाठी दबाव आणत असून धमक्या देत आहेत. मुरूडच्या केंद्रातून चार वर्षापासून सुरू असलेल्या योजनेला लातूर तालुका किंवा जिल्हा संघटनेचा विरोध नाही. धाराशिव तालुका संघटना तीव्र विरोध करत असून धमक्या देत कंपन्यांवर दबाव आणत आहे. कितीही दबाव आला तरी मी माझी योजना बंद करणार नाही.
- ऋषीकेश लाकाळ, विक्रेते, मुरूड व तेर.


व्यवसायात मोठी गुंतवणूक करूनही नफ्याचे मार्जिन खूप कमी असते. या ऋषीकेश लाकाळ यांच्याकडून मार्जिनपेक्षाही कमी दराने कृषी निविष्ठांची विक्री केली जात आहे. अन्य विक्रेत्यांना या दराने विक्री परवडत नाही. त्यांच्या योजनेमुळे विक्रेते अडचणीत आले आहेत. यामुळे असोसिएशनने कंपन्यांना पत्र देऊन लाकाळ यांना मालाचा पुरवठा केल्यास धाराशिव तालुक्यातील व त्यानंतर जिल्ह्यातील एकही विक्रेता संबंधित कंपन्यांच्या उत्पादनाची खरेदी विक्री करणार नाही, असे कळवले आहे. लाकाळ हे शेतकऱ्यांच्या
अज्ञानाचा फायदा घेऊन अन्य विक्रेत्यांबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुल्यानुसारच कृषी निविष्ठांची विक्री करावी, अशी आमची भूमिका आहे.
- आकाश नाईकवाडी, सचिव, धाराशिव तालुका फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स सिड्स डीलर्स असोसिएशन..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com