Jamun Season : जांभूळ पिकल्या झाडाखाली...

Jamun Market : जांभूळ पिकल्या झाडाखाली....या प्रसिद्ध गाण्यातून उल्लेख झालेल्या या रानमेव्याचा सध्या हंगाम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात विविध भागांत जांभळाची झाडे आहेत. अलीकडे औषधी गुणधर्मामुळे जांभळाला बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
Jamun Farming
Jamun FarmingAgrowon

Jamun Farming : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, निफाड, सटाणा या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधावर १५ ते २० संख्येपर्यंत जांभळाची झाडे दिसून येतात. एप्रिल अखेर ते मे-जून असा या फळाचा हंगाम कमी कालावधीचा असतो. दरवर्षी फळे काढणीयोग्य होण्यापूर्वीच शेतकरी व्यापारी शोधण्यात व्यस्त होतात. तर छोटे व्यापारी, विक्रेतेदेखील अशा शेतकऱ्यांच्या शोधात असतात.

अनेक शेतकऱ्यांकडे देशी झाडे पाहण्यास मिळतात. ही जांभळे आकाराने लहान असतात. जांभळामधील औषधी गुणधर्म लक्षात घेता अलीकडे ग्राहकांकडून जांभळाला मोठी पसंती देण्यात येत आहे. प्रक्रिया उद्योगातही त्यास मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी ओळखून ‘कोकण बहाडोली’सारख्या सुधारित वाणाच्या लागवडीसही पसंती दिली आहे. ही फळे टपोरी आणि आकर्षक असतात. ग्राहकांकडून दोन्ही वाणांना मागणी असते.

...असे असते काढणीचे नियोजन

अन्य फळांच्या तुलनेत उत्पादन, काढणी व काढणीपश्‍चात विक्री अशी सर्व कामे जांभळाबाबत काळजीपूर्वक करावी लागतात. जांभळाच्या झाडापासून सरासरी ९० ते १२० किलोपर्यंत उत्पादन मिळते. जांभूळ उत्पादक थेट खरेदीदारांना विक्री करतात. क्रेट तसेच पाटीप्रमाणे सौदे झाल्यानंतर खरेदीदार सकाळी सहा वाजेपासून मनुष्यबळाच्या मदतीने फळांची काढणी टप्प्याटप्प्याने सुरू करतात. पूर्ण झाड किंवा क्रेटनुसार खरेदीदारांकडून व्यवहार होतो. काढणी सुरू असताना पाऊस आला तर झाडावर पिकलेली जांभळे घोसातून गळून खाली पडतात.

त्यामुळे सौदे झाल्यानंतर त्याची जोखीम खरेदीदार घेत असतात. शेतकऱ्यांनाही अशावेळी मोठे नुकसान सोसावे लागते. पाऊस पडल्यानंतर जांभळाला तडे जातात. किडी, बुरशीचा प्रादुर्भाव होतो. माशीने डंख मारल्याने फळसड होते. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वी माल उतरविण्याची कसरत करावी लागते. तोडणी झालेली फळे पाटी किंवा क्रेटमध्ये भरून वरील भागात जांभळाचा पाला आच्छादित केला जातो. तर खालील बाजूस फळे ठेवण्यापूर्वी तळाला मऊ कापड, कागद किंवा आच्छादन पसरवून फळांना इजा होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते.

Jamun Farming
Jamun Fruit Rate : जांभळाला मिळतोय किलोला ४०० रुपये दर

काढणीपश्‍चात विक्री नियोजन

प्रत्येक वर्षी उपलब्धता व बाजारातील आवक यानुसार दर अवलंबून असतात. सातत्याने असलेली तापमान वाढ व अवकाळी पाऊस यामुळे झड झाली. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. साहजिकच मागणी कायम राहून दरात तेजी आहे. फळे नाशिवंत असल्याने ती अधिक दिवस साठवून ठेवणे शक्य नसते.

त्यामुळे जांभळे ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर व नाजूकपणे पोचविण्याची कसरत असते. घाऊक व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना मागणीनुसार पुरवठा करतात. हाताळणी व प्रतवारी केलेली असल्याचा फायदा दरात होतो. तुटवड्याच्या काळात फळांचा दर्जा असेल अधिक उठाव असतो. बाजारात आकर्षकपणे फळांची मांडणी केली जाते. स्थानिक विक्रेत्यांकडून ‘गोडवा’ या नावाने टपोऱ्या जांभळांची विक्री केली जाते.

