Irrigation Project:  जल पुनर्भरण प्रकल्पाचा अभिनव प्रयोग

Maharashtra and Madhya Pradesh Agreement: तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेच्या सामंजस्य करारावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भोपाळ येथे नुकतीच स्वाक्षरी केली आहे. राज्यातील जळगाव, अकोला, अमरावती आणि बुलडाणा या खारपाण पट्टयातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या सुटण्यास यामुळे मदत होणार आहे.
Tapi River Project
Tapi River ProjectAgrowon
Published on
Updated on

Water Recharge Project Experiment: तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पाची किंमत ही २०२२-२३ च्या दरसूची नुसार १९ हजार २४४ कोटी आहे. मध्य प्रदेशातील खारीया गोटी येथे तापी नदीवर धरण उभारणे प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील २,३४,७०६ हेक्टर आणि मध्य प्रदेशातील १,२३,०८२ हेक्टर अशी दोन्ही राज्यांची मिळून ३,५७,७८८ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे. जळगाव, अकोला, अमरावती आणि बुलडाणा या खारपाण पट्ट्यातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या सुटण्यास यामुळे मदत होणार आहे.

या भागातील शेती बहरणार आहे. या भागातील शेतकरी आणि शेती आधारित उद्योगधंद्यांचे स्वरूप यामुळे बदलणार आहे. भारतातील पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये तापी ही नर्मदेनंतरची सगळ्यात लांब नदी. तिची लांबी ७२४ कि.मी. तापीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत, पूर्णा, गिरणा, पांझरा, अरुणावती, गोमाई, बुरे, अनेर, सिपना आणि वाघुर. या सगळ्यांचे मिळून तापी खोरे ६५,००० वर्ग कि.मी. एवढे प्रशस्त होते. तापी खोऱ्याचा ८० टक्के भाग महाराष्ट्रात तर थोडा मध्य प्रदेश आणि लहान त्रिभुज प्रदेश गुजरातमध्ये आहे. तापीचे २५ टक्के खोरे हे वनांनी व्यापलेले आहे. महाराष्ट्रातील १६.७ टक्के भूभाग हा तापी खोऱ्यात येतो. तापी, पूर्णा, मैतरणी या विदर्भ आणि खानदेशाला जोडणाऱ्या दुवा आहेत.

Tapi River Project
Water Conservation Project: जलसंधारण प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकरिता नवीन धोरण आणणार

महाराष्ट्राला अधिक लाभ

तापी खोऱ्यात एकूण २८ मोठ्या आणि मध्यम धरणांची शृंखला आहे. त्या व्यवस्थेने हे खोरे बंदिस्त झाले आहे. तापी आणि पूर्णेच्या संगमाजवळ भुसावळ, जळगाव येथे हतनूर धरण आहे. येथे लघू तापी पाणी उचल सिंचन प्रकल्पही आहे. तापी खोऱ्यात पावसाची सरासरी ८८० मिमी आहे. ७५ टक्के विश्‍वासार्हतेवर तापीचा वार्षिक येवा आहे, ६९७७ दशलक्ष घनमीटर! सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी पसरलेल्या ‘बझाडा’ झोनमध्ये तापी नदीच्या पुराचे पाणी प्रवाहित केल्यास मोठ्या प्रमाणावर पुनर्भरण होऊ शकेल अशी शिफारस केंद्रीय भूजल मंडळाने केली होती.

कारण दरवर्षी तापीच्या पुरामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला नुकसान सोसावे लागत होते. त्यानंतर या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. कोणतेही गाव अथवा अभयारण्य क्षेत्र बुडीत भागात जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. तापी नदीवरील या महाकाय पुनर्भरण प्रकल्पाने सिंचन आणि भूजलाची पाणीपातळी उंचावणार आहे. या महाकाय पुनर्भरण प्रकल्पामुळे तापी नदीच्या वाया जाणाऱ्या ३२ टीएमसी पाण्याचा लाभ अंदाजे साडेपाच ते सहा लाख हेक्टर जमिनीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होण्याचा अंदाज आहे. ज्यात महाराष्ट्राचा वाटा अधिक आहे.

