Summer Groundnut Pest Management : उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचं कसं करणार एकात्मिक व्यवस्थापन?

सध्या भुईमूग पीक फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकांवर विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
Pest Management
Pest ManagementAgrowon

अमोल ढोरमारे, बी. डी. तायडे

भुईमूग हे तेलबिया पिकामधील (Oil Seed Crop) महत्त्वाचे पीक आहे. भुईमूग पिकाचे तीनही हंगामात उत्पादन घेतले जाते. भुईमूग पिकांत विविध कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चात वाढ होते.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (Pest Management) पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सध्या भुईमूग पिकामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी प्रादुर्भाव पाहून एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा.

१) मावा

- ही कीड १ ते २ मि.मी आकाराची असून रंगाला काळपट तपकिरी असते.

- पिल्ले व प्रौढ अवस्था जास्त नुकसानकारक.

- पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूला राहून रसशोषण करतात. त्यामुळे पाने आकसतात. झाडाची वाढ खुंटते.

- रसशोषण करताना कीड शरीरातून गोड चिकट द्रव टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येते.

आर्थिक नुकसान पातळी : रोपावस्थेत प्रति रोप ५ ते १० मावा कीड.

Pest Management
Orange Pest Management : संत्री, मोसंबीवरील कोळी किडीचे व्यवस्थापन

२) तुडतुडे

- फिक्कट हिरव्या व पिवळ्या रंगाचे असतात.

- पिल्ले व प्रौढ पानांच्या खालच्या बाजूने रसशोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून करपल्यासारखी दिसतात.

आर्थिक नुकसान पातळी : ५ ते १० प्रौढ प्रति झाड (पीक उगवणीनंतर ३० दिवसांनी)

३) फुलकिडे

- रंगाला पिवळसर आणि आकाराने लहान असतात.

- कोवळ्या शेंड्यावर व पानांवर आढळतात.

- किडीची पिल्ले व प्रौढ अवस्था अति नुकसानकारक असते.

- कीड प्रथम पानांतील रस शोषून घेते. प्रादुर्भावग्रस्त पानांवर जखमा दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त भाग सुरवातीला पांढुरका होऊन नंतर तपकिरी दिसतो.

- बड नेक्रोसिस नावाच्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.

आर्थिक नुकसान पातळी : ५ फुलकिडे प्रति शेंडा (रोपवस्था)

४) नागअळी किंवा पाने पोखरणारी अळी

- अळीचे मादी पतंग पानाच्या खाली साधारणपणे १५० ते २०० अंडी घालते.

- अंडी उबवल्यानंतर त्यातून बाहेर आलेल्या लहान अळ्या पानांतील हरितद्रव्य खातात. त्यामुळे पानांवर वेड्यावाकड्या रेषा दिसून येतात. मोठी अळी पानांची गुंडाळी करून आतमधील भाग खाते.

- किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर शेतातील पीक एकसारखे करपलेले दिसते.

आर्थिक नुकसान पातळी : ५ प्रादुर्भावग्रस्त पाने प्रति झाड (लागवडीनंतर ३० दिवसांनी)

Pest Management
Unseasonal Rain Crop Damage : अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल

एकात्मिक कीड व्यवस्थापन

- नागअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उन्हाळी भुईमुगाची पेरणी लवकर करणे गरजेचे आहे.

- पिकाची फेरपालट करावी. सोयाबीननंतर भुईमूग पीक घेणे टाळावे.

- आंतरपीक म्हणून बाजरी किंवा मका पिकाची लागवड करावी.

- नागअळीच्या सर्वेक्षणाकरिता एकरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत.

- भुईमूग पिकाच्या प्रत्येक २० ओळीनंतर एक ओळ चवळीची लावावी. त्यामुळे भुईमुगावर येणारी मावा कीड चवळीकडे आकर्षित होते.

- नत्रयुक्त खतांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.

- बड नेक्रोसीस (शेंडा मर) रोगाने प्रादुर्भावग्रस्त झाडे नष्ट करावीत.

- एकरी १० ते १२ पिवळे व निळे चिकट सापळे लावावे.

-नागअळीच्या नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी,

प्रौढ ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० प्रति हेक्टर किंवा प्रौढ टेलेनोमस रेमस ५०,००० प्रति हेक्टरी दोन वेळा ७ ते १० दिवसांच्या अंतराने सोडावेत.

रासायनिक नियंत्रण

वरीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने करावी. पॉवर पंपाने फवारणी करताना कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

कीड---कीटकनाशक प्रमाण (१० लिटर पाण्यातून)

१) मावा---क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी)---१० मिलि

२) पाने पोखरणारी अळी---डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के ईसी)---१२ मिलि

क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी)---१० मिलि

मेथॉक्सीफेनोजाइड (२१.८ टक्के एससी)---१७.५ मिलि

३) मावा, तुडतुडे---इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एसएल)---२.५ मिलि

४) तुडतुडे, फुलकिडे---क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी)---१४ मिलि

५) तुडतुडे---थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक)---३ मिलि

(टीपः लेबलक्लेम आहेत)

संपर्क - अमोल ढोरमारे, ९६०४८३३८१५, बी. डी. तायडे, ७०३०४१९९५०

(ढोरमारे हे कृषी कीटकशास्त्र विभाग तर तायडे हे कृषी विस्तार शिक्षण विभाग सौ.के.एस.के (काकू) कृषी महाविद्यालय, बीड येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com