
Chhatrapati Sambhajinagar Rain Forecast : छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात बुधवारी (ता. ७) दुपारी २ वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास वादळासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान मंगळवारी (ता. ६) झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यात घडली.
मराठवाड्यात अनेक भागात दोन दिवसापासून वादळासह पाऊस व कमी अधिक प्रमाणात गारपीट होत आहे. याचा थेट फटका फळ पिकांसह उन्हाळी व लांबलेल्या रब्बी पिकांना बसतो आहे. माहितीनुसार, मंगळवारी (ता. ६) दुपारी ४ वाजेपासून सिल्लोड तालुक्यामध्ये सोसाट्याचा वारा व मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झाले होते.
सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान तालुक्यांतील आमठाणा व भराडी मंडळात काही गावात हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुपारी तीनच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील जरंडी, बनोटी मंडळात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड तसेच अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात बुधवारी (ता. ७) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाचे वातावरण कायम होते.
वीज पडून एकाचा मृत्यू, पाच जनावरेही दगावली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी (ता. ६) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तसेच पाच जनावरेही दगावली. माहितीनुसार सिसारखेडा (ता. सिल्लोड) येथे सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास सुनील गोविंदा चिरखे वय २५ वर्षे (अविवाहित) गट नंबर १९ मध्ये स्वतः शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.
याशिवाय आहेरवाडी येथे दिगंबर नामदेव मोरे यांच्या गट क्रमांक ३०३ मधील आखाड्यावर वीज पडून आखाडा जळाला. या घटनेत ४ वासरे व १ कारवड मयत झाले. तसेच ६ गाई भाजल्या आहेत. याशिवाय ८० पोते खत व कडबा कटर जळाले, असल्याची माहिती तालुका प्रशासनाने आयुक्त कार्यालयाला कळविली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.