जिल्ह्यात येथे होतात सौदे

इगतपुरी : मोडाळे, खोडाळे, मुरंबी, माणिकखांब, मुंढेगाव, खंबाळे, वाडीवऱ्हे, घोटी, शिरसाठे, टाकेघोटी, टाकेद. त्र्यंबकेश्‍वर- टाकेदेवगाव, हरसूल, चिंचवड, पेठ- कोहोर, करंजाळी, सुरगाणा- बोरगाव चिखली, दिंडोरी- खेडगाव, तिसगाव, बहादुरी, उमराळे, जांबूटके, सोनजांब, नाशिक- ओढा, लाखलगाव, आडगाव, गिरणारे सिन्नर, देवळा, सटाणा.

खरेदी-विक्रीची प्रमुख ठिकाणे

नाशिक बाजार समिती परिसर, दिंडोरी रोड

घोटी बाजार समिती परिसर, घोटी, ता. इगतपुरी

एचएएल पुलाजवळ, ओझर मिग, ता. निफाड

करंजाळी (ता. पेठ), सिन्नर, सुरगाणा, बोरगाव (ता. सुरगाणा)

प्रति किलो दरांची स्थिती

जांभूळ उत्पादकांकडून खरेदी...३५ ते ६० रुपये

घाऊक विक्री...७० ते ९०

किरकोळ विक्री...२०० ते ३००

Jamun Farming
Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट

नाशिक शहरासह ग्रामीण भागात विक्री : किरकोळ विक्रेते नाशिक शहरासह ग्रामीण भागातही विक्री करतात. नाशिक शहरातील पंचवटी परिसर, भाभानगर, नाशिक बाजार समिती परिसर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, सिडको, जुने नाशिक, नाशिक रोड या भागांत जांभळांची विक्री होते. त्रंबकेश्‍वर रोड, सप्तशृंगी देवी, सापुताराकडे (गुजरात) जाणाऱ्या रस्त्यांवरही जागोजागी जांभूळ विक्रेते दिसतात. मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल नाका, नाशिक-पुणे महामार्गावरील टोलनाका ही देखील विक्रीची ठिकाणे आहेत.

शेती भांडवलास आधार

टाकेदेवगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील विठाबाई चंदर राहाटे सुमारे १५ वर्षांपासून जांभूळ विक्री व्यवसायात आहेत. सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा प्रतिसाद कमी होता. अनेक वेळा जोखीम घेऊन काम केले. तोटाही सहन केला. आता अनुभवातून बाजार चांगल्या प्रकारे लक्षात आला आहे. जांभूळ विक्रीतून दरवर्षी त्यांना ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. मात्र त्यासाठी कष्ट मोठे असतात. या उत्पन्नातून शेतीकामासाठी भांडवल तयार होते.

सुमारे चाळीस वर्षे माझ्या वडिलांनी जांभूळ विक्रीचा व्यवसाय केला. आता ते थकल्याने सुमारे १० वर्षांपासून मी हा व्यवसाय पुढे चालवत आहे. विक्रीतून दररोज रोजंदारीप्रमाणे पैसा मिळतो. गुणवत्तापूर्ण मालाचीच खरेदी व विक्री करीत असल्याने अनेकवेळा ४०० रुपये प्रति किलोपर्यंत देखील उच्चांकी दर मला मिळाला आहे.
तुकाराम बोडके, ९३०७२६८४०३, (जांभूळ उत्पादक व विक्रेता, वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी)
दिंडोरी, नाशिक, निफाड तालुक्यात फिरून जांभळाची झाडे शोधतो व खरेदी करतो. झाडावर माल पाहून सौदे करतो. यामध्ये कष्ट अधिक असतात. मात्र दोन पैसे मिळतात. सकाळी लवकर ताजा माल काढून तो विक्रीसाठी उपलब्ध करतो.
गणेश टोंगारे, ७४९८३८५५४१ (जांभूळ व्यापारी, ओढा, ता.जि. नाशिक) कैलास राहाटे (मुलगा) ८९९९०९५४४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com