Agriculture Management : रब्बी पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

Agriculture Nutrient Management : पिकांपासून शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासोबतच शेतीमालाची उत्तम गुणवत्ता मिळवण्याचे ध्येय प्रत्येक शेतकरी ठेवत असतो. हे आपले ध्येय गाठण्यासाठी पिकांच्या वाढीच्या अवस्था व त्या काळातील गरजेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची आवश्यकता असते.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. शुभम दुरगुडे, डॉ अनिल दुरगुडे

Agriculture Organic Farming : पिकांपासून शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासोबतच शेतीमालाची उत्तम गुणवत्ता मिळवण्याचे ध्येय प्रत्येक शेतकरी ठेवत असतो. हे आपले ध्येय गाठण्यासाठी पिकांच्या वाढीच्या अवस्था व त्या काळातील गरजेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची आवश्यकता असते. फळबाग आणि अन्य नगदी पिकांच्या तुलनेमध्ये हंगामी पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाकडे तितके गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे हंगामी पिकाचे उत्पादन कमी मिळून अखेर ती परवडेनाशी होत आहेत.

विविध पिकांसाठी जमिनीतील अन्नद्रव्ये हा मुख्य स्रोत आहे. जमीन किंवा त्यातील मातीची निर्मिती होत असताना ती ज्या खडकांपासून तयार झालेली आहे, त्यानुसार त्यातील खनिजे व मूलद्रव्ये मातीमध्ये उपलब्ध असतात. मात्र एकामागून एक पिके घेत गेल्यामुळे या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

हा अन्नद्रव्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खते देण्याची आवश्यकता असते. बहुतांश शेतकऱ्यांकडे सेंद्रिय खताची उपलब्धता वेगाने घटत आहे. सेंद्रिय खतांची उपलब्धता योग्य त्या किमतीमध्ये होत नसल्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ रासायनिक खतांचा वापर करत आहेत.

अशा प्रकारे कोणत्याही एकाच प्रकारच्या खतांवर अवलंबून राहिल्यास संतुलित अन्नद्रव्याच्या अभावामुळे पिकांची योग्य वाढ होत नाही. अंतिमतः पिकांच्या उत्पादनाला फटका बसतो. सुरुवातीला जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या सेंद्रिय घटकांच्या साह्याने मातीतून अपेक्षित उत्पादन मिळाले, तरी दीर्घकाळ व शाश्‍वत उत्पादन, मालाची प्रत, गुणवत्ता मिळणार नाही.

Organic Farming
Rabi Crop Management : रब्बी पिकांमध्ये कोळपणी, संरक्षित सिंचन महत्त्वाचे

त्यामुळे सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचे गुणधर्म आणि उपयुक्तता नेमक्या कशा प्रकारे असते, याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याने करून घेतली पाहिजे. उदा, सेंद्रिय खते जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म चांगले ठेवतात, तर जैविक खते ही वापरल्या गेलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतात. रासायनिक खतांद्वारे पिकांना तातडीने अन्नपुरवठा केला जातो.

म्हणूनच सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा एकत्रित व संतुलित प्रमाणात वापर करण्याची आवश्यकता असते. आपल्या शेतातून उपलब्ध होणाऱ्या पिकांचे अवशेषातून उपलब्ध होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण योग्य प्रकारे होईल, यावर भर दिला पाहिजे. त्याच प्रमाणे एकच एक पीक सातत्याने जमिनीमध्ये घेण्यापेक्षा पिकांची योग्य प्रकारे फेरपालट केली पाहिजे.

शास्त्रीय पीक पद्धतीचा अवलंब करावा. या सर्व घटकांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन केले असे म्हणता येते. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जैविक खते, नत्रयुक्त ॲझोला सारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा व इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल साधला जातो.

या पद्धतीत द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत आणि आंतरपीक पद्धतीत समावेश केला जातो. त्यातून जमिनीची सुपीकता टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाच्या संकल्पनेतून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविणे, जमिनीचे आरोग्य सुधारणा करणे आणि त्याच वेळी पर्यावरणपूरक विचारातून जमिनीची सुपीकता टिकवली जाते. या पद्धतीने पिकांची उत्पादकता शाश्‍वतपणे वाढवणे शक्य होते.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे घटक

सेंद्रिय खते

भरखते : शेणखत, कम्पोस्ट, लेंडी खात, गांडूळ खत, कोंबडी खात, शहरी कम्पोस्ट खत इ.

जोरखते : लिंबोळी पेंड, करंज पेंड, भुईमूग पेंड, सरकी, एरंडी, करडई पेंड, मासळीचे खत, हाडाचा चुरा इ.

हिरवळीची खते : ताग, धैंचा, शेवरी, चवळी, मूग, उडीद, गवार, बरसीम, गिरिपुष्प, सुबाभूळ इ.

जिवाणू खते

ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, अझोस्पिरीलम, ॲसिटोबॅक्टर, पीएसबी, अझोला, मायकोरायझा, बायजेरिंकिया, निळे-हिरवे शेवाळ, थायोबॅसिलस इ.

रासायनिक खते

नत्रयुक्त खते : युरिया, अमोनिअम सल्फेट

स्फुरदयुक्त खते : सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, डाय कॅल्शिअम फॉस्फेट

पालाशयुक्त खते : म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश

संयुक्त खते : २०:२०:०, १८:४६:०, १५:१५:१५ इ.

मिश्र खते : १८:१८:१०, १९:१९:१९, २०:२०:२० इ.

