Agriculture Research : ऑस्ट्रेलियातील शेती, वने आणि कुरणांतील नावीन्यपूर्ण संशोधन

Modern Agriculture : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थांना ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती, तांत्रिक ज्ञान तसेच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
Agriculture Research
Agriculture ResearchAgrowon
Published on
Updated on

मानसी डिचवलकर, डॉ. विनायक पाटील

Modern Agriculture Education : पदवीच्या अंतिम वर्षात असताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील निवडक विद्यार्थांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाकरिता निवड झाली. या विद्यार्थांना ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती, तांत्रिक ज्ञान तसेच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

विविध प्रशिक्षण सत्रांमधून कृषी उद्योजकतेबाबत माहिती घेता आली. तसेच आधुनिक तंत्रज्ञान व शाश्‍वत शेती, वानिकी प्रयोग आणि भविष्यातील कृषी शिक्षण पद्धतीबाबत संशोधन पाहता आले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि भारतीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प-संस्थागत विकास योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. प्रशांत बोडके यांच्या संकल्पनेतून मिळालेले आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण विद्यार्थांसाठी दिशादर्शक ठरले. या प्रशिक्षणाच्या दरम्यान वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये सुरू असलेले नावीन्यपूर्ण प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.

कवकजालाची किमया

जमिनीतील सहजीवी कवकजाल पिकांच्या निरोगी वाढीसाठी महत्त्वाचे असते हे सिद्ध झाले आहे. जमिनीतील विविध घटकांवर त्याची जडणघडण, प्रमाण आणि उपयुक्तता अवलंबून असते. ऑस्ट्रेलियातील जमिनीमध्ये स्फुरदची कमतरता आहे.

मका लागवडीमध्ये निरनिराळ्या प्रमाणात कवकजाल उपलब्ध करून दिल्यास स्फुरद कसा उपलब्ध होतो यावर संशोधन सुरू आहे. कवकजालाच्या वाढीसाठी कोणकोणती पोषक द्रव्ये आणि घटक जमिनीत किती प्रमाणात देणे आवश्यक आहे हे बघितले जात आहे.

हा प्रयोग प्रयोगशाळेत पूर्णपणे नियंत्रित वातावरणात केला जात असून तापमान, आर्द्रता यांच्या निरनिराळ्या स्तरांचा प्रभावसुद्धा तपासण्यात येत आहे.

Agriculture Research
Agriculture Success Story : ‘संघर्ष आहे! पण शेतीतच आयुष्य आहे...’

पूर्ण वृक्ष कक्ष

ऑस्ट्रेलियातील निलगिरी पर्वतरांगांमध्ये अनेकदा वणवे लागतात. त्यांचे प्रमाण कमी व्हावे किंवा लागलेच तर नुकसान कमी व्हावे यासाठी ठिकठिकाणी जलद कृती दले कार्यरत आहेत. त्यामध्ये स्थानिकांचा सहभाग असतो. ही जंगले हवामान बदलाला कसा प्रतिसाद देतील यावर विद्यापीठात संशोधन सुरू आहे.

विद्यापीठ प्रक्षेत्रावर एकदा लावलेले झाड नऊ मीटर उंचीचे होईपर्यंत पूर्णपणे बंदिस्त ठेवता येईल असे बारा पूर्ण वृक्ष कक्ष आहेत. झाडाच्या भोवती असणारे तापमान, मातीतील ओलावा, सिंचन, कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण, हवेतील आर्द्रता या गोष्टी नियंत्रित केल्यामुळे झाडाची वाढ आणि शरीरक्रियेवर परिणाम होतो.

बंदिस्त परिसंस्थेत होणाऱ्या वायू आणि पाण्याच्या विनिमयाचा अचूक आणि तपशीलवार अभ्यास करण्यात येत आहे. झाड कक्षापेक्षा उंच वाढायला आले, की ते तोडून त्याचा जैविक भार, कार्बन साठा इत्यादी मोजतात आणि निरनिराळ्या तापमान आणि कार्बन डायऑक्साइड पातळ्यांमुळे त्यात होणारे फरक नोंदवले जातात.

या झाडांच्या मुळांचा स्वतंत्रपणे अभ्यास करता यावा यासाठी जमिनीलगत आणि जमिनीत सर्व बाजूंनी एक मीटर खोल अवरोध केलेला आहे. बदलत्या हवामानाचे भविष्यात झाडांच्या वाढीवर काय परिणाम होतील हे समजण्यासाठी या प्रयोगांचा उपयोग होत आहे.

