Water Management : आपल्या पाण्याचा प्रवास

Ancient Indian Water Systems : अवतीभवतीचा निसर्ग, पर्यावरण, वारसा यांचा माणसाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पूर्वापार संबंध आला आहे. किंबहुना, या घटकांच्या आधारानेच माणूस विकसित होत आला आहे. या आपल्या सभोवतालाकडे वेगळ्या नजरेने पाहून, त्याचा अर्थ लावणारे, उकल करणारे लेख या सदरात वाचायला मिळतील. प्राचीन जलव्यवस्था हा आपला समृद्ध वारसा. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेत आहोत.
Ancient Indian Water Systems
Ancient Indian Water SystemsAgrowon
Published on
Updated on

Historical Water Conservation : माझे धोलाविरा येथे पूर्वीही जाणे झाले होते. ‘भवताल’च्या ‘कच्छ फॉसिल्स इकोटूर’ या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात पुन्हा जाणे झाले. धोलाविरा हे हडप्पा, अर्थात सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे ठिकाण. त्या ठिकाणी साधारणपणे पाच हजार ते तीन हजार वर्षांपूर्वी विकसित संस्कृती नांदली. या दोनेक हजार वर्षांच्या कालखंडात तिथल्या लोकांनी कधी समृद्धीचा काळ अनुभवला, तर कधी अवनतीचा काळही आला. या संस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची म्हणजे तेथील प्रगत जलव्यवस्था.

हे शहरच मुळी मनहर आणि मानसर या दोन छोट्या नद्यांमध्ये वसलेले होते. आता या नद्यांचे अस्तित्व विशेष जाणवत नाही, वर्षाचा बहुतांश काळ त्या कोरडे प्रवाह म्हणूनच दिसतात. पण त्या काळी याच नद्यांच्या पाण्याचा इतक्या चांगल्या प्रकारे वापर करून घेण्यात आला, की ते पाहताना आजही आपण अचंबित होतो. या दोन नद्या त्या भागातील भूजलाचे पुनर्भरण करत. कच्छमध्ये पावसाळ्यात काही काळापुरता पाऊस पडतो. या पावसाचे पाणी अडविण्यासाठी मनहर नदीवर खास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत असे.

त्याचबरोबर तिथल्या विहिरी, इतर स्रोत पाण्याने तुडुंब भरत. हे पाणी शेतीसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरले जायचे. इतकेच नव्हे तर तिथे पावसाचे पाणी खूप चांगल्या प्रकारे वळविण्यात आणि साठविण्यात आले आहे. हे पाणी त्या काळच्या धोलाविरा शहरातून खेळविण्यात आले होते. ते एकापाठोपाठ एक वेगवेगळे जलसाठे-तलाव यांच्यामधून फिरविण्यात आले. एक तलाव-जलसाठा भरला की पुढचा... अशी ही एकूण सोळा मोठाल्या तलाव-जलसाठ्यांची ही साखळी! त्यात हे पाणी उताराने पुढे जाते.

Ancient Indian Water Systems
Water Conservation : यशस्वी जलसंधारणासाठी ‘मनसंधारण’

पाण्यावर तग धरलेले शहर

धोलाविरा हे त्या काळी तब्बल शंभर हेक्टरवर पसरलेले तटबंदी असलेले शहर. हे संपूर्ण शहर या पाण्यावरच तग धरू शकले, विकसित झाले. पाण्याच्या व्यवस्थांबाबत आणखी एक थक्क करणारी बाब म्हणजे- पावसाचे पाणी किंवा सांडपाणी वाहून नेणारी भुयारी / जमिनीखालील व्यवस्था. याच ठिकाणी मोठाल्या तलावांबरोबर त्या काळातील बारव म्हणजेच स्टेपवेल सुद्धा मिळाली आहे.

रंजक बाब म्हणजे या स्टेपवेलच्या पायऱ्यांवर, त्या वेळी भांडी ठेवून ठेवून दगड झिजल्याच्या खोलगट खाणाखुणाही दिसतात. याचबरोबर, तिथे आता असते तशी उत्तम गोल विहीर सापडली आहे. त्यातून दोरी वापरून पाणी काढले जायचे. दगडावर दोरी घासल्यामुळे झालेल्या खुणा सुद्धा स्पष्टपणे दिसतात. या सर्वच गोष्टी, त्यांचे अवशेष पाहिले की त्या वेळच्या व्यवस्था किती प्रगत होत्या आणि त्या काळी पाण्याचा किती खोलवर विचार करण्यात आला होता याची कल्पना येते.

कोणत्याही ठिकाणी वस्ती करायची असेल, तर पाणी मिळवण्याच्या व्यवस्था कराव्याच लागतात. ती गरजच असते. पण पाणी आल्यानंतर त्याचा वापर कसा केला जातो, गावात-शहरात येणाऱ्या पावसाच्या पाण्याला कशी वाट करून दिली जाते, निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते वगैरे गोष्टी प्रगत नियोजनाचा भाग ठरतात. जे समूह या गोष्टी करतात ते एखाद्या विकसित संस्कृतीचा भाग बनतात किंवा अशा संस्कृतीला जन्म देतात. याचे उदाहरण धोलाविराच्या रूपात चांगल्या प्रकारे पाहायला मिळते.

पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

हडप्पा / सिंधू संस्कृतीत पाहायला मिळणाऱ्या या जलव्यवस्थांची परंपरा भारतात पुढेही वेगवेगळ्या कालखंडात दिसते. त्या त्या काळातील समाजाने आपल्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था विकसित केल्या. त्याच्यासोबतच विविध भागातील लोकांचा पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. हे सर्व होत असताना पाण्याच्या विविध व्यवस्था, पाण्याशी संबंधित तंत्रज्ञान, लोकांची पाण्याकडे पाहण्याची दृष्टी या अनुषंगाने बरीच देवाणघेवाण झाली आहे. जगाच्या विविध प्रदेशांत त्या काळी नांदलेल्या संस्कृतींनी एकमेकांना बरेच काही दिले, घेतले. त्यातूनच हे सर्व प्रत्यक्षात आले. अर्थात, पुढच्या काळात सामाजिक विषमतेच्या अनुषंगाने पाण्याच्या वितरणाबाबत निश्चितच काही उणिवा दिसतात, पण तो एकूणच तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा प्रभाव होता.

Ancient Indian Water Systems
Water Conservation : सह्याद्रीतील महिलांचे कष्ट कमी करणारे ‘कुंड प्रकल्प’

पाण्याच्या नियोजनाची, उत्तम व्यवस्थांची ही परंपरा अगदी अलीकडेपर्यंत कायम होती. अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांपर्यंत ती सुरू होती. त्यामुळेच आजही गावोगावी ऐतिहासिक जलव्यवस्था दिसतात, निदान त्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहताना, त्या काळात पाण्याचा किती विचार झाला होता याची कल्पना करून थक्क व्हायला होते. मात्र आता हे सर्व इतिहासजमा झाल्याजोगे आहे.

भयंकर वास्तव

वर्तमानात आपल्यापुढे असलेले वास्तव पाहिले तर आपण खरंच भूतकाळातील परंपरेचे वारसदार आहोत का, असा प्रश्‍न पडतो. या परंपरेचे अगदीच मोजके धागे काही ठिकाणी दिसतात खरे; पण ते नियम सिद्ध करणारे अपवाद असल्यासारखे. ते वगळता एकूणच पाण्याची, पाण्याच्या व्यवस्थांची आजची अवस्था भयंकर आहे. त्याला दूषित बनलेले नद्या-तलावांसारखे जलस्रोत अपवाद नाहीत, मोडकळीस आलेल्या व्यवस्था अपवाद नाहीत, सांडपाण्याची फसलेली व्यवस्था अपवाद नाही किंवा गावे-शहरांमध्ये पावसाचे साचून राहणारे पाणी... या कशाचाही अपवाद नाही.

आपले पाण्याचे नियोजन इतके रसातळाला गेले आहे, की अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या, पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्था कधीही कोलमडू शकतात. थोड्याशाच पावसात रस्ते पाण्याने भरून जातात, वसाहती-सोसायट्यांमध्ये पाणी साचून राहते. पूर्वी जे धो-धो पावसात घडायचे, ते आता पावसाच्या अगदीच किरकोळ सरी घडवून आणू लागल्या आहेत. महानगरे असोत की तालुक्याची मोठी ठिकाणे, सर्वत्रच मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांच्या जंजाळात, त्या प्रदेशातील पाणी वाहून नेणाऱ्या नदी-ओढे-नाले यांच्यासारख्या व्यवस्था नष्ट झाल्या आहेत किंवा ज्या अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पावसाच्या पडणाऱ्या पाण्याला वाहून जाण्यासाठी वाट करून द्यावी लागते, याचे साधे भानही आपल्याला उरलेले नाही. ग्रामीण भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी तुंबते आणि शेतात कितीतरी दिवस पाणी साचते.

सांडपाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना ओढे, नद्या, तलाव आणि समुद्र या जलस्रोतांमध्ये सोडून दिले जात आहे. त्याची परिणिती हे सर्वच जलस्रोत दूषित होण्यात, रोगराई-आजारांच्या विविध साथी पसरण्यात आणि त्यातील जैवविविधता नष्ट होण्यात होत आहे. उपलब्ध असलेले हे जलस्रोत प्रदूषित केल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण करण्यात आपण हातभारच लावत आहोत. त्याची झळ आज बसत आहेच, पण ही परिस्थिती उद्या आणखी बिकट होत जाणार आहे.

याच्याही पुढची बाब म्हणजे आपला पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. त्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. जगातील बहुतांश जुन्या संस्कृती पाण्याकडे आदरयुक्त दृष्टीने पाहायच्या, त्याचे पावित्र्य राखायच्या. भारतीय समाजही त्याला अपवाद नव्हता. पण आज हे शिल्लक आहे का, हा प्रश्‍न कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट. ती आज बाजारातील विक्रीयोग्य वस्तू बनली आहे, पिण्यासाठी स्वच्छ-शुद्ध पाणीसुद्धा विकत घ्यावे लागते. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या कशाही-कुठेही फेकून दिल्या जातात. पाणी कसेही वाया घालवले जाते.

याउलट, पूर्वी पाण्याच्या भांड्यालाही पाय लागणार नाही याची काळजी घेतली जायची, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे ही पुण्य कमावण्याची बाब मानली जायची, त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी जागोजागी पाणपोई असत, लोक आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ पाणपोई उभारत. त्याची जागा आता पाणी विकण्यातून पैसे मिळवण्याने घेतली आहे... म्हटले तर हा व्यवहार आणि म्हटले तर कितीतरी मोठा बदल.

हे बदल म्हणजे पाण्याचा कोणत्या दिशेने प्रवास झाला आहे, होत आहे याचे निदर्शकच! आणि ते चांगले, योग्य दिशेने झालेले किंवा कल्याणकारी म्हणता येतील असे नक्कीच नाही. मग इतक्या वर्षांमध्ये आपण सुसंस्कृत समाज म्हणून नेमके काय साधले? काय प्रगती केली? हे प्रश्‍न उपस्थित होतात. त्यांची उत्तरे वैयक्तिक पातळीवर शोधावी लागतीलच, शिवाय सामूहिकरीत्या सुद्धा!

(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

abhighorpade@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com