
Cotton Farming Solution: बहुतांश शेतकरी बीटी कपाशीची लागवड ही प्रचलित विषम पद्धतीने करतात. मात्र त्यामुळे दोन ओळींतील अंतर जास्त (उदा. चार ते पाच फूट) व दोन झाडांतील अंतर कमी (उदा. एक ते दीड फूट) राखले जाते. दोन ओळींतील अंतर ठरविताना जमिनीचा प्रकार, खोली, व्यवस्थापन, ओलिताची संभाव्य पद्धत याचा विचार केला जातो.
तसेच शेताच्या एका बाजूने मोठ्या काकरीने (उदा. चार फुटी काकरी) शेतात काकर पाडून घेतात. त्यानंतर मजुरांच्या साह्याने दोन ओळींतील अंतर साधारणतः सव्वा ते दीड फूट ठेव बीटी कपाशी बियाण्यांची टोकण केली जाते. यातही दोन झाडांतील अंतर एकसारखे राखले जाईलच याची शाश्वती नसते.
प्रचलित विषम पद्धतीच्या लागवडीमुळे उद्भविणाऱ्या अडचणी
महाग बीटी बियाण्याचा अपव्यय. (बियाणे खर्चात वाढ.)
उभ्या पिकातील आंतरमशागत (उदा. डवरणी, कोळपणी, वखरणी) एकाच दिशेने करावी लागते.
तणनियंत्रणासाठी तणनाशक वापरावरील निर्भरता वाढते.
दोन झाडांतील अंतर कमी जास्त असल्यामुळे पीक दाटण्याची समस्या संभवते.
निगराणी, निरीक्षण शक्य न झाल्यामुळे कीड, रोगांचा उपद्रव वाढतो.
फवारणी एकाच दिशेने करावी लागते. परिणामी, कव्हरेज न मिळाल्याने कीड, रोग आटोक्यात येण्यात अडचणी येतात.
ओलित करताना अडचणी उद्भवितात.
पीक दाटलेले असल्याने वेचणी करताना अडचणी येतात. वेचणी खर्चात वाढ होते.
कीड-रोगांचा प्रादुर्भाव अधिक राहतो. उदा. रोपटे अवस्थेतील वाणीचा उपद्रव, रोपट्यांची मर, पातीगळ, आकस्मिक मर, रसशोषक किडींचा (उदा. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इ.) उपद्रव, लाल्याची समस्या, गुलाबी बोंडअळींचा उपद्रव, बोंडगळ, बोंडसड इ.
नावीन्यपूर्ण आयताकृती चौफुलीवर लागवड
बीटी कपाशीच्या लागवडीसाठी दोन ओळींतील राखावयाच्या अंतरानुसार (उदा. ४ फूट) शेताच्या उत्तर - दक्षिण दिशेने म्हणजेच दक्षिणोत्तर चार फुटी काकरीने उभे काकर (हलक्या सऱ्या) पाडून घाव्यात. यानंतर सोयाबीनच्या सव्वा ते दीड फुटी काकरीने शेताच्या पूर्व - पश्चिम दिशेने आडवे काकर पाडावेत. यामुळे शेतात ४ फूट × सव्वा ते दीड फूट अशा आयताकृती चौफुल्या तयार होतील. या प्रत्येक चौफुलीवर मजुरांच्या साह्याने बीटी कपाशीचे केवळ एकच बी लावावे.
याचे फायदे पुढीलप्रमाणे...
कमी बियाणे लागते. परिणामी खर्चात बचत.
उभी, आडवी आंतरमशागत (डवरणी / कोळपणी) किंवा फवारणी करता येते.
तणनियंत्रणासाठी तणनाशकावरील निर्भरता कमी होते.
दोन झाडांतील अंतर एकसमान राहिल्याने पिकाची दाटी टाळता येते.
आयताकृती चौफुलीवर जोडओळ लागवड
आयताकृती चौफुलीवर जोडओळ लागवड
बीटी कपाशीची नावीन्यपूर्ण सुधारित आयताकृती पद्धतीने चौफुलीवर जोडओळीत लागवड करायची असल्यास जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, बीटी कपाशीचे वाण, व्यवस्थापन, ओलीत इ. बाबी प्रमाणे दोन ओळीतील अंतर चार फुटांऐवजी तीन फूट या प्रमाणे कमी करून घ्यावी. त्यासाठी तीन फुटी काकरीने शेताच्या दक्षिणोत्तर दिशेने उभे काकर पाडून घ्यावेत. शेताच्या पूर्व - पश्चिम दिशेने सोयाबीनच्या सव्वा ते दीड फुटी काकरीने आडवे काकर पाडून घ्यावेत. म्हणजेच शेतात ३ फूट × सव्वा ते दीड फूट याप्रमाणे आयताकृती चौफुल्या तयार होतील.
या प्रत्येक चौफुलीवर मजुरांच्या साहाय्याने दक्षिणोत्तर दिशेने लागवड करताना प्रत्येक चौफुलीवर केवळ एकच बीज लावावे. यामध्ये जोडओळ पद्धतीचा अवलंब करावयाचा असल्याने टोकण करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच शेतात ३ फूट × १.५ फूट - ६ फूट खुली जागा - ३ फूट × १.५ फूट अशा प्रकारे लागवड होईल. प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवल्याने कपाशीच्या दोन ओळी - ६ फूट खाली जागा - कपाशीच्या दोन ओळी अशी लागवड होईल. इथे आपण तिसरी ओळ खाली ठेवत असल्याने झाडांची संख्या आपसूकच ३३ टक्क्यांनी कमी होणार. आपल्याला झाडांची संख्या योग्य प्रमाणात ठेवायची असल्यास दोन ओळींतील अंतर कमी करून जोडओळ पद्धतीचा अवलंब करता येईल.
प्रचलित विषम लागवड पद्धत नावीन्यपूर्ण जोड ओळ पद्धत
लागवड अंतर झाडांची संख्या एकर लागवड अंतर झाडांची संख्या / एकर
४ फूट × १.५ फूट ७४०७ झाडे / एकर २.५ फूट × १.५ फूट - ५ फूट २.५ फूट × १.५ फूट ७९४० झाडे / एकर
५ फूट × १.५ फूट ५९२५ झाडे / एकर ३ फूट × १.५ फूट ६ फूट, ३ फूट × १.५ फूट ४९६३ झाडे / एकर
नावीन्यपूर्ण जोडओळ पद्धतीचे फायदे
बियाणे व त्याच्या खर्चात बचत.
मध्ये फिरण्यासाठी व्यवस्थित जागा असल्याने पिकाचे निरीक्षण, फवारणी व अन्य कामे करणे शक्य होते.
उभी आडवी आंतरमशागत, फवारणी व कोळपणीसारखी कामे करता येतात.
तणनियंत्रणासाठी तणनाशकावरील निर्भरता कमी होते.
खाली ठेवलेल्या मधल्या ओळीच्या जागी चौफुलीवर कमी कालावधीचे आंतरपीक घेता येते.
खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी शेवटच्या डवरणीचे वेळे डवऱ्याच्या अथवा वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून मधोमध दांड पाडून घ्यावा. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन शक्य होते. ओलिताची सोय असल्यास पावसात खंड पडल्यास दांडावून पाणी देता येते.
वेचणी सुलभरीत्या होऊन खर्चात बचत होते.
- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७
(सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.