
डॉ. दीपक डामसे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. जयपाल चौरे
Indian Agriculture: पौष्टिक तेल, पिकांचे वैविध्य आणि मधमाश्यांचे संवर्धनासाठी खुरासणी (कारळा) हे महत्त्वाचे पीक आहे. आपत्कालीन परिस्थितीत तग धरणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हवामान बदलाच्या काळात आपत्कालीन परिस्थितीतील हे पीक महत्त्वाचे आहे. कारण; उशिरा खरीप हंगामात हे पीक घेता येते.
या पिकाला कमी किंवा अधिक पाण्याचा परिणाम जाणवत नाही. निकृष्ट, कमी कसदार, डोंगर उतारावर, भरड जमिनीत हे पीक घेता येते. या पिकावर कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. यास रानटी जनावरे खात नाहीत, तसेच डोंगर उतारावर ‘मृदासंवर्धक’ म्हणून हे पीक उपयुक्त आहे. ग्रामीण भागात श्रावण महिन्यात कोवळे शेंडे आणि पानांची भाजी करतात. तेलाचा वापर जखम आणि त्वचेच्या विकारांवर केला जातो.
सुधारित लागवड तंत्रज्ञान
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेर पेरणी करावी. आपत्कालीन पीक परिस्थितीत उशिरा खरीप हंगामात देखील याची लागवड करून चांगले उत्पादन मिळते.
उथळ ते मध्यम खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच डोंगर उताराच्या पोयटायुक्त जमीन लागवडीस पोषक असते. बी बारीक असल्याने लागवडीस भुसभुशीत जमिनीची आवश्यकता असते. खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी देऊन जमीन सपाट करावी; त्यानंतर पेरणी करावी. डोंगर उतारावर जमिनीस वाफसा आल्यानंतर नांगरट करून एक कुळवाची पाळी देऊन पेरणी करावी.
हेक्टरी ४ ते ५ किलो बियाणे पुरेसे होते. काही शेतकरी बी फोकून पेरणी करतात. मात्र अधिक उत्पादनासाठी ३० × १० सें.मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे वाळू, बारीक मऊ शेणखत किंवा राखेमध्ये (१:२०) मिसळून २ ते ३ सेंमी खोलीवर पेरावे. पेरणी झाल्यानंतर ते त्वरित मातीने झाकून घ्यावे. पेरणी करताना दोन ओळी आणि दोन रोपांमध्ये अंतर ठेवल्यास रोपांची चांगली वाढ होते.
योग्य अंतरावर पेरणी, निंदणी आणि खते दिल्याने रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते. अधिक उत्पादनासाठी ३० सें.मी. बाय १० सें.मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. त्यांनतर प्रतिकिलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर,२५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी.
पूर्व मशागतीच्या वेळेस प्रति हेक्टरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत हेक्टरी मिसळावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद (४४ किलो युरिया, १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पेरणीनंतर ३० दिवसांनी २० किलो नत्र (४४ किलो) द्यावे. गंधक २० ते २५ किलो द्यावे.
दाट पेरणी असल्यास पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी विरळणी करावी. काही वेळा या पिकामध्ये अमरवेल या परपोषी वनस्पतीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो, या तणाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी साधारणपणे २.१ मि.मी. चाळणीच्या साह्याने बियाणे चाळून घेतल्यास तणाचे बियाणे वेगळे होते. पहिली खुरपणी पेरणीनंतर ३० दिवसांनी आणि दुसरी ६० ते ६५ दिवसांनी करावी.
अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर ५० दिवसांनी फुले कारळा या वाणाचा शेंडा खुडण्याची शिफारस आहे.
या पिकात परपरागीभवनाने बीज धारणा होते. या पिकात स्वविसंगतता स्वरूप ही समस्या आढळून येते. एकरी एक मधमाशी पेटी ठेवल्याने उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ दिसून येते.
सुधारित जाती
फुले कारळा (आय. जी. पी. एन.२००४-१) : खोडाचा रंग अति जांभळा, फुलाचा रंग नारंगी, पानाचा रंग अति हिरवा आणि तेलाचे प्रमाण ३९ ते ४० टक्के.
फुले वैतरणा (आय. जी. पी. एन. ८००४): खोडाचा रंग जांभळा, फुलाचा रंग नारंगी, पानाचा रंग हिरवा आणि तेलाचे प्रमाण ३९ ते ४० टक्के.
- डॉ. दीपक डामसे, ९९२३२४२५७८
(खुरासणी पैदासकार, अखिल भारतीय समन्वित खुरासणी संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.