बृहत् पर्जन्यछाया निवारा

हवामान बदलाचा सर्वांत मोठा परिणाम पावसावर होताना दिसत आहे. दुष्काळ पडला किंवा पाऊस नेहमीपेक्षा ठरावीक प्रमाणात कमी झाला तर त्याचा पिकांच्या वाढीवर काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सहा बृहत् पर्जन्यछाया निवारा उभारण्यात आले आहेत.

प्रत्येक निवारा १२ मीटर लांब, ८ मीटर रुंद आणि ७ मीटर उंच आहे. या निवाऱ्यांमध्ये पिके आणि वृक्षांवर संशोधन करण्यात येत आहे. पारदर्शक छत बंदिस्त असल्यामुळे बाहेर कितीही पाऊस पडला तरी आतील पावसाचे प्रमाण कृत्रिमरीत्या नियंत्रित ठेवता येते किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण करता येते.

चारही बाजूंनी बृहत् पर्जन्यछाया निवारा खुले असल्यामुळे हवा, तापमान इत्यादी घटक नेहमीप्रमाणे राहतात. मात्र आत वाढत असलेल्या पिकांची मुळे बाजूच्या मातीपासून अवरोध निर्माण करून वेगळी ठेवली गेली आहेत. अशा प्रकारे निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या परिस्थितीत पिकांच्या उत्पादकतेत पडणाऱ्या फरकांची नोंद घेतली जात आहे.

Agriculture Research
Agriculture Research : मुळांच्या शोषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रथिनांचा लागला शोध

‘डीआरआय-ग्रास’ सुविधा प्रकल्प

ऑस्ट्रेलियात पशुपालन हा मुख्य व्यवसाय असून मांस व दुग्धजन्य पदार्थ हे प्रमुख अन्न आहे. मोठमोठ्या बंदिस्त कुरणांमध्ये विविध पशूंचे कळप पाळले जातात. त्यामुळे कुरण परिसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कुरण परिसंस्थेचे शाश्‍वत व्यवस्थापन हे उच्च गुणवत्तेच्या चारा उपलब्धतेवर अवलंबून असते. दीर्घकालीन दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि वाढता पूर कालावधी यांची वारंवारता सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अनुभवास येत आहे. मांस आणि दुग्ध व्यवसायातील उत्पन्न हे कुरणांच्या उत्पादकतेवर अवलंबून असते.

हवामान बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे हा व्यवसाय प्रभावित झाला आहे. दुष्काळाचे कुरणांवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी डीआरआय-ग्रास सुविधा उभी करण्यात आली आहे. एका मोठ्या कुरणात पारदर्शक फायबर ग्लासचे पन्नास सेंटिमीटर उंचीचे अनेक तिरपे निवारे उभे केले आहेत.

त्यांच्यावर पडणारा पाऊस जमा केला जातो आणि आवश्यक तेवढेच जमा झालेला पाणी निवाऱ्याच्या खाली असणाऱ्या गवताला दिले जाते. त्यातून गवतांची विविधता, त्यात होणारे बदल आणि त्या परिसंस्थेत चालणारे कार्बनचक्र आणि जलचक्र यांचा अभ्यास होत आहे. ठरावीक कालावधीनंतर निवाऱ्या खालचे गवत कापून त्याचे विश्‍लेषण करण्यात येते.

हवामान बदलाच्या उच्च परिणामांचा अभ्यास

हवामान बदलाच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याकरिता ‘पाश्‍चर अँड क्लायमेट एक्स्ट्रीम’ हा संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये सी-३ आणि सी-४ वनस्पतींच्या कुरणांच्या जोड्या करून पर्जन्यमान वाढ किंवा घट, तापमान वाढ, पूरजन्य परिस्थिती तसेच सूक्ष्म जीवजंतूची कुरण परिसंस्थेतील महत्त्वाची भूमिका अभ्यासली जात आहे.

मृदाजीवशास्त्र आणि या सर्व घटकांचा पर्यायी प्राण्यांवर होणारा परिणाम, कुरण परिसंस्थेकरिता अनुकूल वनस्पती आणि इन्फ्रारेड उष्मा दिव्यांपासून होणारी तापमान वाढ यांचा देखील सखोल अभ्यास होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com