
डॉ. पी. एन. माने, डॉ. एस. जे. गहुकर, डॉ. बी. के. फरकाडे
Crop Protection For Groundnuts:
शेंगा पोखरणारी कीड
उन्हाळी हंगामात जमिनीतून येणाऱ्या वायर वर्म या शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. वास्तविक या किडीचे कुजलेले पीक अवशेष व पालापाचोळा हे मुख्य खाद्य असले तरी ती भुईमुगाच्या शेंगावरही हल्ला करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. या किडीची अळी परिपक्व होणाऱ्या शेंगांना छिद्र करते.
त्यामुळे सिंचनासाठी दिलेले पाणी शेंगात शिरून त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, शेंगदाणे सडतात. अडचणीची बाब म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव जरी पीक ६० ते ७० दिवसांचे असल्यामुळे सुरू होत असला, तरी काढणीवेळीच शेतकऱ्यांच्या लक्षात येतो. त्यामुळे पीक ७० दिवसांचे झाल्यानंतर दर काही काळाने एखाद दुसरे झाड उपटून कीड प्रादुर्भावाविषयी शहानिशा करत राहावी.
या किडीच्या व्यवस्थापनासाठी डवऱ्याची फेरी देण्याआधी (पीक पेरणीपासून ४५ ते ५० दिवसांनी) कार्बोफ्युरॉन (३ टक्के दाणेदार) हेक्टरी ५० किलो प्रमाणे कुजलेले शेणखत किंवा मातीत मिसळून द्यावे. नंतर ओलित करावे.
फुलकिडे
फुलकिडे आकाराने लहान असून त्यांचा मागील भाग निमुळता असतो. ते पानाचे कोवळ्या पानांत व शेंड्यात राहून पानांचा पुष्ठभाग खरवडतात. त्यातून निघणाऱ्या अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पानावर वरच्या बाजूस पांढरे, पिवळसर फिक्कट चट्टे पडतात, तर पानाच्या खालील भाग तपकिरी रंगाचा होऊन चकाकतो. या किडीमुळे शेंडेमर या रोगांचाही प्रसार होतो.
फुलकिड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ५ फुलकिडे प्रति शेंडा अशी आहे. ती गाठल्यावर क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १४०० मि.लि. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाणी (किंवा २८ मि.लि. प्रति १० लिटर पाणी) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) २०० ते ३०० मि.लि. प्रति हेक्टरी ४०० ते ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
तुडतुडे
तुडतुडे हिरव्या रंगाचे, आकाराने पाचरीसारखे असून पानाचे खालील बाजूवर आढळतात. पानातील रस शोषल्यामुळे पाने पिवळी पडतात. या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी १५ ते २० तुडतुडे प्रति झाड अशी आहे. ती गाठल्यानंतर क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १४०० मि.लि. प्रति हेक्टरी ५०० लिटर (२८ मि.लि. प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी किंवा थायामिथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० टक्के झेड.सी.) (संयुक्त कीडनाशक) १५० मि.लि. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
(लेखातील सर्व कीडनाशकांना लेबल क्लेम आहेत.)
डॉ. पी. एन. माने, ९९२२८८१२४५ (तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.