
Milk Farming : रात्री नऊ वाजता बाजारपेठ बंद झाली, की आइस्क्रीम गाडे, गरम मलाई दूध विक्री करणारे आपल्या परिचयाचे आहेत. देशभरात पदोपदी राजस्थान मिठाई भंडार आणि राजस्थान फर्निचर सेंटरही दिसून येतात, ही बाब अजिबात नवीन नाही. काही वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीमुळे स्थलांतरित होण्याची मानसिकता राजस्थानच्या कुशल कारागिरांची होती आणि त्यातून काही पिढ्या इतर राज्यांत कार्यरत असल्या तरी आज मात्र राजस्थान देशात सर्वांत उच्चस्थानी दूध उत्पादनासाठी नावाजले जात आहे.
यातील कौशल्य हाच महत्त्वाचा मुद्दा रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही कौशल्य परंपरागत अंगी असतात, तर काही कौशल्ये आवर्जून शिकावी लागतात. चांगल्या कौशल्याचा उपयोग अर्थार्जनासाठी करता येतो, एवढाच याचा अर्थ.
सन २०२३-२४ चा वार्षिक अहवाल हाती येताच सर्वांचे लक्ष वेधले त्या राजस्थानच्या दूध उत्पादनाच्या आकडेवारीचे. राज्यातील दैनंदिन दूध उत्पादन ३३.३३ दशलक्ष मेट्रिक टन, देशात सर्वाधिक दूध उत्पादन म्हणजे एकूण देशातील उत्पादनाच्या १५.०५ टक्के, वार्षिक दूध व्यवसायाची उलाढाल १२७३.४ कोटी, वार्षिक दूध व्यवसाय वाढीचा दर १२.५ टक्के निर्धारित आणि हे सगळं अवलंबून असणारे यश सर्वस्वी देशातील १०.६० टक्के एवढ्या प्रमाणात असलेल्या पशुधनावर आधारित आहे.
प्रति माणसीशी राज्याची दूध उत्पादनक्षमता ८७० मिलि म्हणजे आपल्या देशाच्या सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट. महत्त्वाची बाब म्हणजे, शेती संबंधित २० टक्के ग्रामीण रोजगार आणि प्रत्येक कुटुंबाचे सरासरी ३० टक्के उत्पन्न केवळ दूध व्यवसायावर अवलंबून असलेली प्रगती.
राज्यातील पशुधनाची स्थिती
देशातील पशुधन प्रमाणाचा विचार करायचा झाला, तर राजस्थानात प्रामुख्याने ७.२३ टक्के थारपारकर, गीर, राठी, रेड सिंधी या गोवंशाचा वाटा आहे. तसेच मुऱ्हा म्हशींचा वाटा १२.४७ टक्के आहे. या सर्व पशुधनाचा योग्य सांभाळ असल्यामुळे प्रत्येकी दूध उत्पादन, सातत्य आणि पशुवैद्यक सेवा यातून दूध उत्पादनात मोठी झेप राज्याला घेता आली आहे.
राजस्थानमधील सगळा दूध व्यवसाय म्हणजे पशुपालन आणि पशू सांभाळ केवळ महिलांच्या हाती आहे. उत्कृष्ट पशू व्यवस्थापन हेच दूध उत्पादनाचे गमक असाच अभिप्राय राजस्थानमधील प्रत्येक अधिकाऱ्याकडून सांगण्यात येतो. संकलित दुधाबाबत प्रक्रिया, वितरण आणि परतावा यात असणारी बिनचूकता राज्याचा ग्रामीण विकास घडवणारी नांदी ठरली आहे. राज्यातील प्रत्येक पशुधन शुद्ध पैदास धोरणात सांभाळले जात असल्यामुळे वंशरहित पशुधनाची संख्या सीमित ठेवण्यास पशुपालकांना यश मिळाले आहे.
महत्त्वाची बाब अशी, की नैसर्गिक वातावरण प्रतिकूल असल्यामुळे संकरीकरणास पूर्ण वगळणी आणि देशी गोवंशावर अधिक भर आहे. यामुळे उपलब्ध पशुधन संख्येने मोठ्या प्रमाणात प्रत्येक कुटुंबात सांभाळण्यासाठी, उपलब्ध प्रतिकूल वातावरणात सहज व्यवस्थापनासाठी आणि प्रसंगी पशुधन आरोग्य संवर्धनासाठी असलेल्या पशुसंवर्धन यंत्रणेकडून मिळणाऱ्या संपर्कामुळे दूध व्यवसायात ग्रामीण कुटुंबांना सातत्याने यश मिळत आहे.
(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)
अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.