Sustainable Agriculture: शेतीची शाश्‍वती कशी साधायची?

Indian Agriculture: शाश्‍वत शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे शाश्‍वत शेती का? त्याचे सेंद्रिय प्रमाणीकरण होते का? ही शेती महागडी तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्‍न आपल्याला नेहमी पडत असतात. शाश्‍वत शेतीला इंग्रजी भाषेत ‘सस्टेनेबल ॲग्रिकल्चर’ म्हणतात.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Future of Farming: शाश्‍वत शेतीच्या मूल्यात सर्वांत पहिलं मूल्य आहे ते पर्यावरण समतोल. यामध्ये माती, पाणी आणि जैवविविधता यांचं संवर्धन, हरित वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि प्रदूषणाला आळा घालणे, निसर्गस्नेही शेती पद्धती आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे इ. अनेक घटकांचा समावेश होतो. दुसरं मूल्य म्हणजे आर्थिक सक्षमता. यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर यांना स्थिर उत्पन्न मिळावं, वाजवी व्यापार आणि स्थानिक अन्न पद्धती असावी आणि महागड्या शेती निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करावं यांचा समावेश होऊ शकतो.

शाश्‍वत शेतीमुळे दीर्घकालीन अन्नसुरक्षा मिळेल, परिसंस्थेचे संरक्षण होईल, खेड्यातील जनजीवनाला हातभार लागेल, आणि हे सर्व पर्यावरण बदलाचा सामना करत आणि पर्यावरणावर कमीत कमी भार टाकून साधता येईल.हे समजावून घेण्यासाठी शाश्‍वत शेतीची एक गोष्ट तुम्हाला सांगतो.

एका खेड्यात राहणाऱ्या रमेश नावाच्या शेतकऱ्याला आपल्या पाच एकर क्षेत्रावर शाश्‍वत शेती करायची इच्छा झाली. आजकालच्या भाषेतील ‘इच्छा तिथे हायवे’ या नव्या म्हणीप्रमाणे त्यांनी कागदावर बरीच आकडेमोड केली. गणिते मांडत मातीची तब्येत, पाण्याचे संधारण, पिकांची विविधता, नैसर्गिक कीड नियंत्रण ही मूल्ये लक्षात घेऊन योजना बनवली आणि कामाला लागले.

पहिल्यांदा मातीचं आरोग्य सुधारायचं मनावर घेतलं. माती हे पिकासाठी अन्न पचायला मदत करणारं, वेगवेगळी विष पचवणारं यकृत आहे. पण शेती रसायनांच्या माऱ्याने हे यकृत आपण विकृत करून टाकलंय. जसं एखाद्या अत्यवस्थ रुग्णांला पोटातून अन्न न देता, पोटाला बायपास करून सरळ रक्तात सलाईनद्वारे अन्नद्रव्ये देतात, तसंच जमिनीतील किचकट पाचक प्रक्रियेपेक्षा, सरळ रासायनिक खतांच्या सलाइनद्वारे अन्नद्रव्ये पिकाला देण्याची प्रथा सुरू झाली. तेव्हापासून शेतीचं पोट बिघडतच गेलं. मातीचे आरोग्य हा शाश्‍वत शेतीचा महत्त्वाचा भाग समजून त्यावर रमेशरावांनी काम सुरू केले. त्यांनी शेणखताचा पारंपरिक उकिरडा उपसून शेतात टाकला.

Agriculture
Agriculture Journalism: समृद्ध करणारी पत्रकारिता

घरचे शेणखत कमी पडल्याने, कंपोस्ट खत विकत आणले. रमेशरावांना माहित होते, की द्विदल पिके जमिनीत नत्र सोडतात. म्हणून अगोदरच्या हंगामात धैंचाचे हिरवळीचे खत पेरले होते. दरवर्षी फक्त मका, जोंधळा यासारख्या एकदल पिकांची पेरणी करण्याऐवजी त्यात बदल करत एका वर्षी सोयाबीन, मसूरसारखे द्विदल आणि दुसऱ्या हंगामाला एकदल मका, जोंधळा अशी एकदल-द्विदल जुगलबंदी करायला सुरवात केली.