हा प्रस्तावित जल पुनर्भरण प्रकल्प खारिया गोटी येथे उभारला जाणार आहे. तापी नदीचे वाया जाणारे पाणी खारिया गोटी येथून सोडले जाईल. नैसर्गिक उतारानुसार हे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येईल. हे पाणी चोपडा आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील अनेर नदीवरील धरणापर्यंत आणले जाईल. रावेर तालुक्यातील लोहारा येथील सुकी नदीवरील धरणातसुद्धा तापीचे पाणी आणण्याचे नियोजन आहे.

सुकी नदीच्या पात्रात लहान दगड गोटे, वाळू आणि मुरमाड भूस्तर आहे. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग हा नदी पात्रात जिरवला जातो आणि त्याचा लाभ परिसरातील अनेक ठिकाणाची भूजल पातळी उंचावण्यात होतो. सातपुडा पर्वतातून तापी नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, नाले यातही सोडले जाईल. सातपुडा पर्वत परिसरातील बझाड़ा क्षेत्र हे जल पुनर्भरणास अनुकूल असून भूगर्भात माती, वाळूचे थर अधिक असल्याने पुनर्भरण होऊन दूरवरच्या भागातली भूजल पातळी उंचावणे शक्य होईल.

Tapi River Project
Water Conservation Project : पाणी शेतातच मुरवणारा ‘जलतारा’

धारणी तालुक्यातील प्रस्तावित आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प हा याच योजनेचा भाग आहे. या प्रकल्पातून २३३ कि.मी.च्या कालव्यांमधून आणि ५० पेक्षा अधिक बंधाऱ्यांमधून जल पुनर्भरण केले जाणार आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्याच्या रामाखेडा, दहेन्द्रा, नेपानगरपासून बिरोदा येथून जळगावात प्रवेश करणाऱ्या कालव्याची एकूण लांबी १२३ कि.मी आणि धारणी तालुक्यातून निघणाऱ्या डाव्या कालव्याची लांबी ११० कि.मी आहे. कालव्याची एकूण लांबी २८७ कि.मी असण्याचे प्राथमिक अनुमान आहे.

गावे, जमीन आणि वनक्षेत्र बुडीत न जाता थेट किमान ७० ते ८० आणि कमाल ३०० टीएमसी पाणी भूगर्भात जिरवणे आणि जलधराचे पुनर्भरण करून भूजल पातळी सुधारणे हे या महाकाय प्रकल्पामुळे शक्य होणार आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. खानदेशमधील भूभाग हा गाळाच्या खोल सकस जमिनींनी समृद्ध आहे. केळी पिकासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. तथापि रावेर, यावल आणि चोपडा हे तालुके भूजल शोषणामुळे डार्क झोनमध्ये आहेत. त्यांचे पुनर्भरण याद्वारे शक्य होणार आहे.

चमत्कार पाणी गायब होण्याचा

तापी खोऱ्यात भूस्तर असा आहे, की पाणी लागलीच गायब होते आणि ते इतर ठिकाणी भूजल पातळी वाढवते. हा भौगोलिक आणि भूस्तर चमत्कार तत्कालीन मुघल शासकांनाही माहित होता आणि त्याचा उपयोग त्यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी केला होता. ती व्यवस्था कुंडी भंडारा या नावाने ओळखली जात होती. त्या वेळी जमिनीखालून कालवे खडकांची सच्छिद्रता आणि गुरुत्वाकर्षण या माध्यमातून शहरभर खेळवले गेले होते. याच्या खाणाखुणा अजूनही बुऱ्हाणपूर शहरात पाहायला मिळतात. ही जमिनी खालील व्यवस्था पूर्वी लिफ्टने खाली जाऊन पाहता येत होती.

मध्य प्रदेश सरकारने २००२ मध्ये हे ठिकाण पर्यटक स्थान म्हणून घोषित केले होते. जमिनीखाली लिफ्टने जाऊन पाणी गायब होणारा भूस्तर पाहण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी करण्यात आली होती. नैसर्गिक भौगोलिक व्यवस्था आपल्या पूर्वजांनी उपयोगात आणली होती आणि आता आधुनिक साधनांच्या साह्याने आपण ती अनुकूलता उपयोगात आणून वाहुन जाणारे पाणी पुनर्भरणाद्वारे सत्कारणी लावून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय अवर्षणग्रस्त आणि भूजल आकुंचित भागात करत आहोत. हा आशिया खंडातील नव्हे तर जगातील एक अभिनव आणि महाकाय जल पुनर्भरण प्रकल्प ठरणार आहे.


९५४५५२५३७५
(लेखक अभियंता, मुक्त पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com