Tur Sowing Method: तूर पिकासाठी नावीन्यपूर्ण पेरणी पद्धती

Tur Cultivation: सोयाबीन पिकामधील अडचणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत असल्याने सलग तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सलग तूर लागवडीच्या नावीन्यपूर्ण आणि सुधारित पेरणी पद्धती आणि सोयाबीन : तूर आंतरपिकाच्या पट्टा पद्धती विषयी जाणून घेऊ.
Tur Farming
Tur FarmingAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture:

सोयाबीन पिकामधील अडचणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत असल्याने सलग तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सलग तूर लागवडीच्या नावीन्यपूर्ण आणि सुधारित पेरणी पद्धती आणि सोयाबीन ः तूर आंतरपिकाच्या पट्टा पद्धती विषयी जाणून घेऊ.

प्रचलित पद्धतीमध्ये शेतकरी सलग तूर फारच कमी प्रमाणात घेतात. सामान्यतः या पिकासोबत सोयाबीनचे आंतरपीक घेतले जाते. या पिकांच्या पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र (७ दाती, ६ दाती अथवा ५ दाती) आणि बैलजोडीने पेरणी करताना तिफण, चौफण अथवा तिदाती किंवा चार दाती काकरी व सरत्याचा वापर करतात. अशा पद्धतीने पेरणी करताना सोयाबीन ः तूर चे ६ : १, ५ : २, ४ : २ किंवा ४ : १ ओळी ठेवल्या जातात. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र हे सामान्यतः सोयाबीनचे वापरले जाते.

तुरीमधील अंतर योग्य ठेवण्यासाठी...

सोयाबीन कमी कालावधीचे पीक असून, त्याच्या दोन झाडातील अंतर साधारणत: ५ सेंमी राखले जाते. तूर पीक दीर्घ ७ ते ८ महिने कालावधीचे असून, त्याच्या दोन झाडांतील शिफारशीत अंतर १५ ते २० सेंमी आहे. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करताना सोयाबीनचे पेरणीयंत्र वापरले जात असल्यामुळे तूरही सोयाबीन प्रमाणेच पेरली जाते. हे चुकीचे ठरते.

तुरीच्या दोन झाडांतील अंतर वाढवून योग्य ठेवण्यासाठी पेरणीवेळी...

तुरीचे बियाणे प्रमाणातच वापरावे लागेल किंवा तूर बियाण्यामध्ये थोडी जाडसर रेती मिसळणे. तूर बियाण्यांसोबत डीएपी अथवा तत्सम दाणेदार खत १:१ प्रमाणात मिसळणे. अथवा पेरणीनंतर निंदणी करतेवेळी तुरीच्या विरळणी करून घेणे.

Tur Farming
Tur Procurement 2025 : तुरीचे ६ कोटी ४८ लाख रुपयांवर चुकारे अदा

रुंद सरी व अरुंद वरंबा पद्धती (ब्रॉड फरो, नॅरो रिज)

ही पद्धत बीबीएफ पेरणीपेक्षा वेगळी असून, सध्या केवळ शेतकऱ्यांच्या पातळीवर राबवली जाते. यात शेतकरी शेतात रुंद सऱ्या व अरुंद वरंब तयार करून घेतात. सऱ्यांची रुंदी ही ट्रॅक्टरच्या रुंदीनुसार राखली जाते. वरंब्यावर मजुरांच्या साह्याने टोकण पद्धतीने अथवा मानवचलित टोकण यंत्राच्या साहाय्याने तूर लावली जाते. त्यानंतर रुंद सरीमध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने सोयाबीन पेरले जाते. यातील प्रत्येक काम हे वेगवेगळे करावे लागत असल्याने शेतकऱ्यांसाठी थोडी खर्चिक आणि किचकट ठरते. तसेच ही पद्धत केवळ ओलितांमध्ये वापरणे फायदेशीर ठरते.

यातील समस्या पुढीलप्रमाणे आहेत...

