
Akola News : गेल्या ४८ तासांत अकोल्यातील पातूर, बुलडाण्यातील मेहकर या दोन तालुक्यांत पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. तर रिसोड तालुक्यातही काही मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान दोन दिवसांतील पाऊस व पुरामुळे बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार ६०५ हेक्टर तर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या भागात गेल्या ४८ तासांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र काही मंडलांत जोरदार पाऊस पडल्याने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मागील २४ तासांत अकोला, वाशीम व बुलडाणा या जिल्ह्यांतील काही मंडलांत कुठे अतिवृष्टी तर कुठे जोरदार पाऊस नोंद झाला. यात अकोल्यातील आलेगाव मंडलात ९२.५ मिलिमीटर पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अतिवृष्टी झाली.
दोन दिवसांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. सोबतच पातूर मंडलात ६९, बाभूळगाव ६८.८, चान्नी ४२, सस्ती ४२, पातूर तालुका ६२.९, बार्शीटाकळी तालुक्यात ३६.७ मिलिमीटर पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शेलगाव देशमुख मंडलात ९९.५ मिलिमीटर असा विक्रमी पाऊस झाला. याशिवाय या संपूर्ण तालुक्याला दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले.
वाशीम जिल्ह्यात रिसोड मंडलात ८१.५, केनवड ९९.५, वाकद ४०.३, गोवर्धन ८०.३, कवठा ४२, मालेगाव मंडलात ६६.३, मुंगळा ८२.८, मेडशी ६३.५, चांडस ४८.८, मानोरा तालुक्यात सर्वच मंडलांमध्ये दमदार पावसाने हजेरी दिली.
बुलडाण्यात २६६०५ हेक्टरला तडाखा
सोमवार व मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने लोणार तालुक्यात २४ हजार ५०० हेक्टरवरील मूग, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर शेगाव तालुक्यात ११ गावा २१०५ हेक्टरवरील मूग, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने अंदाज घेत अशा स्वरूपाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.
वाशीम जिल्ह्यात पुरात ट्रक उलटला, चालक ठार
केनवड, जि. वाशीम ः या भागात संततधार पावसामुळे केनवड मंडलातील पिंपरी सरहद्द परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. उतावळी आणि काच नद्यांना आलेल्या पुराने बुधवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून पिंपरी सरहद्दजवळील पुलावर पाणी साचले. परिणामी, काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
दरम्यान, मेहकरकडून मालेगावकडे जात असलेला व गॅस सिलिंडर भरलेला ट्रक (एमएच-२०-जीसी-५५३१) या पुलावरून जात असताना अपघात झाला. स्थानिकांनी चालकाला पाणी ओसरण्यापर्यंत थांबण्याची विनंती केली होती.
मात्र चालकाने धोकादायक निर्णय घेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याच्या जोरामुळे ट्रक उलटून रस्त्याच्या कडेला फेकला गेला. यात चालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शेख हुसेन शेख गुलाब (वय अंदाजे ३९, रा. हिनानगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी आधार कार्डवरून ओळख पटली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.