सूक्ष्म अन्नद्रव्ये खते : झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मँगनीज सल्फेट, कॉपर सल्फेट, अमोनिअम मोलीब्डेट, बोरॅक्स इ.

रब्बी पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, कांदा, भाजीपाला पिके इ. घेतली जातात. या पिकांसाठी तक्ता क्रमांक १. व २. मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.

तक्ता क्र १. रब्बी हंगामातील पिकांना खालील प्रमाणे सेंद्रिय, जैविक आणि कमतरतेप्रमाणे सूक्ष्मअन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे

अ.क्र. पिकाचे नाव शेणखत (टन /एकर) बियाणे / बेणे प्रक्रिया कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये खते (किलो / एकर)

१. गहू ४ ॲझोटोबॅक्टर १ किलो / ४० किलो बियाण्यास झिंक सल्फेट ८ किलो / फेरस सल्फेट १० किलो

२. ज्वारी २ ॲझोटोबॅक्टर १०० ग्रॅम / ४ किलो बियाण्यास झिंक सल्फेट ८ किलो / फेरस सल्फेट १० किलो

३. मका (संकरित) ४ ॲझोटोबॅक्टर २०० ग्रॅम / ८ किलो बियाण्यास झिंक सल्फेट ८ किलो / फेरस सल्फेट १० किलो

४. सूर्यफूल २ ॲझोटोबॅक्टर १०० ग्रॅम / ४ किलो बियाण्यास बोरॅक्स २ किलो / फेरस सल्फेट १० किलो

५. हरभरा २ रायझोबियम ७५० ग्रॅम / ३० किलो बियाण्यास झिंक सल्फेट ८ किलो / फेरस सल्फेट १० किलो

६. ऊस (पूर्वहंगामी) १० ॲसिटोबॅक्टर ४ किलो + ५० लिटर पाणी (३० मिनिटे बेणे प्रक्रिया) सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून ग्रेड १ : १० किलो

७ बटाटा ८ ॲझोटोबॅक्टर १ किलो + ॲसिटोबॅक्टर २०० मिलि + ५० लिटर पाणी सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून ग्रेड १ : १० किलो

८. कांदा ८ ॲझोस्पिरिलम १०० ग्रॅम / ४ किलो बियाणे झिंक सल्फेट ८ किलो / फेरस सल्फेट १० किलो

९. कोबी / फ्लॉवर ८ प्रक्रिया केलेले बोरॅक्स २ किलो / झिंक सल्फेट ८ किलो / फेरस सल्फेट १० किलो

Organic Farming
Rabi Sowing : पावसामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या

तक्ता क्र २. रब्बी हंगामातील पिकांना खालीलप्रमाणे अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे

पिकाचे नाव अन्नद्रव्ये (रासायनिक खते) (किलो / एकर) शेरा

०० नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)

गहू ४८ (१०५) २४ (१५०) १६ (२७) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.

ज्वारी ४० (८७) २० (१२५) २० (३३) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.

मका (संकरित) ४८ (१०५) २४ (१५०) १६ (२७) संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि नत्र तीन समान हप्त्यांत इराणीच्या वेळी, ३० दिवसांनी व ६० दिवसांनी अनुक्रमे.

सूर्यफूल २४ (५२) १२ (७५) १२ (२०) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.

हरभरा १० (२२) २० (१२५) १२ (२०) सर्व मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्यांच्या पाभरीने पेरावे

ऊस (पूर्वहंगामी) १३६ (२९५) ६८ (४२५) ६८ (११४) खालील टीप प्रमाणे ऊसाला खते द्यावीत

बटाटा ४० (८७) २४ (१५०) ४८ (८०) अर्धे नत्र, पालाश व संपूर्ण स्फुरद लागवडीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.

कांदा ४० (८७) २० (१२५) २० (३३) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.

कोबी / फ्लॉवर ६० (१३०) ३० (१८८) ३० (५०) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.

टीप : १) अन्नद्रव्ये मात्रांमध्ये कंसातील आकडेवारी म्हणजे रासायनिक खते उदा. युरिय, सिंगल सुपर फोस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश दिलेली आहेसर्व खतमात्रेत माती परीक्षणानुसार बदल करावेत. अन्नद्रव्ये कमी असल्यास शिफारशित खत मात्रा २५ टक्क्यांनी वाढवावी. मध्यम असल्यास शिफारशीप्रमाणे खत मात्रा द्यावी. अन्नद्रव्यंचे प्रमाण जास्त असल्यास शिफारशीतील खत मात्रा २५ टक्क्यांनी कमी करावी.

२) सूक्ष्म अन्नद्रव्ये पेरणीच्या वेळी शेणखतात मिसळून द्यावीत किंवा उभ्या पिकामध्ये ३० दिवसांनी एकरी ४० किलो शेणखतात आठवडाभर मुरवून द्यावीत.

३) ऊस पिकासाठी नत्र खत ४ वेळा विभागून द्यावी. (, ४० %, १० टक्के व लागवडीवेळी सरीतून १० टक्के खत, लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी ४० टक्के, १२ ते १६ आठवड्यांनी १० टक्के व मोठ्या बांधणीच्या वेळी ४० टक्के द्यावे.) तसेच स्फुरद व पालाश प्रत्येकी दोन वेळा ५० टक्के सारी खत व उर्वरित ५० टक्के खांदणीच्या वेळी द्यावे.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

- डॉ. शुभम दुरगुडे, ९०२१५९०१५० (खासगी कंपनीत मृदाशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत.)

- डॉ अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१ (मृदाशास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com