उघड्या जमिनीतून सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास होतो, म्हणून रमेशरावांनी जमिनीला पाला-पाचटाच्या आच्छादनाची (मल्चिंग) साडीचोळी केली. माती सुपीक व्हायला दोन-तीन वर्षे लागतात, हे माहित असल्यानं चिकाटी ठेवली. शेवटी या युक्त्याप्रयुक्त्यांतून जमिनीत पोषक पदार्थ टिकून राहू लागले. सूक्ष्मजीवांची भावकी वाढली. माती, सूक्ष्मजीव आणि पिकं ही सारी खऱ्याखुऱ्या तंटामुक्त गावागत प्रेमाने नांदू लागली.

पिकाची निवड करणे हे दुसरं काम.

काय उगवायचे? आणि का उगवायचे? असे प्रश्‍न रमेशरावांना सोडवायचे होते. आपल्या जमिनीचा प्रकार, वातावरण आणि जवळपास उपलब्ध असलेली विक्रीव्यवस्था लक्षात घेऊन रमेशरावांनी आले पीक घेण्याचे ठरवले. शेतात ‘आले’ तर आले, पण तिथपर्यंत पाणी देखील आले पाहिजे. पाटानं पाणी देण्याची नासाडी परवडणार नाही, हे जाणून ते ठिबक सिंचनाकडे वळले. मल्चिंग केल्याने आधीच जमिनीची पाणी धरून ठेवायची क्षमता वाढली होती.

आता महत्त्वाचा आणि खर्चिक विषय बाकी होता, तो म्हणजे कीड आणि तण नियंत्रण. कीड नियंत्रणासाठी सुरवातीपासून कामगंध सापळे लावून किड्यांचे संतती नियमन केले. त्यामुळे किडीची संख्या नियंत्रणाबाहेर गेली नाही. शेतावरच दशपर्णी, शतपर्णी अर्क काढून फवारण्याची व्यवस्था केली. अगदीच गरज पडली तर बाजारातून प्रमाणित सेंद्रिय जैविक कीटकनाशक आणले. खंबीर होते म्हणून पण उधारीवर मिळतं म्हणून, ‘दोन-तीन रसायने घेऊन जा आणि त्यांचे मिश्रण जास्त डोसने फवारा’ हा दुकानदाराचा फसवा आग्रह टाळू शकले.

आज दुप्पट डोसने दोन फवारले, तर भविष्यात किड्यांना प्रतिकारक्षमता येऊन उद्या चार कीटकनाशके फवारावे लागतील, हे त्यांना माहित होतं. तणनाशकाचा प्रश्‍न मल्चिंगने बऱ्यापैकी सोडवला होता. शेत उगाचच चकाचकच असावं, असा शाश्‍वत शेतीचा आग्रह नाही. द्विदल तण देखील जमिनीत नत्र सोडतंच की. थोडीफार खुरपणी करून तणनाशक वापराचा अशाश्‍वत मोह रमेशरावांनी टाळला.

एवढी मेहनत घेतली म्हटल्यावर आपलं शेत सेंद्रिय प्रमाणित झालंच पाहिजे हे त्यांनी जाणलं. ‘आमचा माल सेंद्रिय आहे’, म्हणणाऱ्या अप्रमाणित, स्वघोषित सेंद्रिय उत्पादकाकडे गिऱ्हाईक ‘विदेशीचा ग्लास हातात घेऊन स्वदेशीचे लेक्चर ठोकणाऱ्या पुढाऱ्याकडं पाहावा तसं पाहतो’ हे जाणून असलेल्या रमेशरावांनी शासनाच्या सेंद्रिय प्रमाणीकरण योजनेचा फायदा घेतला. त्यामुळे त्यांचा माल ‘इंडिया ऑरगॅनिक’चा लोगो मिरवून योग्य किमतीत मानाने विकला जाईल असा विश्‍वास आला.

