डॉ. अरुण कुलकर्णी
फ्यूचर्स किमती सप्ताह २४ फेब्रुवारी ते १ मार्च
या महिन्यात NCDEX मध्ये मक्याचे जुलै २०२४ डिलीवरीसाठी व्यवहार सुरू झाले. सध्या NCDEX मध्ये मक्याचे मार्च, एप्रिल, मे, जून व जुलै डिलिव्हरीसाठी तर हळदीचे एप्रिल, जून व ऑगस्ट डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत. MCX मध्ये कापसाचे मार्च व मे डिलिव्हरीसाठी तर कपाशीचे एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत.
फेब्रुवारी महिन्यात हरभऱ्याची आवक वाढत होती. अजूनही ती वाढत आहे. तुरीची आवक सुद्धा या वर्षी २ फेब्रुवारी रोजी उच्चांकी होती; नंतर जरी ती कमी झाली तरी अजूनही ती लक्षणीय पातळीवर आहे. मागणी चांगली आहे, भावसुद्धा चांगला मिळत असल्याने साठा करण्याऐवजी विकण्याकडे अधिक कल आहे. कांद्याची व टोमॅटोची आवक फेब्रुवारीमध्ये स्थिर होती.
कापसाचे भाव फेब्रुवारीमध्ये ५५,६०० वरून रु. ६१,००० पर्यंत वाढले. हळदीमध्ये देखील तेजी आहे. सोयाबीनचे भाव रु. ४६०० ते रु. ४७०० च्या दरम्यान राहिले. कांद्याचे भाव रु. १,००० वरून रु. १,५०० पर्यंत गेले.
या सप्ताहात कापसाचे भाव ४.४ टक्क्यांनी तर हळदीचे ७ टक्क्यांनी वाढले. हळदीच्या एप्रिल फ्यूचर्सचे भाव स्पॉट भावाच्या तब्बल १४ टक्क्यांनी अधिक आहेत. कांद्याचे भावसुद्धा वाढले आहेत.
१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ५८,४६० वर आले होते. या सप्ताहात ते ४.४ टक्क्यांनी वाढून रु. ६१,०६० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव २.८ टक्क्यांनी वाढून रु. ६४,२८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ५.२ टक्क्यांनी वाढून रु. १,५१४ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स ४ टक्क्यांनी वाढून रु. १,५९२ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ०.२ टक्क्याने कमी होऊन रु. २,२५५ वर आले आहेत. फ्यूचर्स (एप्रिल) किमती रु. २,२७७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,३०५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १४,१७१ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या ७ टक्क्यांनी वाढून रु. १५,१६५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती १०.८ टक्क्यांनी वाढून रु. १६,९५४ वर आल्या आहेत. जून किमती रु. १७,३०८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १४.१ टक्क्यांनी जास्त आहेत. या तेजीचा अजूनही फायदा करून घेता येईल.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात २.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,८७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,९६३ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ जाहीर झाला आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ४,६८४ वर आली होती. या सप्ताहात ती ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,६५९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,७२२ वर आली होती. या सप्ताहात ती १ टक्क्यांनी घसरून रु. ९,६२० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीचा आवक हंगाम सुरू झाला आहे. २९ डिसेंबरपासून आवक वाढती आहे. २ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात देशातील आवक ६६,००० टन झाली. गेल्या वर्षी ३ सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या सप्ताहात ती ६४,००० टन होती व ती त्या वर्षाची उच्चांक आवक होती. २३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात आवक ५२,००० टन होती.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,४०० होती; या सप्ताहात ती रु. १,५३१ वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,५०० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.