कोरडवाहूमध्ये वापरली असल्यास, तूर पीक लहान असताना पावसात खंड पडल्यास ओलाव्याची कमतरता भासू शकते.मोठ्या पावसामध्ये रुंद सरीमध्ये पावसाचे पाणी साचून सोयाबीन पिकासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते.जास्त मोठ्या पावसाने वरंबा ढासळल्यास रोपावस्थेतील तुरीच्या मुळ्या उघड्या पडतात.पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणारी मध्यम ते भारी जमीन असली पाहिजे. अन्यथा नुकसान वाढते.या पद्धतीत रुंद सरी व अरुंद वरंबा तयार करणे, वरंब्यावर टोकण पद्धतीने तूर लावणे, रुंद सरीत ट्रॅक्टरने सोयाबीन पेरणे, तण नियंत्रणासाठी निंदणी अथवा तणनाशकाचा वापर करणे या सर्व बाबी वेगवेगळ्या कराव्या लागत असल्याने खर्चात वाढ होते.

Tur Farming
निर्मितीनंतर तणनाशकाचा शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास

गादी वाफा पद्धतीने सलग तूर

अलीकडे गादीवाफ्यावर सलग तूर पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यासाठी शेतकरी दोन ओळींतील अंतर ७ फुटांपासून १० फुटापर्यंत राखतात. त्यानुसार शेतात गादीवाफे तयार करतात. ठिबक सिंचन संच असल्यास गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने अथवा मानवचलित पेरणी यंत्राने पेरणी केली जाते. पेरणी करतेवेळी दोन झाडांतील अंतर अर्धा ते दोन फुटांपर्यंत राखले जाते. ओलिताची सोय असल्यास गादीवाफ्यावर पूर्वहंगामी (२० मेनंतर) सलग तूर पिकाची पेरणी करू शकतात. कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी आटोपल्यानंतर थोडी उशिरा तुरीची पेरणी करताना, तूर उगवल्यानंतर दोन ओळींच्या मधोमध दांड पाडून गादीवाफे तयार करून घेतात. सोयाबीन पिकाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तूर पिकाचा कालावधी जास्त असून उत्पादकता वाढीसाठी मोठा वाव आहे. अशा स्थितीमध्ये अनेक शेतकरी तूर पिकाकडे मुख्य पीक म्हणून पाहत आहेत.

ट्रॅक्टरद्वारे सलग तूर पेरणी

ज्या शेतकऱ्यांना सलग तूर पिकाची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करावयाची आहे. त्यांनी ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्राच्या बियाणे बॉक्समधील चार नंबरच्या कप्प्यात तुरीचे बियाणे घ्यावे. खताच्या बॉक्समधील मधल्या चार नंबरच्या कप्प्यात खत घेऊन व इतर सर्व कप्पे खाली ठेवावेत. अशा प्रकारे सलग तूर पिकाची पेरणी केल्यास, सोयाबीनच्या मधल्या सहा ओळींची जागा आपोआपच खाली राहते. प्रत्येक सातवी ओळ तुरीची पेरली जाईल. अशाप्रकारे सलग तूर पिकाची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना पेरणी यंत्राच्या सेटिंगमध्ये बदल करून तुरीचे बियाणे पातळ पेरता आल्यास चांगले. म्हणजेच दोन बियाण्यांतील अंतर साधारणत: अर्धा ते पाऊण फूट राखता येईल.

ज्या शेतकऱ्यांना सेटिंगमध्ये बदल करण्यात अडचणी येत असतील, तर तूर बियाण्यात १:१ प्रमाणात डीएपी अथवा तत्सम दाणेदार खत अथवा थोडी जाडसर रेती मिसळावी. म्हणजे त्याचा दोन बियाण्यातील अंतर वाढविण्यास फायदा होईल. पुढे निंदणी वेळी विरळणी करण्यात फारसा त्रास होणार नाही. विरळणी वेळी जोमदार वाढीचे केवळ एकच अथवा जास्तीत जास्त दोन झाडे ठेवावीत. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र पाच दात्याचे असल्यास, पेरणी यंत्राचे मधल्या म्हणजेच तीन नंबरच्या बियाण्याच्या कप्प्यात तूर बियाणे व खताच्या कप्प्यात खत घेऊन पेरणी करता येईल. सोयाबीनच्या खाली ठेवलेल्या चार ओळीनंतर तुरीची पाचवी ओळ पेरली जाईल. सोयाबीनच्या खाली राहिलेल्या जागेवर नंतर मधोमध दांड पाडून घेता येईल.

