Summer Groundnut : उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

Article by Ravindra Palkar and Dr. Abhaykumar Bagde : खरीप हंगामापेक्षा किडींचा प्रादुर्भाव कमी असला तरी दर्जेदार उत्पादनासाठी किडींचे वेळीच एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
Pest Management
Pest Management Agrowon

रवींद्र पालकर, डॉ. अभयकुमार बागडे

Integrated Pest Management : खरीप हंगामापेक्षा रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाचे उत्पादन जास्त मिळते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक ठिकाणी भुईमुगाची पेरणी झाली आहे. सध्या उन्हाळी भुईमुग पीक काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत ते फुलोरा अवस्थेत आहे.

सद्यःस्थितीमध्ये उन्हाळी भुईमुग पिकावर मावा, फुलकिडे, तुडतुडे या रसशोषक किडी, तर पाने पोखरणारी अळी व केसाळ अळी या पतंगवर्गीय किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. खरीप हंगामापेक्षा किडींचा प्रादुर्भाव कमी असला तरी दर्जेदार उत्पादनासाठी किडींचे वेळीच एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

पतंगवर्गीय किडी

नागअळी किंवा पाने पोखरणारी अळी

पतंग लहान राखाडी व पुढील पंखांवर प्रत्येकी एक एक पांढऱ्या रंगाचा ठिपका असतो. अळी पाठीमागच्या बाजूस निमुळती व हिरवट तपकिरी रंगाची, डोके व छातीचा भाग गडद असतो.

अंड्यातून बाहेर आलेली अळी सुरुवातीला पान पोखरते. त्यामुळे पानांवर वेड्यावाकड्या रेषा दिसून येतात. मोठी अळी एकाच पानाच्या दोन कडा गुंडाळून पान खाते. ते पान उघडून पाहिल्यास त्यात अळी किंवा कोष सहज दिसतो.

जास्त प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण पीक करपल्यासारखे दिसते.

आर्थिक नुकसान पातळी ः ५ प्रादुर्भावग्रस्त पाने प्रति झाड (लागवडीनंतर ३० दिवसांनी)

केसाळ अळी

पतंगाचे पुढचे पंख पांढरे असतात. समोरच्या बाजूने आणि डोक्यावर पिवळसर रेषा असते. मागील पंख काळ्या चिन्हासह पांढरे असतात.

अळीच्या शरीरावर लांब, लालसर तपकिरी केस असतात. दोन्ही टोकांना काळ्या रंगाची पट्टी असते.

अळी सुरुवातीला कोवळ्या पानांच्या खालील पृष्ठभाग खरवडून खाते. त्यानंतर झाडाच्या पानांवर आणि मुख्य देठावर हल्ला चढविते.

आर्थिक नुकसान पातळी : ८ अंडीपुंज प्रति मीटर

Pest Management
Groundnut Sowing : पुणे विभागात साडेचार हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी

एकात्मिक कीड व्यवस्थापन

भुईमूग लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजूला चवळी व सोयाबीन या सापळा पिकांची लागवड करावी. जेणेकरून किडी त्याकडे आकर्षित होऊन मुख्य पीक सुरक्षित राहील.

मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रत्येक १० ओळींनंतर एक ओळ चवळी पिकाची सापळा पीक म्हणून लागवड करावी. जेणेकरून रसशोषक किडी व ढाल किड्यासारखे मित्रकीटक सापळा पिकाकडे आकर्षित होतील.

मका पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

पीक लागवडीनंतर ४० दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

नत्रयुक्त खतांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.

केसाळ अळीची अंडी व अळी अवस्था वेचून नष्ट करावी.

तुडतुडे व मावा किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी २५ ते ३० पिवळे चिकट सापळे तर फुलकिडींच्या नियंत्रणासाठी एकरी १० ते १२ निळे चिकट सापळे लावावेत.

नागअळीच्या सर्वेक्षणाकरिता एकरी १० ते १२ कामगंध सापळे उभारावेत.

पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी पाच प्रकाश सापळे लावावेत. शेतात पक्षिथांबे उभारावेत.

नागअळीच्या नियंत्रणासाठी, प्रौढ ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० किंवा प्रौढ टेलेनोमस रेमस ५०,००० प्रति हेक्टर प्रमाणे यासारखे परजीवी

कीटक दोन वेळा ७ ते १० दिवसांच्या अंतराने सोडावेत.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

Pest Management
Summer Groundnut Pest Management : उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचं कसं करणार एकात्मिक व्यवस्थापन?

रसशोषक किडी

मावा

लहान पिले सुरुवातीला फिक्कट हिरव्या रंगाची असतात. नंतर गडद हिरव्या रंगाची होत जातात. प्रौढ मावा कीड अंडाकृती पंखी आणि तपकिरी किंवा मोरपंखी रंगाचे तर बिगर पंखी गर्द तपकिरी मोरपंखी किंवा काळ्या रंगाचे असतात.

पिले व प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. रसशोषण करताना कीड विष्ठेद्वारे गोड मधासारख्या चिकट द्रव स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी, प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रिया मंदावते. पाने चिकट व काळी पडतात.

मावा कीड भुईमुगावरील स्ट्राइप विषाणू, पर्णगुच्छ आणि भुईमुगावरील रोझेट विषाणू या विषाणूजन्य रोगांचा प्रसार करते. आर्थिक नुकसान पातळी ः ५ ते १० मावा प्रति शेंडा (सुरुवातीच्या अवस्थेत)

फुलकिडे

रंगाने फिक्कट पिवळसर असून आकाराने अतिशय लहान म्हणजेच १ मि.मी. इतके असतात.

कोवळ्या शेंड्यावर व पानांवर आढळतात.

लहान पिले व प्रौढ पानांवर खरडून त्यातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर सुरुवातीला पांढुरके चट्टे व नंतर चमकदार तपकिरी ठिपके दिसून येतात.

फुलकिडे हे शेंडेमर (बड नेक्रोसिस) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. आर्थिक नुकसान पातळी : ५ फुलकिडे प्रति शेंडा (घडी केलेल्या पानांमध्ये)

तुडतुडे

हिरवे, पाचरीच्या आकाराचे आणि तिरकस चालीवरून पटकन ओळखता येतात.

पिले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने पिवळी पडून करपल्यासारखी दिसतात.

आर्थिक नुकसान पातळी ः ५ ते १० तुडतुडे प्रति झाड (पीक उगवणीनंतर ३० दिवस), त्यानंतर १५ ते २० तुडतुडे प्रति झाड.

रासायनिक नियंत्रण

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर मित्र कीटकांचे संवर्धन लक्षात घेऊन रासायनिक फवारणीचे नियोजन करावे.

किडीचे नाव कीटकनाशक प्रमाण (प्रति लिटर पाणी)

पाने पोखरणारी अळी, फुलकिडे, तुडतुडे आयसोसायक्लोसेरम (९.२ टक्के डीसी) १ मिलि

पाने पोखरणारी अळी मेथॉक्सिफेनोझाइड (२१.८ टक्के ईसी) ०.२४ मिलि

तुडतुडे थायामेथोक्झाम (१२.६० टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० टक्के झेडसी) (संयुक्त) ०.३ मिलि

मावा क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) २ मिलि

पाने पोखरणारी अळी डेल्टामेथ्रिन (२.८० टक्के ईसी) १.२५ मिलि

मावा, तुडतुडे इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) ०.२ मिलि

फुलकिडे, तुडतुडे, पाने पोखरणारी अळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (०.५ टक्का ईसी) ०.५ मिलि

तुडतुडे, फुलकिडे क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २.८ मि.ली

(लेबलक्लेम आहेत.)

रवींद्र पालकर, ८८८८४०६५२२

(आचार्य पदवी विद्यार्थी, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

डॉ. अभयकुमार बागडे, ९४२३२९७०२७

(सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com