
डॉ. दिनेश भोसले
Modern Technology in Dairy Industry: दूध उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी मध्यस्थांना दूर करण्यासाठी पन्नासच्या दशकात गुजरातमध्ये ‘अमूल’ची स्थापना करण्यात आली. डॉ. वर्गीस कुरियन यांनी या सहकारी दूध चळवळीला नवीन दिशा दिली. त्यांनी दुग्ध उत्पादनात जणू क्रांती घडवून आणली. त्यामुळे एकेकाळी दुधाची कमतरता असलेला भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश बनला. डॉ. कुरियन यांच्याकडे लहान आणि सीमांत शेतकरी, भूमिहीन मजुरांचे सक्षमीकरण करण्याची दृष्टी होती. त्यासाठी त्यांनी विचारपूर्वक आखणी केली.
त्या मार्गात जे कोणी आले, त्यांना डॉ. कुरियन यांनी धडा शिकवला. म्हशीच्या दुधाचे दूध भुकटीत रूपांतर करण्यासारखे अशक्यप्राय काम त्यांनी करून दाखवले. एकापाठोपाठ एक चमत्कार घडवणारी विलक्षण टीम त्यांनी बांधली. नोकरशाहीने आणलेल्या अडथळ्यांचा त्यांनी यशस्वी सामना केला. दूध चळवळ राजकीय भांडणात अडकू नये म्हणून त्यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे (एनडीडीबी) मुख्यालय दिल्लीऐवजी गुजरातमधील आणंद येथे ठेवले.
डॉ. कुरियन हे एक जाणकार मार्केटरही होते. त्यांनी ‘अमूल गर्ल मोहिमे’ला पाठिंबा दिला. ही भारतातील प्रदीर्घ काळ चाललेल्या मोहिमांपैकी एक आहे. ती वर्तमान घटना-घडामोडींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करते. आणि ती राजकीय विधाने करण्यापासून मागे हटत नाही. स्पर्धेबद्दल डॉ. कुरियन यांचे मत होते- जितके अधिक तितके चांगले. डॉ. कुरियन यांनी रचलेल्या भक्कम पायावर अमूलने दमदार वाटचाल केली.
त्यांची दूध खरेदी, प्रक्रिया आणि विपणनाची यंत्रणा संपूर्ण भारतात पसरली आहे. त्यांनी अमेरिकेसह जगाच्या मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. आज अमूल जागतिक ब्रॅण्ड बनला आहे. अमूलने महामारीच्या काळात ३३ नवीन उत्पादने लाँच केली. नवीन संधी शोधल्या. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त ८०० कोटी रुपये मिळू शकले. महाराष्ट्रासह देशभरातील सहकारी आणि खासगी कंपन्यांनी अमूलचे अनुकरण करून दूध व्यवसाय बळकट करण्याची आवश्यकता आहे.
चाऱ्याची समस्या
भारतात जनावरांच्या चाऱ्याची कमतरता आहे. भारतीय गवताळ प्रदेश आणि चारा संशोधन संस्थेच्या अहवालानुसार हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याच्या उपलब्धतेत अनुक्रमे ३२ टक्के आणि २३ टक्के तूट आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार चारा बियाणे उत्पादन, वनविरहित पडीक/गवताळ/अकृषक जमिनींवर चारा उत्पादन, वनजमिनीतून चारा उत्पादन यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत.
तसेच चारा-केंद्रित १०० शेतकरी उत्पादक संघटना तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय गवताळ प्रदेश आणि चारा संशोधन संस्थेने २५ राज्यांसाठी तेथील स्थानिक पीक पद्धती आणि पशुधन प्रजाती यांचा विचार करून चारा संसाधन विकास आराखडा तयार केला आहे. प्रत्येक दुधाळ जनावराच्या पोषण गरजेनुसार पशुखाद्य अचूकपणे तयार केल्यास शेतकरी पर्यावरणावरील प्रभाव कमी करून जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता सुधारू शकतात. हा दृष्टिकोन संसाधनांचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करतो.
दुग्धोत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी गाई आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्याचे महत्त्व महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना समजले आहे. त्यांनी प्रजनन, आहार, गोठा व्यवस्थापन आणि दूध काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. पशुखाद्य आणि चाऱ्याच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचा दूध उत्पादन खर्च वाढत आहे. धान्यापासून इथेनॉल बनविण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मक्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
सायलेज कसे बनवायचे हे शेतकरी चुकतमाकत (ट्रायल ॲण्ड एरर) शिकत आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाचा हिरवा आणि सुका चारा कसा तयार करता येईल याचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी पुढाकार घ्यावा. पशुखाद्य आणि चाऱ्याची गुणवत्ता तपासणीसाठी परवडणाऱ्या दरात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), पशुवैद्यकीय/कृषी विद्यापीठे आणि राज्य कृषी/पशुपालन विभाग जनावरांची उत्पादकता आणि शेतकऱ्यांची नफा वाढवण्यासाठी अधिक सक्रियपणे योगदान देऊ शकतात. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) फक्त सहकारी संस्थांनाच मदत करते. खासगी कंपन्यांना दूध विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी मदत करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.