Kolhapur Politics : महायुतीच्या सभेमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून केलेले वक्तव्य त्यांना भोवले आहे. फुलेवाडी येथे शनिवारी (ता.०९) रात्री झाली. या सभेत लाडकी बहीण योजनेवरून धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकाचे प्रमुख विशाल सर्जेराव परीट यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खासदार महाडिक यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७१ (२), (अ) प्रमाणे ‘मतदारांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केल्याचा’ गुन्हा नोंदविण्यात आला.
फुलेवाडी पाचवा बस स्टॉप येथे महायुतीच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आठच्या सुमारास झालेल्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणामध्ये लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केले. महाडिक म्हणाले की, "ज्या महिला आपल्या शासनाचे १ हजार ५०० रुपये घेतात आणि काँग्रेसच्या रॅलीमध्ये जातात, अशा महिलांचे फोटो काढून घ्या. त्यांची नावे लिहून घ्या आणि आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो." असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, खासदार महाडिक यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना दिला होता. यावरून रविवारी (ता. १०) रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
महिला काँग्रेसचे राजारामपुरी पोलिसांना निवेदन
खासदार महाडिक यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्येही महिलांचा अपमान केल्याचे निवेदन महिला काँग्रेसच्या वतीने काढण्यात आले. महिला सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यामध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीचे पैसे नसताना महायुतीच्या उमेदवाराला मतदान न केल्यास योजनेचे पैसे बंद होतील, अशी वक्तव्ये केल्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांबद्दल खासदार महाडिक, मानसिंग पाटील, राजू मोरे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचा लेखी तक्रार अर्ज महिला काँग्रेसच्या वतीने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना देण्यात आला. यावेळी अर्जदार अंजली जाधव, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, भारती पोवार, माधुरी जाधव उपस्थित होत्या.
विधानसभा निवडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेवरून आक्षेपार्ह वक्तव्य केले. याबाबत धनंजय महाडिक यांना कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी नोटीस बजावली. या वक्तव्याबाबत तत्काळ खुलासा करण्याचे आदेश या नोटिसीत दिले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.