Agriculture Management : शाश्‍वत शेती व्यवस्थापनाची गरज

Farming Management : उत्पन्नाचे विविध स्रोत असतील तर शेती व्यवस्थापन फायदेशीर ठरते. यामध्ये नगदी पिके, तृण धान्य, तेलबिया पिके, भाजीपाला, फळ पिके, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन अशा प्रकारे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.
Agriculture Management
Agriculture ManagementAgrowon
Published on
Updated on

वाल्मीक जंजाळ

Farming System : सध्याच्या काळात शाश्‍वत शेती पद्धत वातावरण बदलाच्या स्थितीत अधिक उपयुक्त ठरणारी आहे. पशू संगोपनावर देखील हवामान बदलाचे परिणाम होत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण वाढणार आहे. यातून समुद्रसपाटीपासून उंचीवरील भागात पावसाचे प्रमाण वाढेल, मोसमी पावसाच्या पद्धतीवर याचा परिणाम होईल. काही भागात पावसात मोठे खंड पडतील, काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होईल. काही भागात वादळांची वारंवारता वाढणार आहे. पिकांवर कीड, रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

अनुवांशिकदृष्ट्या वैविध्य आणि विपुल प्रमाणात प्रजाती असलेल्या परिसंस्था हवामान बदलाशी सहजरीत्या जुळून घेऊ शकतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी जुळून घेणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांची गुणांनुसार निवड करावी लागणार आहे. यासाठी पीक पद्धतीत अधिक लवचिकता आणणे आवश्यक आहे. येत्या काळात अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणाऱ्या प्रजातींची लागवड आवश्यक झाली आहे.

जमिनीत सेंद्रिय कर्ब भरपूर असेल पीक वाढीसाठी फायदा होतो. सातत्याने आंतरमशागत केल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक कमी होतात. या उलट कमी मशागत, पिकांची फेरपालट, आंतरपिके आणि पिकांच्या अवशेषांचे आच्छादन केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीत ह्यूमस वाढते, जमिनीची जलधारण शक्ती वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. आच्छादानामुळे जमिनीचे तापमान वाढत नाही, ओलावा उडून जात नाही आणि पिकांची पाण्याची गरज कमी होते.

Agriculture Management
Agriculture Management : नियोजन केल्यास कोणत्याही उद्योगापेक्षा शेती व्यवसाय सरस

उत्पन्नाचे विविध स्रोत असतील तर शेती व्यवस्थापन फायदेशीर ठरते. यामध्ये नगदी पिके, तृण धान्य, तेलबिया पिके, भाजीपाला, फळ पिके, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन अशा प्रकारे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. एकूण क्षेत्राच्या ३० टक्के अतिवृष्टी सहन करणारे पिके, ३० टक्के दुष्काळ सहन करणारे पिके (६० टक्के क्षेत्रावर पाण्याची उपलब्धता बघून चारा पिकांसह विविध पिकांची लागवड), २० टक्के भाजीपाला लागवड आणि २० टक्के फळपिकांची लागवड करावी. त्यासोबत शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालनाची जोड द्यावी.

शेतीचा व्यावसायिकदृष्टीने काटेकोर ताळेबंद मांडण्याची गरज आहे. त्यासाठी शेती व्यवसायातील जमा खर्चाच्या नोंदी शास्त्रीय पद्धतीने ठेवाव्यात. अनेक वेळा शेतकऱ्यांकडे नोंदी नसल्यामुळे नेमका किती फायदा अथवा तोटा झाला, हेच समजत नाही. हे हिशेब शेतीशिवाय इतर जोडधंदे, उदा. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, फळबाग, फुलशेती यासाठी उपयुक्त ठरतात. त्याचा उपयोग पुढील वर्षातील शेतीच्या नियोजनासाठी होतो.

Agriculture Management
Agriculture Management : नियोजनातून शाश्‍वत उत्पादन घेता येईल

ग्रामीण विभागामध्ये तसेच शेती व्यवसायाला भांडवलाचा पुरवठा करण्यामध्ये सरकारी बँका, सहकारी बँका, पतसंस्था यांचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागलेला आहे. ग्रामीण विभागाच्या विकासामध्ये मायक्रो फायनान्स पद्धतीचा महत्त्वाचा वाटा आहे. कर्ज घेताना धोक्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कर्ज परतफेड वेळेत केल्यास तुमची बँकांमध्ये पत टिकून राहते.

- वाल्मीक जंजाळ, ९०९६३९६०३२

(कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर)

समूह शेतीला संधी

परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत गट किंवा समूहाच्या माध्यमातून शेती विकास करण्यासाठी सध्या चांगली संधी आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यातून वेगवेगळी पीक पद्धती आणि पूरक व्यवसायाचे नियोजन करता येते. एकत्रित निविष्ठा (बियाणे, खते, कीडनाशक, पशुखाद्य) खरेदी करणे शक्य होते.

यातून उत्पादन खर्च कमी करता येतो. एकमेकांना शेती कामासाठी मदत केल्याने मजूर खर्च कमी होऊ शकतो, एकमेकांच्या साधनसामग्रीचा वापर केल्याने आर्थिक बचत होते. समूह शेतीमुळे आपला शेतीमाल लांबच्या बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतूक खर्च कमी होतो. तसेच दरही चांगला मिळतो. गट शेती किंवा समूह शेतीमुळे खर्च आणि जोखीम कमी होऊन आपल्या हाती शाश्‍वत उत्पन्न मिळते.

मोठ्या प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक किंवा शेतकरी समूह बनवावा. शेतीमाल उत्पादनाचा ट्रेडमार्क बनवून शहरी भागात स्वतः शेतीमालाची विक्री करावी. अनुभवी शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थापनाचा बारकाईने अभ्यास करून शेतीमाल योग्य भावात कसा विकेल याचा विचार करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com