Agriculture
Sustainable Agriculture: शाश्वत शेती आव्हाने आणि संधी

आता सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्री व्यवस्थापन. शाश्‍वत शेतीत पिकलेला माल शाश्‍वत किमतीत विकला जाईल याची काहीही शाश्‍वती नसते, हे कटूसत्य. कारण पिकविण्यात पीएच.डी. केलेल्या बहुतांश बळीराजांनी अर्थशास्त्र आणि मार्केटिंग हे विषय ऑप्शनला टाकलेले असतात. म्हणजे जीव लावून पिकवायचे आपण आणि मलई खायची विक्री एजंटने, हे ठरलेले गणित.

पण त्या बाबतही आपले रमेशराव थोडे शहाणे होते. त्याच गणित अगोदरच कागदावर मांडलं होतं. गावातल्या समविचारी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ‘फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ काढली. शहरात जाऊन शिकलेल्या पण ‘मोबाइल’च्या फार आहारी न गेलेल्या तरुण पोरांची मार्केटिंग टीम बनवली होती. त्यांच्या मदतीनं व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग सुरू केलं. आपण पिकवू शकतो, तर विकूपण शकतो हे रमेशरावांनी दाखवून दिले.

रमेशरावांना सेंद्रिय शिक्का मारून बाजारपेठेत आपला माल विकायचा होता. त्यातून आपल्या मालाचे विक्रीमूल्य वाढेल, एवढ्या उद्देशाने त्यांनी सेंद्रिय प्रमाणिकरण करून घेतले. पण केवळ त्यावरून ‘शाश्वत शेती म्हणजे फक्त सेंद्रिय’ असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. त्यासाठी ‘रेसिड्यू फ्री फार्मिग’ म्हणजे ‘अंशविरहित शेतीचा’ मध्यम मार्गही उपलब्ध आहे. यामध्ये कमी विषारी, निसर्गात जलद विघटित होणारी खते आणि कीटकनाशके वापरायची मुभा असते.

अट हीच आहे की त्यांचा अतिवापर टाळत योग्य वेळीच वापर करावा. अशा अंशविरहित उत्पादनांची स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेत पर्यायाने निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. पण चांगले दर मिळतात म्हणून श्रीमंत देशी किंवा परदेशी ग्राहकांना ‘रेसिड्यू फ्री’ खायला घालून आपण सामान्यांनी रासायनिक अन्न खाणे अनुचित आहे. भविष्यात संपूर्ण शेती शाश्वत आणि रसायनविरहित होऊन सर्वांना सुरक्षित अन्न मिळावे हा अंतिम उद्देश असावा.

काय ऐकायला फार छान वाटतीय ना आमच्या रमेशरावांची ‘गुडीगुडी’ कहाणी!

ती कदाचित सत्यातही येऊ शकेल, पण त्यासाठी काही कटू सत्ये सर्वांनीच जाणून घेतली पाहिजेत.

सत्य - १ : रासायनिक शेतीएवढे उत्पादन शाश्‍वत शेतीपद्धतीचा अवलंब करून येते का?

सत्य - २ : बाजारात शाश्‍वत मालाला शाश्‍वत-भावाची शाश्‍वती आहे का?

सत्य - ३ : सुरुवातीच्या १-२ वर्षांच्या काळात जमिनीचे बिघडलेले पोट सुधारण्याच्या काळात उत्पादन कमी होते. प्रत्येक गोष्ट नफातोट्यात मोजण्याच्या आजच्या युगात शेतकऱ्याने हे आर्थिक नुकसान कसे, कधी आणि कोठून भरून काढायचे?

