
News: बिहारमधील मतदार यादी संशोधन (एसआयआर) आणि निवडणुकीत कथित फसवणुकीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांचा गट ‘इंडिया’ आघाडी यावरून आक्रमक झाला असून, आज (ता.११) सोमवारी त्यांनी दिल्लीत संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी परवानगी नसल्याचं सांगत हा मोर्चा अडवला, ज्यामुळे विरोधी खासदार आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला.
या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं. यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीमधील अनेक खासदार उपस्थित होते. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, संजय राऊत, सागरिका घोष यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संसदमार्ग पोलीस ठाण्यात नेलं.
राहुल गांधी यांनी या मोर्चाचं नेतृत्व करताना स्पष्टपणे सांगितलं की, ही लढाई राजकीय नाही, तर देशाच्या संविधानाचं रक्षण आणि प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य जपण्याची आहे. “आम्हाला स्वच्छ आणि पारदर्शक मतदार यादी हवी आहे. सत्य देशासमोर आहे, आणि आम्ही हा लढा सुरू ठेवू,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. या मोर्चात इंडिया आघाडीमधील सर्व खासदार सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अडवला आणि काही खासदारांना ताब्यात घेतलं.
मोर्चाला अडवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवर चढून पोलिसांचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत म्हटलं, “आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत जाऊन आपली मागणी मांडू दिली जात नाही. आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे.” पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचं कारण देत खासदारांना पुढे जाण्यापासून रोखलं. यानंतर विरोधी खासदारांनी बॅरिकेड्सजवळच धरणे आंदोलन सुरू केलं. अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक तैनात केली.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन
महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचार, हनीट्रॅप, आणि इतर गैरप्रकारांचे गंभीर आरोप झाले आहेत. यामध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांचा घोटाळा आणि १ हजार ५०० कोटींच्या गैरव्यवहारांचा आरोप, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रमी खेळण्याचे प्रकरण, आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्सबारचा समावेश आहे.
या भ्रष्ट मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी या आंदोलनात लावून धरण्यात आली. “महाराष्ट्राला कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांचा कारभार नको आहे. असं म्हणत, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.मुंबईसह पुणे, रत्नागिरी, बीड, अमरावती, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगर यासह राज्यभरात शिवसेनेने आंदोलने केली.
निवडणूक आयोगाने इंडिया आघाडीच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ दिली आहे. मात्र, आयोगाने स्पष्ट केलं की, त्यांच्या कार्यालयात सर्व खासदारांना सामावून घेण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे फक्त ३० जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता ही भेट निश्चित झाली आहे. परंतु, विरोधी पक्षांचा आग्रह आहे की त्यांचे सर्व खासदार निवडणूक आयोगाला भेटावेत आणि मतदार यादीतील गडबडी आणि कथित फसवणुकीच्या मुद्द्यावर चर्चा करावी.
या बैठकीत राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावर सादरीकरण केलं होतं. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे सादर केले आणि भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यातील कथित संगनमताचा आरोप केला. त्यांनी बिहारमधील मतदाता यादीतील अनियमितता आणि निवडणुकीतील धांधलीवर प्रश्न उपस्थित केले. “ही लढाई एका व्यक्तीच्या मताच्या हक्काची आहे. आम्ही स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करू,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
बिहारमधील मतदार यादी संशोधन (एसआयआर) आणि निवडणुकीत कथित फसवणुकीच्या मुद्द्याने विरोधी पक्षांना एकत्र आणलं आहे. इंडिया ब्लॉकमधील नेत्यांनी यापूर्वीही या मुद्द्यावर एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.