शेतकरी नियोजन
रेशीमशेती
शेतकरी नाव : सिद्धेश्वर ज्ञानेश्वर भानुसे
गाव : बोरगाव खुर्द, ता. घनसावंगी, जि. जालना
एकूण शेती : १० एकर
तुती लागवड : साडेतीन एकर
जालना जिल्ह्यातील बोरगाव खुर्द (ता. घनसावंगी) येथील भानुसे दांम्पत्य रेशीम उद्योग शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने करतात. सिद्धेश्वर ज्ञानेश्वर भानुसे व त्यांची पत्नी सौ. संगीता या दाम्पत्याने रेशीम कोष उत्पादनात सातत्य राखले आहे.
या व्यवसायात सिद्धेश्वर यांचे बंधू नागेश्वर व त्यांच्या पत्नी सौ. कावेरी भानुसे हे दोघेही खांद्याला खांदा लावून मदत करतात. जोडीला मोसंबी फळपिकासह खरिपातील कपाशी, रब्बीतील ज्वारी आदी पिकांची लागवड त्यांनी केली आहे.
अशी आहे पीक पद्धती
श्री. भानुसे यांच्या कुटुंबात एकूण नऊ सदस्य असून त्यापैकी चार सदस्य शेतीत राबतात. त्यांची शेतीच्या एकूणच व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्याकडे १० एकर शेती आहे.
त्यापैकी अडीच एकरांत मोसंबी, साडेतीन एकरांत तुती लागवड, दोन एकरांत ज्वारी आणि दोन एकरांत कपाशी लागवड आहे. येत्या काळात आणखी सव्वा एकर प्रतिक्षेत्र वाढवण्याचे त्यांचे नियोजन आहे.
पाणी व्यवस्थापन
सिंचनासाठी शेतामध्ये तीन विहीरी आहेत. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन केले जाते. याशिवाय पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाटपाणी पद्धतीने देखील पिकाला पाणी देण्याचे नियोजन ते करतात.
उपलब्ध पाण्याचा विचार करून सिंचन पद्धतीत बदल केला जातो. मात्र अपवाद वगळता बहुतांश प्रसंगी ठिबक सिंचनाद्वारेच सिंचन करण्याला त्यांचे प्राधान्य असते.
रेशीम शेतीचा श्रीगणेशा
पारंपरिक पिकामध्ये बदल करत जून २०१७ मध्ये भानुसे दाम्पत्याने तुती लागवड करत रेशीम उद्योगाला सुरुवात केली. सुरवातीला दीड एकर क्षेत्रावर तुती लागवड केली. त्यात २०१८ मध्ये दोन एकर क्षेत्र वाढवीत एकूण तुती लागवड साडेतीन एकरांवर नेली. तुतीची लागवड वेगवेगळ्या अंतरावर करण्यात आली आहे. पाच बाय तीन व दोन फूट आणि साडेचार बाय दोन फूट अंतरावर तुतीची लागवड त्यांनी केली आहे.
रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी सुरवातीला दीड एकर तुती लागवड असताना २२ बाय ५० फुटांचे शेड उभारले होते. तुती क्षेत्रात वाढ केल्यानंतर शेडच्या आकारात वाढ करीत २२ बाय ७५ फुटांचे शेड उभारले.
संगोपनातील बाबी
शेडमधील स्वच्छता, बॅच सुरु झाल्यावर कीटकांचे व्यवस्थापन, कोष वेचणी, तुती बागेतील कामकाज इत्यादी कामांमध्ये भानुसे कुटुंबातील संगीता आणि कावेरी या महत्त्वाची भूमिका निभावतात.
साधारणत: दुसरा मोल्ट बसलेली चॉकी (बाल्य कीटक) चॉकी सेंटरमधून आणली जाते. शेडमध्ये चॉकी आणल्यानंतर प्रत्येक मोल्ट महत्त्वाचा असतो.
शेडमध्ये साधारण साडेतीन दिवसांनी पहिला मोल्ट बसतो. त्यापूर्वी अळ्यांना तुतीची कोवळी पाने खाण्यास दिली जातात.
साधारणत: ९५ टक्के अळ्यांनी मोल्ट पास केल्यानंतर मोल्ट पास झाल्याचे समजले जाते.
चौथा मोल्ट बसल्यानंतर अळ्यांना आधीच्या तुलनेत अधिक तुती पाने खाद्य म्हणून दिली जातात. या मोल्टचा कालावधी २४ ते ४८ तासांचा असतो.
त्यानंतर पाचवी व शेवटची अवस्था सुरु होते. या अवस्थेत दिवसाला दोन वेळा असा ६ ते ७ दिवस म्हणजे १२ ते १३ वेळा फीडींग केले जाते. या काळात कोष तयार होण्यास सुरुवात होते.
अळ्यांनी कोष उत्पादनास सुरुवात केल्यानंतर चंद्रिका अंथरल्या जातात. त्यानंतर ५ ते ६ दिवसांनी कोष काढणी सुरू होते.
प्रत्येक मोल्ट बसल्यानंतर साधारणत: १० किलो चुना अळ्यांच्या रॅकवर मारला जातो.
बॅच आणि कोष उत्पादन
ऑक्टोबर २०१७ पासून रेशीम कीटकांसाठी दर्जेदार पाला उपलब्ध होऊ लागला. त्यानंतर प्रत्यक्ष रेशीम कोष उत्पादन घेणे सुरू केले.
एक बॅच साधारण अडीचशे ते तीनशे अंडीपुंजाची असते. वर्षभरात साधारण ५ ते ८ बॅच होतात. दोन बॅचमध्ये साधारण १५ ते २० दिवसांचे अंतर राखले जाते.
दरवर्षी १५ मे ते ३० जूनपर्यंत कोष उत्पादन बंद असते. यंदा दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील बॅच घेणे अवघड असल्याचे श्री. भानुसे म्हणाले.
साधारण १०० अंडीपुंजांपासून ९० ते ११० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन मिळते. उत्पादित कोषाची जालन्यातील रेशीम बाजारपेठेत विक्री केली जाते.
आगामी नियोजन
सध्या संगोपनगृहातील रेशीम कीटकांच्या फिडींगवर दिला जात आहे. ही बॅच डिसेंबरच्या अखेरीस सुरु केली होती. सुरवातीच्या काळात बाल्य कीटकांना कोवळा तुतीचा पाला देण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर हळूहळू जास्त पाला खाऊ घालण्यास सुरुवात केली.
सध्या शेडवर चंद्रिका अंथरण्याचे कामकाज सुरु आहे. साधारण २६ जानेवारीपर्यंत कोष काढणीस तयार होतील. कोष काढणी दोन दिवस चालेल.
यावर्षी सिंचनाच्या पाण्याची कमतरता असल्याने पुढील बॅच घेण्यास काही काळ विलंब होईल.
- सिद्धेश्वर भानुसे ७७२१९७७८५१ (शब्दांकन : संतोष मुंढे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.