Tur Farming
Agrowon Podcast : सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे आहेत?

ट्रॅक्टरने जोडओळ सलग तूर पेरणी

ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने सलग तूर पिकाची जोडओळ पद्धतीत पेरणी करावयाची झाल्यास, सहा दाती अथवा सात दाती पेरणी यंत्राच्या बियाणे बॉक्समधील पहिल्या व शेवटच्या कप्प्यात तूर बियाणे भरावे. खताच्या बॉक्समधील पहिल्या व शेवटच्या कप्प्यात खत भरावे. शेताच्या अलीकडील धुऱ्यावरून पलीकडच्या धुऱ्यावर ट्रॅक्टर पोहोचल्यानंतर प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना साधारणत: ३ ते ३.५ फूट जागा सोडून पेरणी करावी. म्हणजे शेतात तुरीची जोडओळीत पेरणी शक्य होईल. तूर पिकाच्या उगवणीनंतर दोन जोडओळीमधील खाली जागेत मधोमध वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाडून घ्यावेत, म्हणजेच जोडओळीतील तूर गादीवाफ्यावर येईल.

टोकण पद्धतीने जोड ओळीत सलग तूर लागवड

बैलजोडीच्या साह्याने ३ अथवा ३.५ फुटी काकरीने संपूर्ण शेतात काकर म्हणजेच हलक्या सऱ्या ओढून घ्याव्यात. दोन झाडांतील अंतर अर्धा ते पाऊण फूट ठेवत मजुरांच्या साह्याने तूर टोकण करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच तुरीची जोडओळ - खाली ओळ- तूरीची जोड ओळ अशी जोडओळीत पेरणी होईल. तूर पिकाच्या उगवणीनंतर खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी मधोमध वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाडून घ्यावेत. म्हणजेच शेतात तुरीची जोडओळ - दांड - तुरीची जोडओळ असे चित्र तयार होईल. म्हणजेच जोडओळीतील तूर गादीवाफ्यावर येईल.

सोयाबीन : तूर आंतरपिकासाठी पट्टापेर पद्धती

सात दात्याच्या ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने सोयाबीन ः तूर आंतरपिकाची पेरणी करताना पट्टापेर पद्धतीने पेरणी करताना यंत्राच्या बियाणे व खत बॉक्समधील मधल्या म्हणजेच चार नंबरच्या कप्प्यात बियाणे व खत भरावे. याच्या आजूबाजूच्या (म्हणजेच अलीकडून तिसऱ्या आणि पलीकडून तिसऱ्या) नळीचे प्रत्येकी एक छिद्र बंद करावे. यानंतर पेरणी यंत्राच्या बियाण्याच्या व खताच्या अलीकडील आणि पलीकडच्या काठावरील दोन्ही कप्प्यांत सोयाबीनचे बियाणे व खत भरावे. नेहमीप्रमाणे पेरणी करावी. सोयाबीन दोन ओळी - खाली ओळ - तुरीची एक ओळ - खाली ओळ - सोयाबीनच्या दोन ओळी अशा पद्धतीने पेरणी झालेली असेल.

ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना सोयाबीनच्या दोन ओळींच्या बाजूला पुन्हा दोन ओळी सोयाबीनच्या येऊन चार ओळी सोयाबीन - खाली ओळ - तुरीची एक ओळ - सोयाबीन चार ओळी असे चित्र (धुऱ्यावरील तास वगळता) संपूर्ण शेतात तयार होईल. तूर पिकाच्या ओळीच्या आजूबाजूला खाली ठेवलेल्या सोयाबीनच्या ओळीमध्ये डवरणीवेळी डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड अथवा सरी पाडून घ्यावी. सोयाबीनच्या चार ओळी गादीवाफ्यावर तर तुरीची एक ओळ वरंबावर येईल. अशाप्रकारे शेतात गादीवाफ्यावर चार ओळी सोयाबीन सरी - वरंबावर तूर - सरी - गादीवाफ्यावर चार ओळी सोयाबीन असे चित्र शेतात तयार होईल. या पेरणी पद्धतीत तूर पिकाचे महत्त्व वाढून, तूर पिकाच्या समस्या कमी होतील. परिणामी, तूर पिकाची चांगली उत्पादकता मिळवणे शक्य होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com