Mango : नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे कसे ओळखायचे?

Ripe mango : आंबा खरेदी करतेवेळी नैसर्गिक किंवा शास्त्रीय रीतीने पिकविलेल्या आंब्यालाच प्राधान्य देण्याची गरज आहे. हे आंबे कसे ओळखायचे, याची माहिती घेऊ.
Ripe Mango
Ripe MangoAgrowon

डॉ. भगवानराव कापसे

How to Identify Ripe Mangoes : सध्या आंब्याचा हंगाम भरात आला असून,आंबा उत्पादक काढणी, पिकवण आणि विक्रीचे नियोजन करत आहेत. आंबा काढतेवेळी झाडावर योग्य तितक्या प्रमाणात पक्व झालेले आंबे काढले पाहिजेत. आंब्यामध्ये विविध शर्करेसोबतच अ आणि क जीवनसत्त्व मुबलक असते. आंबा आहारात घेतल्यास त्यातील अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते, तर क जीवनसत्त्वामुळे दातांचे आरोग्य आणि आपली पचनशक्ती चांगली राहते.

मात्र उत्तम दर मिळण्याच्या आशेने आंबा काढणीची घाई करणे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक रसायनाच्या साह्याने पिकविण्याचे प्रकार काही शेतकरी व व्यापारी मंडळी करत असतात. या रसायनाच्या पुड्या बांधून आंब्यामध्ये ठेवल्या जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या ॲसिटिलिन वायूमुळे अगदी ३५ ते ४० तासांत हिरव्या आंब्याला फक्त वरून पिवळा रंग येतो. मात्र तो आतून पक्व असतोच असे नाही! फळे वरून आकर्षक दिसत असली तरी आतून कच्ची, आंबट किंवा बेचव असतात. त्यात ही रसायने आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, कर्करोगकारक आहेत.

Ripe Mango
Mango Season : सिंधुदुर्गच्या काही भागांत आंबा हंगामाला पूर्णविराम

योग्य पक्वतेचे आंबे कसे ओळखायचे?

विशेषतः देठाजवळ थोडासा खड्डा पडलेला असून, बाजूचे खांदे वर आलेली असतात.

फळाची चोच सर्वसाधारणतः बोथट असते.

आंब्याला भरीव आकार आलेला दिसतो.

त्यावरील लेंटीसेलचे स्पॉटसुद्धा ठळक असतात.

आंबा कसा पिकतो?

आंबा फळाची पक्वता होताना त्यातून नैसर्गिकरीत्या इथिलीन वायू कमी प्रमाणात बाहेर पडत असतो. हा वायू हलका असल्याने वातावरणामध्ये उडून जातो. त्याला अडथळा करण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये उसाचे पाचट, भाताचे तणस, वाळलेले गवत अशा बाबींचा आंबा पिकविण्यासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे एका फळातून उत्सर्जित झालेला वायू दुसऱ्या फळास मिळून आंबा पिकतो. मात्र या पद्धतीमध्ये या सेंद्रिय घटकातील धूळ बसणे, अति हाताळणी यातून फळांना इजा होते. हे टाळण्यासाठी फळाखाली रद्दीपेपरचे दोन ते तीन थर द्यावेत.

Ripe Mango
Kesar Mango : केसर आंब्याला प्लॅटफॉर्म मिळवून देणार

त्यावर तीन ते चार थरांत फळे रचून बाजूने आणि वरूनसुद्धा पेपरने झाकून घ्यावे. अशा प्रकारे एक मीटर रुंदी व तीन ते चार मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. मध्ये थोडी चालण्यायोग्य जागा ठेवून दुसरे वाफे करावेत. अशी फळे दोन-तीन दिवस लवकर पिकून त्यांना आकर्षक रंग येतो. मागील लेखामध्ये आंबे पिकविण्याच्या अन्य काही पद्धती आणि अनुकूल वातावरण या विषयी सविस्तरपणे माहिती घेतली होती. या लेखामध्ये बाजारात उपलब्ध आंब्यापैकी नैसर्गिकपणे पिकविलेले आणि कृत्रिमरीत्या पिकविलेले आंबे कसे ओळखायचे, याची माहिती घेऊ.

अ) कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा

कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा अतिशय चकचकीत, पिवळा व आकर्षक दिसतो. (अगदी काचेचा पिवळा आंबा तयार करून ठेवल्यासारखा.)

अशा आंब्याचा गर आत फारसा पिकलेला नसल्यामुळे वरून बोटाने किचिंद दाबल्यास थोडासा कडकपणा जाणवतो.

आंबा हातात घेऊन नाकाजवळ धरल्यास आंब्याचा नैसर्गिक सुगंध न येता थोडासा उग्र, नकोसा वाटणारा वास येतो.

मुळात चांगला न पिकल्यामुळे या आंब्याची चवसुद्धा आंबट लागते.

असे आंबे घरी आणल्यानंतर दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. त्याचे साल खराब होऊन काळे डाग पडायला लागतात.

असे आंबे चवीला आंबट असून, पचनासाठी अवघड ठरतात. त्यात भेसळयुक्त रसायनांचे अंश राहिलेले असल्यास त्यातून आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

ब) नैसर्गिकरीत्या पिकविलेला आंबा

योग्य पक्वतेला झाडावरून झालेली काढणी आणि नैसर्गिकरीत्या हळूहळू पक्व झालेल्या या आंब्यावर सूक्ष्म सुरकुत्या असतात. त्याचा रंग हिरवट पिवळा दिसतो.

असा आंबा आतून बाहेरून चांगला पिकल्यामुळे वरून बोटाने दाबल्यास नरमपणा जाणवतो.

योग्य पिकल्यामुळे आंब्यातील शर्करा आणि आम्लाचे प्रमाण योग्य राहते. फळाचा अतिशय चांगला सुगंध येऊन घरात दरवळत राहतो.

या आंब्याची कातडी लवकर खराब होत नाही की त्यावर काळे चट्टे पडत नाहीत. नैसर्गिक टिकाऊपणा दिसून येतो.

आंब्याची चव अप्रतिम असते. मात्र असा आंबा खाण्याआधी दीड, दोन तास फ्रिजमध्ये ठेवल्यास सर्वसाधारण थंड होईल. नंतर असा आंबा कापून खाण्यास अप्रतिम लागतो.

नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंबा आहारात घेतल्यास आरोग्यासाठी उपकारक ठरतो.

डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९

(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com