सत्य - ४ : सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या शासनाच्या योजना आहेत. पण गटशेती नसल्यास एकांड्या शिलेदाराला सेंद्रिय प्रमाणीकरण महागात पडते. हा प्रमाणीकरणाचा खर्च प्रमाणात कसा आणावा?

सत्य - ५ : शासन आणि शासकीय संस्थांची उदासीनता हे भ्रष्ट सत्य आहे. दुष्काळ, पूर कधी येतात आणि आपल्याला सबसिडीची सापशिडी कधी खेळता येते, या प्रतीक्षेत टपून बसलेल्या अधि(क)कारी आणि पुढारी यांची संख्या बरीच आहे. कृषी महाविद्यालये आणि संशोधन संस्थेत कर्मचारी भरले जात नाहीयेत. एकवेळ अभयारण्यात वाघ सापडेल, पण विद्यापीठात नवीन भरती केलेले शिक्षक, संशोधक सापडणार नाहीत, हे ज्वलंत सत्य आहे. मग शेतकऱ्याच्या या शाश्‍वत अडचणींवर कोण तोडगा काढणार?

सत्य - ६ : वातावरण बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसताहेत. निसर्गाचे चक्रच जणू चक्रम झालंय. पाऊस वेळकाळ पाळत नाही. पेरणीआधी अपेक्षित असलेला पाऊस, काढणीला येऊन शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरवतो. अशा बेभरवशाच्या काळात शेतीची शाश्‍वती कोणी आणि कशी द्यावी?

सत्य - ७ : उत्तम पिकासाठी बियाणे, खते आणि कीटकनाशके उत्तम असणे गरजेचे आहे. पण निकृष्ठ निविष्ठांचा सुळसुळाट झालाय. शासन व्यवस्थाही आडबाजूला दबा धरून बसलेल्या ट्रॅफिक पोलिसांगत नियम कधी तोडला जातो याचीच वाट पाहत बसल्या आहेत. त्यामुळे त्यात सुधार होण्याऐवजी, कृषी निविष्ठांची गुणवत्ता हप्त्याहप्त्याने राजधानीत पोहोचते.

सत्य - ८ : बॉलिवूड कलाकारांच्या आवाजाचा, स्मित हास्याचा विमा उतरतो. त्याची परतफेड देखील विमानाच्या वेगाने होते. पण किडीने शेत फस्त केल्यावर, अवकाळीने शेत नष्ट झाल्यावर या विम्याची गोगलगाय का होते?

सत्य-९ : ग्राहक जागरूकता हा महत्त्वाचा विषय. पंचतारांकित हॉटेलमध्ये शेकडोची टीप देणाऱ्या हातातून, शाश्‍वत शेतीमालासाठी जास्तीचे दोन पैसे कधी सुटतील?

सत्य - १० : शेतकरी भावनिकदृष्ट्या शेतीत गुंतलेला असतो. लहान बाळागत त्याने पिकाला वाढवलेले असते. त्यामुळे वातावरण, अर्थकारण, राजकारण, समाजात घडणाऱ्या घटना आणि त्यांचे त्याच्या शेती व्यवसायावर होणारे परिणाम या भावनिक चक्रात तो सतत अडकलेला असतो. याचाच फायदा घेऊन राजकारणी आपली पोळी भाजून घेतात. शेती करणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. त्यात शास्वत शेती म्हणजे अजून कठीण विषय. यासाठी समाज, सरकार आणि निसर्गाची साथ मिळाली तर शेतकऱ्याचा ‘इमोशनल बर्न-आउट’ टळू शकतो.

मित्रांनो, अशी अनेक सत्यं सत्यात उतरतील अशी अपेक्षा करत या सत्याच्या प्रयोगाला पूर्णविराम देतो. रामराम!

- डॉ. सतीलाल पाटील ९९२२४५९७८४

(लेखक ग्रीन व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com