Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Voting Update : सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदार संघात ५२.७८ टक्के मतदान झाले.
Election 2024
Election 2024Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अर्चना पाटील यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत होत असून, सुरवातीपासूनच या मतदारसंघात चुरस वाढल्याचे चित्र होते. मंगळवारी (ता.७) मतदानातही ही चुरस कायम राहिली.सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदार संघात ५२.७८ टक्के मतदान झाले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात धाराशिव, औसा, बार्शी, उमरगा, परंडा आणि तुळजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदार संघात राजेनिंबाळकर आणि पाटील यांच्यात पारंपारिक लढत होते आहे. बार्शीचे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर हेही वंचित आघाडीकडून मैदानात उतरले आहेत. पण खरी लढत राजेनिंबाळकर आणि पाटील यांच्यातच आहे. नात्याने दीर आणि भावजय असणाऱ्या या दोन्ही उमेदवारांत बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Election 2024
Loksabha Election 2024 : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

मंगळवार दिवसभर कडाक्याचे ऊन होते, पण या उन्हातही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून चढाओढ लागली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानात ५२.७८ टक्के मतदान झाले. त्यात तुळजापूर, औसा आणि धाराशिव या मतदारसंघात सर्वाधिक चुरस दिसून आली.

तुळजापूरमध्ये सर्वाधिक ५६.६ टक्के आणि औश्‍यात ५५.१९ टक्के तर धाराशिवमध्ये ५२.५७ टक्के मतदान झाले. त्याशिवाय बार्शीत ५१.५१ टक्के, उमरग्यात ५१.६९ टक्के तर परंड्यात ४९.३४ टक्के मतदान झाले. पण एकूण सर्व मतदारसंघातील आकडेवारी पाहता एक-दोन टक्क्यांच्या फरकाने सरासरी ५० टक्क्यांच्यावर मतदान झाल्याचे दिसून आले.

Election 2024
Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

लातूरसाठी उत्स्फूर्त मतदान

लातूर : लोकसभेच्या लातूर मतदार संघासाठी मंगळवारी पाच वाजेपर्यंत ५५. ३८ टक्के मतदान झाले. सुनेगाव सांगवी (ता. अहमदपूर) येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. हा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ५६.२२ टक्के, लातूर शहरमध्ये ५३.५० टक्के, लातूर ग्रामीणमध्ये ५७.३७ टक्के, लोह्यात ५४.९५ टक्के, निलंग्यात ५६.१० टक्के तर उदगीर विधानसभा मतदार संघात ५४.४० टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी बारा एक वाजेपर्यंत या रांगा राहिल्या. उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे दुपारनंतर मतदानावर परिणाम झाला. अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. दुपारी चार नंतर मात्र पुन्हा गर्दी वाढू लागली. दोन ठिकाणी मशिन बंद पडल्या. हा प्रकार वगळता मतदान शांततेत झाले.

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनाने अनेक उपक्रम राबवले होते. उष्णतेची लाट लक्षात घेऊन मतदानाच्या दिवशी देखील अनेक मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com