
Mumbai News: ‘‘निवडणुकीच्या आधी मराठी-मराठी करायचे, निवडून आल्यानंतर मराठी माणसाला दुर्लक्षित करायचे, यांना फक्त स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा इतकेच माहिती आहे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गुरुवारी विधानसभेत टीकास्त्र सोडले. २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली.
दरम्यान, उत्तरावर ‘राइट टू रिप्लाय’ नियमांतर्गत बोलू न दिल्याने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत जोरदार गोंधळ झाला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे हातवारे करत आक्रमकपणे बोलू देण्याची मागणी केली. मात्र ज्यांनी प्रस्ताव मांडला त्यांनीच या नियमांतर्गत बोलावे, अशी सूचना त्यांना करण्यात आली. मात्र आदित्य ठाकरे हे सभागृहात उपस्थित नसल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी श्री. जाधव बोलण्यास मज्जाव केला.
मात्र विरोधक आक्रमक झाले, त्यामुळे सत्ताधारीही आक्रमक झाले. त्यांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळादरम्यान आदित्य ठाकरे सभागृहात धावत आले. त्यांनी आपल्या आसनाजवळ येत शिंदे गटाला आव्हान दिले. ठाकरे आणि जाधव यांनी आक्रमकपणे शिंदे गटाला आव्हान देणे सुरू केल्यावर शिंदे गटाचे आमदार वेलमध्ये आले.
त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी नियमानुसार ज्यांनी प्रस्ताव मांडला त्यांनीच उत्तरावरील भाषण करावे, असे सूचित केले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली. ते म्हणाले, की अध्यक्षांकडे पाहून हातवारे करणे हे अध्यक्षांचा अवमान आहे. ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांकडे पाहून हातवारे केले. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली.
आम्हाला बोलायचे होते : भास्कर जाधव
या प्रसंगानंतर विधान भवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, की ‘राइट टू रिप्लाय’अंतर्गत मला बोलता आले नसते हे मान्य. पण आदित्य ठाकरे एका अधिकृत बैठकीसाठी मला सांगून गेले होते. मी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पूर्ण भाषण शांतपणे ऐकले. मला काही प्रश्न विचारायचे होते. पण अध्यक्षांनी बोलू दिले नाही.
‘दिनो मोरियो बोलला, तर कुणाचा मोरया होईल’
‘‘धारावीत आज लोक खितपत पडले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही पुनर्विकास प्रकल्प आणत आहोत, तर त्याला विरोध होतो आहे. आम्ही टिकणारे काँक्रीटचे रस्ते करतो आहे, तर त्यात भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. आमच्यावर आरोप जरूर करा, रस्त्यांच्या कामांचे ऑडिट देखील करा. पण कोविड काळात खिचडी घोटाळा कोणी केला?
डेडबॉडी बॅग चोर कोण? दर वर्षी रस्ते दुरुस्तीचे टेंडर देणारे कोण? टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा व्हेंडर कोण? ते आधी बघा. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी दिनो मोरिया दिसला, मराठी माणूस नाही दिसला. जर त्या दिनोने तोंड उघडले तर कोणाचा मोरया होईल ते बघा,’’ अशा शब्दांत श्री. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.