Dam Height Increase : कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी भू-संपादनाच्या सर्वेसाठी निवादा मागविण्यात आल्या आहे. बेळगाव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राचा धरणाची उंची वाढवण्यास विरोध आहे.
कर्नाटकमधील सर्वात मोठे धरण म्हणून अलमट्टी धरणाची ओळख आहे. हे धरण उत्तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर बांधले गेले आहे. सध्या धरणात १२३ टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणामुळेच २००५ व २००९ मध्ये कृष्णा नदीला (Krishna River) महापूर आल्याचा ठपका महाराष्ट्राकडून ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला की आलमट्टी व हिडकल या दोन धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते; पण महाराष्ट्रातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की, आलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे दरवर्षी आलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग याकडे महाराष्ट्राचे लक्ष ठेवले जाते.
आलमट्टी धरणाची सध्याची उंची ५१९.६०० मीटर असून ती कर्नाटक सरकार ५२४.२५६ मीटर करण्यात येणार आहे. त्याला केंद्रीय जल आयोगानेही कर्नाटकाला मंजुरी दिली आहे. या उंची वाढवल्यास धरणाची सुमारे ८० टीएमसी पाणीसाठा वाढणार आहे. त्याची क्षमता २०० टीएमसी होणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा फुगवटा वाढणार आहे.
गतवर्षी यासंदर्भात कोल्हापूर येथे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांची बैठक झाली होती. त्यावेळी आलमट्टी धरणाबाबत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवण्याबाबतचा निर्णय झाला होता. धरणाची उंची वाढविली तर सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना धोका असल्याचे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. पण उंची वाढविल्यामुळे महापूर येणार नाही, अशी कर्नाटकाची भूमिका आहे.
धरणाची उंची वाढण्यासाठी कर्नाटक जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) नव्याने भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. भू-संपादनासाठी ड्रोन सर्वेक्षण कामाचा ठेका देण्यासाठी जलसंपदा विभागाचा भाग असलेल्या कृष्णा भाग्य जल निगमकडून निविदा मागविण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.