Balasaheb Thorat : मी पहिल्या दिवसापासूनचा साक्षीदार

Article by Suryakant Netake : ॲग्रोवन २००५ मध्ये सुरू झाले, त्या वेळी मी राज्याचा कृषिमंत्री होतो. हे दैनिक सुरू करण्याआधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आमच्यासारख्यांची मते जाणून घेतली होती.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratAgrowon
Published on
Updated on

Balasaheb Thorat : ॲग्रोवन २००५ मध्ये सुरू झाले, त्या वेळी मी राज्याचा कृषिमंत्री होतो. हे दैनिक सुरू करण्याआधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आमच्यासारख्यांची मते जाणून घेतली होती. या माध्यमातून शेती, शेतकरी, ग्रामविकास, मजुरांचे प्रश्‍न मांडताना प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीही व्यासपीठ उभे राहील असे बहुतेकांचे मत आल्यांनंतर हे दैनिक सुरू झाले. तेव्हापासून मी या दैनिकाशी जोडला गेलेलो आहे.

‘ॲग्रोवन’चा प्रकाशनाचा समारंभ मला आजही आठवतो. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर आणि माझ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी केलेले भाषण दिशादर्शक होते. हे दैनिक सुरू झाले आणि अल्पावधीतच त्याचा वेगळा ठसा उमटला. कृषिमंत्री म्हणून माझा तर या दैनिकाशी रोजचा संबंध येऊ लागला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्या वेळी मला नेहमी म्हणायचे, ‘‘बाळासाहेब तुमच्या खात्यासाठी ‘ॲग्रोवन’च्या रूपाने एक स्वतंत्र दैनिक आहे. इतर कोणत्याही मंत्र्याच्या वाट्याला हे भाग्य नाही.’’ मला त्याचा नेहमी अभिमान वाटायचा.

Balasaheb Thorat
Sugarcane Production : खोडवा ऊस उत्पादनात अनिकेत बावकर राज्यात पहिले

राज्यात अथवा देशात कुठेही असो, हे दैनिक वाचल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक समस्या, शेती, सिंचन आणि ग्रामविकासाबाबतचे प्रश्‍न, लोकांच्या भावना, शेतीमधील बदल यांसारख्या बाबी कळण्यासाठी आम्हाला हे दैनिक वाचावेच लागते. सरकारी धोरणे, विविध योजना, कृषी विद्यापीठांकडील तंत्रज्ञान, पोल्ट्री, दूध व्यवसायातील बदल समजून घ्यायचे असतील तर या दैनिकाला पर्याय नाही.

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी अनेक वर्षांपासून सरकारी पातळीवर काम सुरू आहे. अनेक शेतकरी स्वतः अभ्यास आणि प्रयोग करून नवी वाट धुंडाळतात. त्यांच्या प्रयोगांच्या यशकथा इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देतात. या दैनिकाच्या माध्यमातून अशा यशकथांना हक्काची जागा मिळाली. त्यातून तंत्रज्ञान प्रसाराचा एक प्रवाहच निर्माण झाला. सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानातून होणारी वृक्षलागवड मोहीम, माझ्या तालुक्यात राबवली जाणारी जयहिंद चळवळ, लोकांच्या सेवेसाठी मोफतपणे काम करणारे आमचा यशोधन उपक्रम यांची माहिती राज्यातील आणि देशातील वाचकांपर्यंत पोहोचविण्यात या दैनिकाचा वाटा मोठा आहे.

Balasaheb Thorat
Silk Production : दर्जेदार रेशीम कोष निर्मितीवर भर

आजच्या घडीला शेतीकडे सार्वत्रिक दुर्लक्ष होत असताना शेती व्यवसायात असलेल्या रोजगाराच्या संधी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथा जाणून काहीतरी नवे करण्याची ऊर्जा मिळते. सध्या आर्थिक मंदीची परिस्थिती आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. ज्यांनी ज्यांनी या दैनिकातून प्रेरणा घेतली त्यांनी आज यश मिळवले आहे.

कृषिमंत्री असताना विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात शेती आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती, त्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी या दैनिकाची मोठी मदत व्हायची. आजही अनेक मंत्री, नेत्यांसाठी हे दैनिक विश्‍वसनीय माहितीचा स्रोत आहे. खरं तर कृषी विषयावर दैनिक चालवणे एवढे सोपे नाही; मात्र ‘ॲग्रोवन’ने ते यशस्वी करुन दाखवले.

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

बाळासाहेब थोरात, माजी कृषी व महसूलमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com