Agricultural Journalism: हजारो शेतकऱ्यांचं जगणं बदलताना पाहिलं

Journalist Experience in Agrowon: ‘ॲग्रोवन’मध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि त्यांच्या संघर्षाची दखल घेणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि शेतकऱ्यांशी जोडलेली माणसे या सर्वांचा अनुभव घेतल्यामुळे शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा मिळाली.
Vikas Jadhav
Vikas JadhavAgrowon
Published on
Updated on

Journalist Vikas Jadhav Journey: महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करताना सेवा योजना कार्यालयातून मुलाखतीचे पत्र आले. या मुलाखती पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात झाल्या. मात्र हा पैसे उकळण्याचा प्रकार असल्याचे यथावकाश स्पष्ट झाले. या फसवणुकी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यानच्या काळात ‘दैनिक सकाळ’ सातारा येथे काशीळ बातमीदार म्हणून जाहिरात आली. अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखत दिली. काशीळ बातमीदार म्हणून सकाळमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

बातमीदार म्हणून संबंधित फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला. अन्य एका खासगी कंपनीत काम करण्याबरोबर ‘सकाळ’मध्ये पार्टटाइम बातमीदारी सुरू होती. दरम्यानच्या काळात पत्रकारिता पदवीही संपादन केली. २०१२ मध्ये ‘दैनिक ॲग्रोवन’मध्ये सातारा जिल्हा बातमीदार म्हणून जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर या पदासाठी अर्ज केला. ‘सकाळ’मधील अनुभवावर संपादक आदिनाथ चव्हाण सरांनी काम करण्याची संधी दिली.

‘ॲग्रोवन’मध्ये काम सुरू झाल्यावर बातम्या तसेच यशोगाथेच्या निमित्ताने जिल्हाभर फिरणे सुरू झाले. दुचाकीवरून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देत बातम्या, यशोगाथा देत होतो. काही ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला नव्हता, अशा ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद करत होतो. शेतकऱ्यांना सातारहून आलोय याचे कौतुक वाटायचे. बातमी, यशकथा प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा फोन आल्यावर कामाचे सार्थक झाल्याचे वाटे.

Vikas Jadhav
Agriculture Journalism: कृषी क्षेत्राचा उमगला व्यापक अर्थ

‘साहेब ‘अॅग्रोवन’मध्ये बातमी येऊ द्या’

जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू होते. जागोजागी चारा छावण्या, चारा डेपो सुरू केले जात होते. अनेकदा गारपिटीने पिकांचे होणारे नुकसान, दुष्काळ, पीकविमा, अनुदान याविषयीचे ‘ॲग्रोवन’मध्ये सविस्तर लेखन केले. यातून अनेकवेळा शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना माहितीसाठी फोन केला की हट्ट एकच असायचा, साहेब आमचे नुकसान, समस्यांची बातमी ‘ॲग्रोवनला येऊ द्या. सरकार बघा लगीच दखल घेतया!’

शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार झाले

सातारा जिल्ह्यात टोकाची परिस्थिती आहे. माणमध्ये सर्वाधिक दुष्काळ, तर महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस, अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांची धडपड कायम असते. जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्याने जिल्ह्यात कुठे पाऊस, गारपीट, हिमकण, नुकसान याबाबतची माहिती शेतकऱ्यांकडून इत्थंभूत मिळते. यशोगाथा प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांकडून इतर प्रगतिशील शेतकऱ्यांची नावे सुचविली जातात.

‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नेटवर्क उभे झाले. खासदार शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना माण दुष्काळाच्या दौऱ्याची बातमी संकलन करण्यासाठी गेलो होतो. अचानक दुचाकीची चेन तुटली. गाडी सोडून दुसऱ्या गाडीवर जाऊन बातमी कव्हर केली. येथील शेतकऱ्यांना संपर्क केल्यावर त्यांनी लगेच मिस्त्री आणून गाडी सातारपर्यंत जाईल अशी व्यवस्था केली. पोहचल्यावर आठवणीने फोन करण्याची सूचना केली. अशा अनेक प्रसंगात ‘ॲग्रोवन’मुळे जोडलेले शेतकरी उपयोगी ठरले.

Vikas Jadhav
Agriculture Journalism: समाधान देणारा कृषी पत्रकारितेतला प्रवास...

स्वंतत्र ओळख निर्माण झाली

‘ॲग्रोवन’मधील काम करण्याचा वेगळाच आनंद मिळत गेला. ५० टक्क्यांहून अधिक शेती असलेल्या वर्गाशी संपर्क सातत्याने येत होता. २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यातूनही एका राष्ट्रीयीकृत बँकेने शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची नोटीस काढली. या संदर्भात शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केल्यावर ही बातमी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीचे वाचन त्यावेळचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात वाचून दाखवली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बँकेला खुलासा मागविला. संबंधित बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेतकऱ्यांना बोलवून दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळी त्या शेतकऱ्याने संपर्क करून ‘अॅग्रोवन’मुळे आमचं संकट टळलं असल्याची भावना व्यक्त केली.

तसेच ‘ॲग्रोवन’चा दिवाळी अंक शेतकरी व तसेच वाचकांसाठी पर्वणी असतो. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये कितपत वाचला जात असेल, याबाबत शंका होती. २०१३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या प्रेससाठी गेलो असता त्यांनी मला ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाची विचारणा केली. मी कार्यालयात जाऊन अंक आणून त्यांना दिला. त्या वेळी त्यांनी सांगितले, की मी ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. गावी शेती सुरू असून ॲग्रोवनमधील माहितीचा वापर करतो.

शेतकऱ्यांना मिळाला सन्मान

जिल्ह्यातील शेकडो यशकथेचे लिखाण करून त्या ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्या. या शेतकऱ्यांना राज्यभरातून इतर शेतकऱ्यांनी संपर्क करून तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या शेतकऱ्यांना कामाची दखल घेत शासकीय तसेच अशासकीय पुरस्काराने अनेक शेतकऱ्यांचा सन्मान झाला.

९०११०८७४१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com